सागरी मच्छीमारी व्यवसायाकडे गांभीर्याने पाहायचे असेल, तर आधी समुद्र राखला पाहिजे आणि समुद्र हा मच्छीमारीसाठी ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ मानला पाहिजे, हा विचार भारतात पुढे नेणारे सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणजे प्रा. डॉ. एन. आर. मेनन. त्यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी कोची येथे झालेले निधन, ही एका अर्थाने सागरी जीवसृष्टीच्या अभ्यासकांची हानी आहे. गेली चाळीस वर्षे प्रा. मेनन विविध संस्थांमधून सागरशास्त्रज्ञ घडवीत होते. मच्छीमारीपासून ‘मत्स्योद्योगा’कडे जाण्याचा भारताचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणि त्या मार्गात प्रदूषक यांत्रिकीकरणाची धोंड नसावी यासाठीही ते हातभार लावत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागरी पर्यावरणाची हानी करणाऱ्या घटकांचा अभ्यास त्यांनी केलाच, पण समुद्रालगतच्या मानवी वसाहतींना उपयुक्त ठरणारे संशोधनही त्यांनी केले. काही सागरी जीव हे किनाऱ्याच्या आसपासच्या खडकांची तसेच घरे अथवा मानवनिर्मित साहित्याचीही हानी करतात. त्या जीवांच्या जीवनक्रमाचा अभ्यास प्रा. मेनन यांनी केला. माशांना खाद्य म्हणून उपयोगी पडणाऱ्या वनस्पतींत काही विषारी वनस्पतीही आढळतात, त्यांच्या विशेष अभ्यासासाठी प्रा. मेनन ओळखले जातात.

एकंदर १५० शोधनिबंध प्रा. मेनन यांच्या नावावर आहेत. त्याहून किती तरी अधिक त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संशोधकांच्या चमूसह ते जगातील अन्य महासागरांचा अभ्यास करण्यासाठी गेले, पण आपल्या अभ्यासाचा भर आपल्या भोवतालास उपयोगी पडण्यासाठी असावा, हा कटाक्ष त्यांनी पाळला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अनेक सागरी जीवशास्त्र संस्थांशी त्यांचा संपर्क होता. मंगलोरच्या संस्थेतून तर त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. कोचीमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठाची (क्युसॅट) स्थापना झाल्यानंतर, या विद्यापीठात सागरी अभ्यास केंद्राच्या स्थापनेपासून ते प्रमुखपदी राहिले. पुढे याच विद्यापीठाचे हंगामी रजिस्ट्रार, हंगामी प्रकुलगुरू अशी पदेही त्यांनी सांभाळली, पण एरवी अशा प्रशासकीय पदांपासून ते दूरच राहिले. शास्त्रज्ञाला प्रशासकीय विचार करता आला पाहिजेच, पण हे प्रशासकीय ज्ञान आपापल्या शास्त्राच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी कसे उपयोगी पडेल, या अंगाने हा विचार अधिक व्हावा, असाही प्रा. मेनन यांचा आग्रह असे. सागरी पर्यावरणासाठी अनेक नियमांच्या आखणीपासून ते त्यांच्या सुकर अंमलबजावणीपर्यंत अनेकांगांनी त्यांच्या प्रशासकीय ज्ञानाचा लाभ केरळ सरकार व अन्य पातळ्यांवर झालेला आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marine scientist nr menon
First published on: 20-03-2018 at 01:58 IST