मुठीत सामावलेले ई-कॉमर्स आणि त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानामागील आर्थिक पाठबळ याच्या जोरावर जपानी सॉफ्टबँकही अल्पावधीत मोठी झाली. स्नॅपडील, ओयो रुम्स, हाऊसिंग डॉट कॉमसारख्या संकेतस्थळांच्या भक्कम आर्थिक उभारणीत सॉफ्टबँकेचा लक्षावधी डॉलरचा निधी ओघ होता. ई-कॉमर्सचे  वारे जेव्हा आशियाकडे वाहू लागले तेव्हा या बँकेनेही गुगलमधील मोहरा आपल्या ताब्यात घेतला. त्याचे नाव निकेश अरोरा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिवासी भारतीय असलेले अरोरा जन्माने उत्तर प्रदेशमधील गाजियाबादचे. आयआयटीमधून पदवी आणि ब्रिटनमध्ये एमबीए, एमएस केलेल्या अरोरा यांनी फिडेलिटी, पुटनॅम, टी-मोशन अशा निवडक कंपन्यांमध्ये नोकरी केली. अमेरिकेत २००४ मध्ये गुगलमध्ये येताच त्यांच्यावर युरोपातील व्यवसाय, मुख्य व्यवसाय अधिकारीपदाची जबाबदारी आली. दशकभराच्या आतच तेथे ते २०० कोटी रुपयांच्या विक्रमी वेतनाचे हकदार बनले.

४८ वर्षीय अरोरा २०१४ मध्ये सॉफ्टबँकेत आले तेव्हा त्यांचे वेतन ९०० कोटी रुपयांवर गेले होते. गुगलमध्ये सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अध्यक्ष व मुख्याधिकारी अरोरा यांचे सॉफ्टबँकेतील वार्षिक वेतनही विक्रमाच्या यादीतच राहिले. सॉफ्टबँकेत येण्यापूर्वी त्यांचे लग्न इंडियन सिटी प्रॉपर्टीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम थापर यांची कन्या आयेशा थापरशी झाले.

भारतात वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्सची बाजारपेठ ओळखत अरोरा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सॉफ्टबँक संस्थापक मासायोशी सन यांनी सोपविली. यापूर्वी ओलामधील २१ कोटी डॉलरची, स्नॅपडीलमध्ये ६२ डॉलरची, हाऊसिंग डॉट कॉममध्ये ९ कोटी डॉलरची आणि आत्ता आत्ता, जानेवारीमध्ये ग्रोफर्समध्ये १२ कोटी डॉलरची गुंतवणूक सॉफ्टबँकेने अरोरा यांच्या ध्येयधोरणांमुळेच केली. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर सन यांची भेट झाली तेव्हा त्यांनी अरोरा यांचेच नाव पुढे करून आपल्याला भारतीय कंपन्यांमध्ये सध्या असलेल्या एक अब्ज डॉलरचे गुंतवणुकीचे लक्ष्य लवकरच दहा पटींत नोंदविण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. दोनच वर्षांपूर्वी अरोरा यांची ओळख आपले उत्तराधिकारी म्हणून तमाम जगताला करून द्यावे लागणाऱ्या सॉफ्टबँक संस्थापक मासायोशी सन यांना अरोरा यांच्याबद्दल गुंतवणूकदार, भागधारक यांच्यामध्ये असलेली नाराजी अधिक काळ थोपवून धरता आली नाही.

मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक आणणे आणि त्याचबरोबर स्वत:चे मानधनही उंचावून घेणे हा अरोरा यांच्या करिअरचा वेगवान आलेख सॉफ्टबँकेच्या भागधारकांच्या जिव्हारी लागला. अशाच एका व्यवहारात अरोरांचे नाव जोडले गेल्यानंतर त्यांची अंतर्गत चौकशी झाली. परिणामी, अरोरा यांना कंपनीच्या ऐन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला रग्गड वेतन आणि पदावर पाणी सोडावे लागले. मात्र, जागतिक स्तरावर सर्वाधिक मानधन घेणारा ‘सीईओ’ म्हणून अरोरा यांची ओळख  ई-कॉमर्स मंचावर उमटलीच.

 

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nikesh arora
First published on: 23-06-2016 at 03:30 IST