खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे असे सांगणाऱ्या साने गुरुजींच्या छत्रछायेत तयार झालेले अनेक जण कधीच प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. आपण बरे, आपले काम बरे म्हणत साने गुरुजींचा प्रेमाचा वारसा कथामालेच्या स्वरूपात पुढे चालवत लहान मुलांना घडविणे हेच एकमेव कार्य मधू नाशिककर यांनी आयुष्यभर निष्ठेने केले. अत्यंत साधे तरीही मिश्कील स्वभावाचे पण कोणाच्याही विशेष नजरेत न येणारे व्यक्तिमत्त्व असलेले मधू नाशिककर यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले, तेही कोणाला फारसे कळले नाही.
१९४२ मध्ये स्वातंत्र्य चळवळीत विद्यार्थिदशेत उतरलेले मधू नाशिककर मूळचे सेवादलाचे. नाशिकहून १९४० मध्ये ते मुंबईत आले. एस. एम. जोशी, बॅ. नाथ पै, दत्ता ताम्हाणे यांच्याबरोबरच त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षात काम करायला सुरुवात केली. १५ आणि २० दिवसांचा तुरुंगवासही त्यांनी भोगला, पण त्याचे भांडवल त्यांनी केले नाही. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात मधूभाईंचाही सहभाग होताच. त्याच स्वातंत्र्यलढय़ात तुरुंगवास भोगताना त्यांची भेट साने गुरुजींशी झाली आणि मग त्यांनी साने गुरुजींपाशीच आपली निष्ठा वाहिली. स्वदेशी आणि खादीचे व्रत त्यांनी आयुष्यभर जोपासले. तसेच साने गुरुजींनंतर त्यांच्या कथामालेचे पालकत्वही स्वीकारले. ‘कथामाला’ मासिकाचे ते संस्थापक संपादक होते. अगदी वयाच्या ९३व्या वर्षांपर्यंत तेच या मासिकाचे संपादक होते म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. ‘कथामाला’ मासिकातून लहान मुलांशी संवाद साधणे त्यांना अतिशय आवडत असे. त्यांची पत्रकारिताही त्यातच बहरली. लीलाधर हेगडे, वसंत बापट, राम मोहाडीकर, प्रकाश मोहाडीकर यांच्याबरोबरच मधूभाईही साने गुरुजींच्या विचारांचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते.
नवी पिढी घडवायची तर ती चांगल्या संस्कारांनीच यासाठी ते ‘कथामाला’ मासिकामध्ये लहान लहान गोष्टींद्वारे मुलांना देशभक्ती, विनम्रता, आदर, संस्कार आणि स्वदेशी याविषयीची माहिती देत. घेतले हे व्रत आम्ही निष्ठेने म्हणणाऱ्या मधूभाईंना प्रसिद्धीचा कधीच शौक नव्हता. त्यांच्या कार्याचा गौरवही त्यांच्या उतारवयात झाला, पण त्याची त्यांना कधीही खंत नव्हती. स्वातंत्र्य चळवळीत एक दिवसाचा तुरुंगवास भोगलेली मंडळीही स्वातंत्र्यसैनिकाचे लाभ मिळवायला पुढे असतात. पण मधू नाशिककरांनी असा कोणताही सरकारी लाभ घेतला नाहीच, पण त्याबद्दल कोणी विचारले तर ते विनम्रतेने हात जोडून पुढे निघून जात असत. मधूभाईंसारखी निर्मळ मनाची माणसे आजच्या काळात दुर्मीळच. मुंबई मराठी पत्रकार संघ व अन्य काही संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. मात्र आयुष्यभर त्यांनी आपल्या नि:शब्द, प्रसिद्धीपराङ्मुख कार्यातून किमान दोन पिढय़ांवर संस्कार केले. हे त्यांचे ऋण आपण विसरून चालणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhu nashikkar
First published on: 11-03-2016 at 03:56 IST