पंजाब ट्रॅक्टर्स आणि स्वराज माझदाचे माजी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापैकीय संचालक चंद्र मोहन म्हणजे उद्योग आणि अप्रत्यक्ष कृषी क्षेत्रातील एका क्रांतिकारक बदलाचा चेहरा. गेल्याच आठवडय़ात त्यांचे निधन झाले. चंद्र मोहन यांनी पंजाब ट्रॅक्टरचे नेतृत्व तब्बल तीन दशकांहून अधिक काळ केले. सुमारे १५०० कोटी रुपयांच्या स्वराज माझदा समूहातील स्वराज इंजिन्स अँड स्वराज ऑटोमोटिव्ह या उपकंपन्या त्यांनी त्या गटातील वाहन, शेतीविषयक उपकरण निर्मितीसह विकसित केल्या. २००७ मध्ये पंजाब ट्रॅक्टर्स महिंद्र अँड महिंद्र समूहाकडे हस्तांतरित झाली. मात्र ‘स्वराज ट्रॅक्टर’चे १९७० च्या दशकात स्वत: आरेखन आणि तंत्रज्ञान विकसित करणारे चंद्र मोहन यांनी स्वराज ट्रॅक्टरला अल्पावधीत शेतकऱ्यांचे एक पसंतीचे उत्पादन बनविले. हरित क्रांतीचे हे एक महत्त्वाचे पान ठरले. एक आरेखक म्हणूनच व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात करणारे चंद्र मोहन हे तेवढेच तंत्रकुशलही होते. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये जन्मलेले चंद्र मोहन यांनी रुडकीच्या पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण सुवर्णपदक मिळवत पूर्ण केले. भारतीय रेल्वेत लागलेली नोकरी सोडून ते १९६५ मध्ये सेंट्रल मेकॅनिकल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये रुजू झाले. १९७० साली चंडीगडला येऊन त्यांनी देवगण, रेहल या आपल्या दोन सहकाऱ्यांसह पंजाब टॅक्टर्स लिमिटेड स्थापन केली. पुढे जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल झालेले एन. एन. वोहरा हे या कंपनीचे पहिले व्यवस्थापैकीय संचालक. चंद्र मोहन यांच्या या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल १९८५ मध्ये पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले. आयएमसी-जुरान जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. रिको इंडस्ट्रीजचे १९८५ ते २०१२ दरम्यान त्यांनी अध्यक्षपद भूषविले. उद्योग, निर्मिती क्षेत्रातील जपानी तंत्रज्ञानाने प्रभावित चंद्र मोहन यांनी हेच तंत्रज्ञान आपल्या पंजाब टॅक्टर्समध्येही आणले. जागतिक उद्यमशील संघटना ‘टाय’चे ते संस्थापक अध्यक्ष होते. ‘तुमच्या क्षमता आधी जाणून घ्या, आणि मग त्याला पूरक बाजारपेठेत संधी मिळवा’ असा मंत्र नेहमीच देणाऱ्या चंद्र मोहन यांनी आधी त्याची अंमलबजावणी केली आणि मग त्या दिशेने मार्गक्रमण करत यश मिळविले. नालंदा शाळा तसेच शिकण्याच्या वयातच उद्योगाचे धडे देणारे पंजाब तांत्रिक विद्यापी त्यांनी स्थापन केले. उद्यमशीलतेवरील त्यांची दोन पुस्तकेही प्रकाशित आहेत. ‘स्वप्न पाहणारे जगाला हवे असतात. मात्र त्यापेक्षा अधिक हवे असतात ते स्वप्न प्रत्यक्षात आणणारे’, असा मंत्र विद्यार्थी तसेच नव उद्यमींना देणाऱ्या चंद्र मोहन यांनी ही उक्ती तंतोतंत जोपासली.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2019 रोजी प्रकाशित
चंद्र मोहन
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये जन्मलेले चंद्र मोहन यांनी रुडकीच्या पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण सुवर्णपदक मिळवत पूर्ण केले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-12-2019 at 01:43 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile chandra mohan akp