लक्ष्मण सिद्राम तथा ल. सि. जाधव हे अलीकडच्या काळात सोलापूरने मराठी साहित्याला दिलेले योगदान म्हणावे लागेल. लेखक, चिंतक, समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख (ज्यांची जन्मशताब्दी सध्या सुरू आहे) यांचे ल.सि. हे बीए, एमएचे विद्यार्थी. जाणकार साहित्य रसिक, वाचक, कवी म्हणून ते ज्ञात होते. सरदेशमुखांच्या अकादमी पुरस्कार मिळालेल्या ‘डांगोरा एका नगरीचा’ या कादंबरीची सुवाच्य मुद्रणप्रत ल.सि. यांनी तयार केली, तिचे ‘श्री.पुं.’नी (भागवत) खास कौतुक केले होते. स्टेट बँकेतील अधिकारपदावरून निवृत्त होईतो सततच्या बदल्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे लेखनाचे कढ त्यांनी आवरून धरले होते. निवृत्तीनंतरही वसुंधरा शिक्षण संस्थेसाठी महाविद्यालय उभारणीची संधी मिळाली तेव्हा त्यात त्यांनी झोकून दिले. या उभारणीनंतर तिथे मतभेद झाले तसे ‘इदं न मम’ म्हणत त्यातून ते बाजूला झाले. यानंतर काहीशा आजारपणानंतर आलेल्या रिक्तावस्थेत त्यांनी गतायुष्याचा पट पुन्हा मांडला. ‘होरपळ’मध्ये अत्यंत अभावग्रस्त बालपणापासून स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या समृद्धीचा प्रवास रसाळ, संवादी शैलीत येतो. या संयत, स्वीकारशील आत्मचरित्राची पाठराखण साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक (हेही अलीकडेच दिवंगत झाले) डॉ. गो. मा. पवार यांनी केली. तीन आवृत्त्या, राज्य शासनाचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, हिंदीसह कोंकणी, इंग्रजी, कन्नडमध्ये अनुवाद, ‘होरपळ’ची वाटचाल झाली. नंतरच्या त्यांच्या संध्याकालीन बहराने मात्र साहित्य विश्वाला अनेक सुखद धक्के दिले. पराभूत धर्म (सुधारित दुसरी आवृत्ती धर्मवेध), संगच्छध्वम्, सुंभ आणि पीळ, मावळतीची उन्हे आणि अडगळ अशा पाच कादंबऱ्या, परतीचे पक्षी, पाथेय, गुदमरते शालीन जगणे आणि प्रकाशाच्या वळचणीत असे चार कवितासंग्रह, ‘होरपळ’नंतर घरी आणि बाहेरही आलेले सलणारे अनुभव मांडणारे ‘सूळकाटा’, तुमचा खेळ होतो पण.., शूर जवान, शूरवीर लहानू अशा तीन कुमार कादंबऱ्या, केतकीची फुले हा अभावग्रस्त मुलांचे भावविश्व उलगडणारा कवितासंग्रह, अश्रूंचे गोंदण हा ललितलेख संग्रह असा सोळा पुस्तकांचा संसार मांडून ल.सि. गेले. प्रकाशनाधीन असलेले शेवटचे पुस्तक ‘प्रिय श्रीनंद’ हा पुत्रशोकानंतरचा विलाप आहे. दशकभरापेक्षाही कमी काळातील पाच हजार पानांच्या संभारापैकी ‘सुंभ आणि पीळ’ ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र मुद्रा उमटवेल अशा योग्यतेची आहे. एका मातंग वस्तीच्या उत्पत्ती, स्थिती व लयाची ही चटका लावणारी कथा मराठी साहित्य संस्कृतीतला मोलाचा दस्तावेज ठरावा. आश्वासक उत्सुकता जागवणारा ल. सि. यांचा  हा लेखनप्रवास त्यांच्या जाण्याने खंडित झाला आहे.