रसायनशास्त्राचे आपल्या जीवनातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. विविध रोगांवरील औषधांचे रेणू तयार करण्यापासून मोबाइलच्या बॅटरीपर्यंत सगळे त्यातील संशोधनावर चालते. रसायनशास्त्रातील काही समस्या या अजूनही सुटलेल्या नाहीत. त्यावर आधी सैद्धांतिक पातळीवर तोडगा काढून नंतर उकल केली जाते. सैद्धांतिक रसायनशास्त्राच्या अप्रत्यक्ष मदतीने दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न सोडवता येतात. याच शाखेत संशोधन करणारे प्रा. पीटर पुले यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचा २०१७ मधील पुरस्कार जाहीर झाला आहे.
सध्या ते जे. विल्यम फुलब्राइट कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सेस या संस्थेतील रसायनशास्त्र व जैवरसायनशास्त्र विभागात मानद प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म हंगेरीत १९४१ मध्ये झाला, कुटुंबीयांसमवेत ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. अमेरिकेतील अर्कान्सा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातही ते सुप्रतिष्ठित प्राध्यापक आहेत. सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ ही त्यांची खरी ओळख.
सुरुवातीच्या काळात त्यांनी रेणूंचा आकार ठरवण्याचे तंत्र विकसित केले, त्यामुळे द्रव्याच्या अभ्यासाच्या पद्धती अधिक अचूक झाल्या. त्यांच्या संशोधनाचा आधार जगातील अनेक सैद्धांतिक रसायनशास्त्रज्ञ घेत आहेत. पुंज रसायनशास्त्रातील ग्रॅडियंट पद्धतीचा परिचय जगाला त्यांच्यामुळेच प्रथम झाला. त्यातून संगणकीय रासायनिक आज्ञावलीच्या मदतीने रेणूंच्या भौमितीय रचनांची मांडणी किंवा त्याचा अंदाज करणे सोपे झाले. कुठल्याही वैज्ञानिकाच्या संशोधनाचा संदर्भ इतर किती संशोधकांनी घेतला आहे यावरही त्याचे यश ठरते. पुले यांच्या संशोधनाचा संदर्भ १९९८ च्या नोबेल पारितोषिकाच्या संदर्भ साहित्यातही घेतला गेला आहे, यावरून त्यांच्या संशोधनाचे महत्त्व लक्षात येते. ‘पीक्यूएस कॉम्प्युटेशनल केमिस्ट्री’ या संगणक आज्ञावलीची निर्मिती त्यांनी केली आहे. ते जगातील ३०० महत्त्वाच्या रसायनशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. त्यांचा एका शोधनिबंधाचा संदर्भ तब्बल ३९०५ वेळा घेतला गेला आहे, तर इतर पाच शोधनिबंधांचा संदर्भ हजार वेळा घेतला गेला आहे. त्यांच्या सगळ्या संशोधन निबंधांचा विचार केला तर त्याचा संदर्भ २७००० वेळा घेतला गेला आहे. यावरून त्यांचा एच निर्देशांक ६४ म्हणजे खूपच अधिक आहे. रॉयल स्वीडिश अकादमीनेही त्यांच्या संशोधनाचा संदर्भ १९९८ च्या नोबेल पुरस्काराच्या वैज्ञानिक माहितीत अंतर्भूत करून त्यांचा बहुमान केला आहे. त्यांनी एकूण २२० शोधनिबंध व सहा पुस्तके लिहिली आहेत.
सैद्धांतिक रसायनशास्त्राबरोबरच त्यांनी स्पंदनात्मक वर्णपंक्तिशास्त्र, ग्रॅडीएंच पद्धती, रेणवीय पृष्ठभाग, चुंबकीय गुणधर्ममापन, रेणवीय इलेक्ट्रॉनिक रचनेचे गणन, मोठय़ा रेणूंची गतिकी या अनेक शाखांमध्ये संशोधन केले आहे. त्यांना नोबेल मिळाले नसले तरी नोबेलचा पाया असलेले मूलभूत संशोधन त्यांनी केले आहे; यातून त्यांच्या कामाची महती लक्षात येते.
हंगेरी विज्ञान अकादमीचे परदेशी सदस्य होण्याचा मान त्यांना १९९३ मध्ये मिळाला. आंतरराष्ट्रीय पुंज रेणवीय विज्ञान अकादमीचे ते सदस्य आहेत. अमेरिकन केमिकल सोसायटीचा पुरस्कार हा सैद्धांतिक रसायनशास्त्रातील अभिनव संशोधनासाठी दिला जातो. त्यातून अनेक महत्त्वाचे शोध लागण्याचा मार्ग मोकळा होत असतो. हा पुरस्कार यापूर्वी अनेक नोबेल विजेत्यांना मिळाला आहे, यातूनही या बहुमानाचे महत्त्व लक्षात यावे. १९८२ मध्ये पुले यांनी अध्यापनास सुरुवात केली व २०१६ मध्ये ते निवृत्त झाले. रसायनशास्त्राचे ‘रॉबर्ट बोस्ट मानद प्राध्यापक’ हा मोठा मानही त्यांना मिळाला. त्यांना आंतरराष्ट्रीय पुंज रेणवीय विज्ञान अकादमीचे पदक, अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट पुरस्कार, श्रॉडिंजर पदक असे अनेक मानसन्मान मिळाले.