जगभरातील आंग्लभाषी कथा-लेखकांसाठी पंढरीसमान असलेल्या ‘ग्रॅण्टा’, ‘न्यू यॉर्कर’ आणि ‘हार्पर्स’ या तिन्ही व्यासपीठांवर तिशी-पस्तिशीच्या आत कथा झळकणाऱ्या भाग्यवंतांमध्ये लेस्ली नेका अरिमा या अमेरिकी-नायजेरियन लेखिकेची गणना होते. गेल्या दोन दशकांत अमेरिकी ‘देशीवादी’ साहित्यात धोपटवाटांचा अंगीकार मोठय़ा प्रमाणावर झाला. त्यामुळे वाचकांनी नव्या शक्यता धुंडाळणारे दक्षिण अमेरिकी, आशियाई आणि आफ्रिकेतील साहित्य लोकप्रिय केले. त्यातून प्रगतीकरणाच्या रेटय़ात या देशांतील बदलत्या जगण्याच्या बहुढंगी तऱ्हा सिद्धहस्त कथाकारांनी समोर आणल्या. आपल्याकडे दलित आत्मकथनांतील हादरवून सोडणाऱ्या अनुभवांचा जो जोर मराठी वाचकांनी अनुभवला होता, तसेच सध्या आफ्रिकेतील लेखकांच्या कथा वाचून जगभरच्या वाचकांचे होत आहे. गरिबी, उपासमार, दहशतवाद, धर्मभुलय्या, रूढी-परंपरा, अमली पदार्थाचा सुळसुळाट, तेलसंघर्ष, भ्रष्टाचार, टोळीयुद्ध या सर्वाचे ओझे अंगावर घेऊन ‘प्रगती’ करणाऱ्या या राष्ट्रांसाठी ‘बुकर’इतकेच महत्त्वाचे मानले जाणारे ‘केन’ पारितोषिक कथालेखनासाठी दिले जाते. यंदा लेस्ली नेका अरिमा हिच्या ‘स्किन्ड’ या कथेला हे पारितोषिक लाभले. नायजेरियामधील विशिष्ट जमातीत वयात आलेल्या मुलीला एका सोहळ्याद्वारे वस्त्रमुक्त केले जाते. स्वत:च्या हिकमतीवर कपडे विकत घेण्याची क्षमता असल्यास अथवा लग्नासाठी मागणी आल्यानंतर नवऱ्याच्या खर्चाने त्या मुलीला वस्त्रावरणात राहण्याची परवानगी मिळते. बारमाही गरिबी वास्तव्याला असलेल्या या भागात जर मुलीला लग्नाची मागणी आली नाही, तर तोवर रुमालाइतक्या वस्त्राचीही अंगाशी भेट करू दिली जात नाही. अरिमाच्या विजयी कथेमध्ये मागणी न आल्याने लग्न आणि नग्नत्व लांबलेल्या तरुणीची गोष्ट आली आहे. एकाच वेळी या भागातील रूढी-प्रथांवरच्या टीकेसोबत भ्रष्टाचार, जातिभेद आणि सामाजिक विसंगती यांकडे लक्ष वेधणारी ही कथा केन पारितोषिकासाठी निवडली जाणे स्वाभाविकच होते. लंडनमध्ये जन्मलेल्या, नायजेरियात वाढलेल्या आणि अमेरिकेत स्थायिक झालेल्या लेस्ली नेका अरिमा हिच्या शब्दांना बहुआयामी अनुभवांचे अस्तर आहे. तिच्या कथांमध्ये आफ्रिकी लोककथांचाही अंश दिसतो आणि पचविलेल्या विज्ञानकथांचाही भाग उमटतो. राष्ट्रकुल देशांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कथापुरस्कारावर तिने आपली छाप पाडली आहे. ‘व्हॉट इट मीन्स व्हेन अ मॅन फॉल्स फ्रॉम स्काय’ या लांबोडक्या नावाचा तिचा लघुकथा संग्रह गेल्या वर्षी गाजला. वैविध्यपूर्ण शैलीतल्या त्या कथा, नियतकालिकांतील पूर्वप्रकाशनापासून गाजत होत्याच. आफ्रिकी-अमेरिकी लेखकांच्या आजच्या पिढीची ती शिलेदार आहे. फेसबुकपूर्व आणि फेसबुकोत्तर आफ्रिकी समाजाची तिची निरीक्षणे विलक्षण आहेत. नायजेरियातील महिला, तरुणी आणि स्थलांतरितांच्या नजरेतून जग दाखविणाऱ्या तिच्या कथा स्त्रीवादाहून अधिक मानवतावादाचा अंगीकार करताना दिसतात. यंदाच्या केन पारितोषिकासाठी स्पर्धेत असलेल्या इतर कथांकडे नजर टाकली तर (सर्व कथा http://caineprize.com या संकेतस्थळावर आहेत.) प्रगतीच्या नादात उद्ध्वस्ततेकडे वाटचाल करणाऱ्या जगण्याचे दर्शन घडेल. मग लास वेगासमध्ये राहून आफ्रिकी मूळ शोधणाऱ्या अरिमाची कथा का निवडली गेली हेही उमगेल.
संग्रहित लेख, दिनांक 13th Jul 2019 रोजी प्रकाशित
लेस्ली नेका अरिमा
नायजेरियामधील विशिष्ट जमातीत वयात आलेल्या मुलीला एका सोहळ्याद्वारे वस्त्रमुक्त केले जाते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-07-2019 at 01:51 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigerian writer lesley nneka arimah profile zws