मत्स्य संशोधनाची मळलेली वाट सोडून, सागरी जीवजंतू (फोरामिनिफेरा) या क्षेत्रात काम करणाऱ्या मोजक्या संशोधकांपैकी एक म्हणजे डॉ. राजीव निगम. त्यांना सागरी जीवशास्त्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा जे. ए. कुशमन पुरस्कार २०२२ साठी जाहीर झाला आहे. कुशमन फाऊंडेशनच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार कारकीर्द-गौरव स्वरूपाचा आहे. संशोधनाचे सातत्य आणि दर्जा या दोन्ही निकषांवर मानकऱ्यांची निवड होते. डेन्व्हर येथे जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या बैठकीत हा पुरस्कार पुढल्या ऑक्टोबरात प्रदान केला जाईल. आतापर्यंत विविध देशांच्या ४१ वैज्ञानिकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पण निगम हे पहिलेच भारतीय. सूक्ष्मजीव तसेच जीवाश्म या अवघड क्षेत्रात त्यांनी संशोधन केले आहे. डॉ. निगम यांनी लखनऊ विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली, नंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून त्यांनी भूगर्भशास्त्रात डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी घेतली. ऑस्लो विद्यापीठातून मायक्रोपॅलेंटोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवाश्मशास्त्रात पदविका केली. सागरी भूगर्भशास्त्रात त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे असून त्यांनी त्यासाठी सूक्ष्मजीवाश्मांचा आधार घेतला. सागरी प्रक्रिया, त्यांचा पर्यावरणाशी संबंध व जीवाश्मांच्या आधारे पर्यावरणाचा अभ्यास त्यांनी केला. सूक्ष्मजीवाश्मांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सागरी भूगर्भशास्त्रात संशोधन केले. अरबी समुद्रातील काही भूगर्भशास्त्रीय रचना त्यांनी अभ्यासल्या, तसेच ग्लेसबर्ग सौरचक्राच्या आधारे मोसमी पावसाचा ७७ वर्षांचा चक्रीय अभ्यास त्यांनी केला. सागरी पुरातत्त्वशास्त्रातील त्यांचे संशोधन (प्राचीन सागरी जीवाश्म) भारतातील लोथल हेच जगातील सर्वांत जुने बंदर, असे अनुमान मांडण्यास आधारभूत ठरले. खंबायतच्या आखातातील काही मानवी वसाहतींचा सागरी पातळ्यांच्या बदलांवरून त्यांनी अभ्यास केला. ढोलाविरा येथील एका महाकाय भिंतीचा शोध त्यांनी घेतला. सुनामी संरक्षणाची नांदी जुन्या काळातच झाली होती याचा तो पुरावा होता. नवीन जीवाश्म-हवामानशास्त्रीय प्रक्रियांचा अभ्यास त्यांनी केला. त्यातून प्रदूषणाच्या पातळीत सूक्ष्मजीवाश्मांचा वाटा किती आहे याचा वेध घेतला. डॉ. निगम यांना सीएसआयआरचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार, कृष्णन सुवर्णपदक, राष्ट्रीय खनिज पुरस्कार, साहनी पुरस्कार, भल्ला सुवर्णपदक असे मानसन्मान मिळाले. १९७८ पासून गोव्याच्या राष्ट्रीय सागरविज्ञान संस्थेत काम करणारे डॉ. निगम पुढे याच संस्थेच्या भूगर्भशास्त्रीय सागरविज्ञान व सागरी पुरातत्त्वविज्ञान विभागाचे प्रमुख झाले. त्यांनी पीएचडीसाठी किमान १५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांचे एकूण १६० प्रकाशित शोधनिबंध, जगभर संदर्भ म्हणून वापरले जातात.