तब्बल ५० संघराज्यांनी मिळून बनलेल्या अमेरिकेत वर्णभेद नष्ट करून समानाधिकार मिळाले तरी आजही तेथे आपल्या देशातील जातीयवादासारखा काळे-गोरे हा वर्णवाद बऱ्याचदा उफाळून येतो. या वर्णविद्वेषाची झळ बसलेले अमेरिकेत अनेक जण होऊन गेले. त्यातीलच एक होत्या लिंडा ब्राऊन!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९५३ मध्ये लिंडा अवघ्या सात वर्षांच्या असताना आपले वडील ऑलिव्हर यांच्या समवेत टोपेका शहरातील एका शाळेत प्रवेशासाठी गेल्या होत्या. तेथील मुख्याध्यापकांनी ते कृष्णवर्णीय असल्याने त्यांना प्रवेश देणे नाकारून दुसऱ्या शाळेत जाण्याचा सल्ला दिला. ही शाळा घरापासून जवळ असल्याने येथेच प्रवेश द्यावा असा ऑलिव्हर यांनी आग्रह धरला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ऑलिव्हर यांना अन्य कृष्णवर्णीय पालकांनीही लिंडाला दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा, असे समजावून पाहिले. त्याला न जुमानता ऑलिव्हर यांनी त्या शाळेत प्रवेश नाकारलेल्या मुलांच्या पालकांना एकत्र केले व न्यायालयात खटला दाखल केला. ‘ऑलिव्हर ब्राऊन विरुद्ध टोपेका शिक्षण मंडळ’ याच नावाने अमेरिकेच्या न्यायिक लढय़ात तो खटला गाजला. न्यायालयाने ब्राऊन यांची भूमिका योग्य असल्याचा निर्वाळा दिला. कृष्णवर्णीय आहे म्हणून त्यांच्या मुलीला श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश नाकारणे गैर व समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अगदी शाळकरी वयातच लिंडा यांना वर्णभेदाची झळ पोहोचल्याने त्यांनी पुढे आयुष्यभर कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा दिला. या ऐतिहासिक निवाडय़ाच्या आधारे विविध प्रांतांतील ‘गोऱ्या’ शिक्षण संस्थांमध्ये कृष्णवर्णीयांना प्रवेश मिळणे सुकर झाले. लिंडा ब्राऊन हे नाव अमेरिकेच्या शिक्षणक्षेत्रात गाजू लागले. तिच्यावर त्या काळात अनेक वृत्तपत्रांनी लेख लिहिले. वडिलांच्या निधनानंतर त्या ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन’मध्ये सहभागी झाल्या. न्यायालयाने निकाल दिला तरी अनेक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाच्या वेळी कृष्ण व गौरवर्णीय असा भेदभाव केलाच जात असे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष केला. शैक्षणिक संस्थांबरोबरच सार्वजनिक बससेवांमध्येही कृष्णवर्णीयांसाठी स्वतंत्र आसने  ठेवली जात असल्याबद्दल त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. या काळात लिंडा यांच्यावर अनेकदा दबाव आला,  पण कृष्णवर्णीयांच्या अधिकारांसाठी त्यांनी आपला लढा चालूच ठेवला. मंगळवारी ७५व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला तरी त्यांनी केलेले कार्य जगभरातील वंचितांना प्रेरणा देतच राहील.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta vyakti vedh linda brown
First published on: 30-03-2018 at 03:25 IST