महाराष्ट्राच्या संगीत परंपरेत भक्तिसंगीताचे स्थान मोठे आहे. नाटय़गीत आणि भावगीतासारख्या ललित संगीतातील प्रकारास याच महाराष्ट्राने जन्म दिला असला, तरीही त्याच्या किती तरी आधीपासून भक्तिसंगीताने महाराष्ट्राला स्वरसमृद्ध केले आहे. नंदू होनप यांच्यासारख्या संगीतकाराचे त्या क्षेत्रातील  स्थान म्हणूनच लक्षात घेण्याजोगे म्हटले पाहिजे. एक हरहुन्नरी कलावंत म्हणून ते सर्वाना परिचित होतेच, परंतु त्यांनी स्वत:ची जी ओळख निर्माण केली, ती संगीतकार म्हणून. उत्तम व्हायोलिनवादक म्हणून ते संगीत क्षेत्रात नावाजलेले होते. हिंदी चित्रपटांतील अनेक गीतांना त्यांच्या व्हायोलिनने गहिरी छटा प्राप्त झाली आहे. चित्रपट संगीतात व्हायोलिन या वाद्याने जे अनन्यसाधारण महत्त्व  प्राप्त केले आहे, त्यास साजेशी त्यांची कामगिरी होती. तरीही अशा संगीतात नाव होते ते संगीतकाराचे, वाद्यवादकांचे नव्हे. होनप यांनी त्याही क्षेत्रात संगीतकार म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले. आजपर्यंत ९४ चित्रपटांना संगीत देऊन त्यांनी आपली मोहोर उमटवली. चित्रपट-शंभरीच्या उंबरठय़ावर असलेल्या होनप यांना तेथे शतक ठोकण्याची संधी होतीच. अकाली निधनाने ती संधी हुकली. मात्र एवढय़ा चित्रपटांना संगीत देण्याची संधी मिळालेल्या या संगीतकाराने कधी बडेजाव केला नाही. रंगीबेरंगी दुनियेत सतत झळकण्याची इच्छाही केली नाही आणि त्यासाठी धडपडही केली नाही. पदार्पणातच चमकोगिरी करणाऱ्यांच्या आजच्या काळात होनप यांचे वेगळेपण त्यामुळेच उठून दिसणारे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तरीही त्यांची खरी ओळख भक्तिसंगीतातच राहिली. संगीतात त्यांनी स्वत:चा वेगळा बाज तयार केला आणि भक्तिसंगीताच्या मुशीत तो समृद्ध केला. कीर्तन, भजन ही मराठी माणसाची संगीताची ओळख होण्याची पहिली स्वरस्थाने होती. देवळांमधील कीर्तनकार एकतारीवर कथा सांगता सांगता जे गाणे म्हणतात, त्यात उत्तम संगीत असते. सोपेपणा हा त्याचा पहिला निकष. त्यापाठोपाठ संगीतातील लाघवीपणा हे त्याचे दुसरे वैशिष्टय़. होनप यांच्याकडे या दोन्ही निकषांवर उतरता येण्याएवढी सर्जनशीलता होती. म्हणूनच त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक भक्तिगीते घराघरांत पोहोचली. नामांकित कलावंतांच्या गळ्यातून गाऊन घेतलेली ही गीते, मराठी माणसाच्या मूळ स्वभावाशी सुसंगत असल्याने, प्रचंड लोकप्रिय झाली. देवळातले संगीत स्वतंत्र बाज घेऊन अवतरण्यास जे जे संगीतकार कारणीभूत झाले, त्यात राम फाटक यांच्यासारख्या संगीतकाराचे नाव विसरता येणारे नाही. त्यानंतरच्या काळात नंदू होनप यांनीच एवढी मोठी कामगिरी केली. होनप यांच्यातील संतवृत्ती त्यांच्या स्वररचनांमध्येही सहजपणे मिसळून गेल्याने त्या रचना लोकप्रिय होण्यास अवधी लागला नाही. त्यांच्या अवचित निधनाने संगीतातील भक्ती निघून गेली आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nandu honap
First published on: 20-09-2016 at 04:20 IST