केरळमधील एका प्रख्यात विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राज्यघटनाविषयक अनेक पाठय़पुस्तकांचे तसेच कामगार कायदे आणि मनुष्यबळ विकास या विषयावरील पुस्तकांचे लेखक, देशभरातील अनेक विद्यापीठांचे तसेच केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित उच्चशिक्षण संस्थांचे सल्लागार, केरळमध्ये व्यवस्थापन-अभ्यासक्रमांची पायाभरणी करणारे द्रष्टे शिक्षण-व्यवस्थापक आणि २००६ मध्ये ‘पद्मभूषण’ या किताबास पात्र ठरलेले शिक्षणतज्ज्ञ अशी डॉ. एम. व्ही. पैली यांची विविधांगी ओळख होती. वयाच्या ९८ व्या वर्षी, ३० डिसेंबर रोजी ते कालवश झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांचे पूर्ण नाव मूलमत्तम् वर्के पैली. पाच ऑक्टोबर १९१९ चा त्यांचा जन्म. आलपुळा (आलेप्पी) जिल्ह्यातील पुलिकुन्नू या बेटवजा गावात कॉन्व्हेन्ट शाळा असल्याने तेथेच त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले. उच्चशिक्षणासाठी मात्र ते थेट लखनऊ विद्यापीठात गेले. तेथे कलाशाखेतील पदव्युत्तर पदवी घेऊन, हार्वर्ड विद्यापीठाची एलएल.एम. ही कायद्यातील उच्च पदवी त्यांनी मिळविली. त्यांनी १९६२ मध्ये लिहिलेले ‘इंटरनॅशनल जॉइंट बिझनेस व्हेंचर्स’ हे पुस्तक अमेरिकेतील ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस’ने प्रकाशित केले, तर अन्य पुस्तकांपैकी सात पुस्तके भारतीय राज्यघटनेचा विविधांगी अभ्यास करणारी आहेत. इंग्रजीसोबत मल्याळम् भाषेतही पैली आवर्जून लिहीत. शीतयुद्धकालीन अमेरिकेत शिकलेले पैली पुढे चर्चासत्रांनिमित्त रशियाभेटीस जाऊन प्रभावित झाले. त्या अनुभवांवर आधारलेले त्यांचे पुस्तक या दोन्ही भाषांत प्रकाशित झाले आहे. ‘स्वरम् नन्नयिरिकुम्पोल’ हे त्यांचे आत्मपर पुस्तक केवळ मल्याळम्मध्येच उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mv paili
First published on: 02-01-2018 at 01:27 IST