ट्रम्प यांची अमेरिका केवळ त्यांच्या देशातील लोकांनी महान केलेली नाही, पण अमेरिकेला महान करण्यासाठी ते स्थलांतरित लोकांना बाहेर काढायला निघाले आहेत. अमेरिकेत अनेक यशस्वी कहाण्या स्थलांतरितांच्याच आहेत. दिना कटाबी ही तरुण मुलगी मूळ सीरियातली जिथे सध्या युद्धसंघर्ष सुरू आहे. सीरियाच्या दमास्कस विद्यापीठातून बीएस पदवी घेतल्यानंतर ही मुलगी काही वर्षांपूर्वी अमेरिकेत आली. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेत ती शिकली. पीएचडी व एमएस केल्यानंतर ती आता एमआयटी या संस्थेत प्राध्यापक आहे. तिला नुकताच अडीच लाख डॉलरचा एसीएम इन्फोसिस पुरस्कार मिळाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिचा संशोधनाचा विषय आहे तो बिनतारी संदेशवहन, माहिती दूरसंचार नेटवर्क. अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग या संस्थेची ती फेलो असून १०० शोधनिबंध तिच्या नावावर आहेत. २०१३ मध्ये तिने ‘सी थ्रू वॉल्स विथ वायफाय’ हा शोधनिबंध सादर केला होता तो खूप गाजला. रेडिओ लहरी माणसाच्या अंगावर जाऊन आदळतात त्या परत येतात, त्यांचे विश्लेषण करून त्या माणसाची भावनिक स्थिती समजते, असा या शोधनिबंधाचा मथितार्थ होता. हा प्रयोग तिने यशस्वीही केला. विज्ञान काल्पनिकेत शोभावे असे हे उपकरण तिने तयार केले आहे. त्याच्या मदतीने भिंतीपलीकडे असलेल्या माणसाची भावनिक स्थिती जाणून घेता येते. मध्यम वयातील संशोधकांना दिला जाणारा एसीएम पुरस्कार मिळाल्याने पुढील काळात तिला आणखी संशोधनास प्रोत्साहन मिळणार आहे. संवेदकांवर आधारित असलेले तंत्रज्ञान हे एखादी इमारत कोसळते तेव्हा ढिगाऱ्यात अडकलेल्या माणसांचा शोध घेण्यासाठीही उपयोगी असते, पण त्यापुढचा टप्पा तिने गाठला आहे. माहिती प्रसारणासाठी आता इंटरनेटचा वापर होत आहे. २०११ ते २०१६ दरम्यान मोबाइल डेटाचे प्रमाण जगात १८ पटींनी वाढले. दिना कटाबी हिच्या संशोधनामुळे माहितीवहन आणखी वेगाने होत आहे. मोबाइलला २०२० पर्यंत ११.६ अब्ज यंत्रे जोडली जातील, त्यामुळे आपण अनेक गोष्टी इंटरनेट ऑफ थिंग्जच्या मदतीने करू शकू. या सगळ्या प्रवासात दिना कटाबीचे संशोधन हे पायाभूत स्वरूपाचे आहे. फास्ट फुरियर ट्रान्सफॉर्म पद्धतीपेक्षा दहा ते शंभरपट वेगाने माहितीचे विश्लेषण करणारे स्पार्स फास्ट फुरियर ट्रान्सफॉर्म हे तंत्र तिने नव्या अलगॉरिथमच्या मदतीने शोधून काढले. दिना कटाबी आज सीरियात असती तर आपण या सगळ्या संशोधनाला मुकलो तर असतोच, पण आताच्या संघर्षग्रस्त सीरियात तिची स्थिती काय राहिली असती याची कल्पनाही करू शकत नाही.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh dina katabi
First published on: 09-04-2018 at 03:35 IST