लोकहिताचे लढे अभ्यासपूर्वक लढणे, हे डॉ. शांतिलाल कोठारी यांचे वैशिष्टय़ होते. लाखोळीची डाळ, मोहफूल हे शेती-वनातून मिळणारे उपज. मोहवृक्ष तर आदिवासींचा जणू जीवनाधारच. परंतु, सरकारने दोन्ही उपजांवर आरोग्य अहिताचा ठपका ठेवून त्यांच्यावर बंदी घातली. ही बंदी उठवण्यासाठी नागपूरचे डॉ. कोठारी यांनी निकराचा लढा दिला, तो यशस्वी करून दाखवला. यासाठीच्या चळवळीत त्यांनी ‘अकॅडमी ऑफ न्युट्रिशन इम्प्रूव्हमेंट’ ही संस्थाही उभारली. उदयपूरच्या राजस्थान कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरमध्ये साहायक प्राध्यापक, ऋषिकेश, हरिद्वारच्या औषध निर्मिती कंपनीत वरिष्ठ संशोधक साहाय्यक, नैनितालच्या फूड अ‍ॅण्ड न्युट्रिशन कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेल्या डॉ. शांतिलाल कोठारी यांनी कुठलाही स्वार्थ न बाळगता केवळ गरिबांची पिळवणूक होऊ नये, या एका कारणासाठी प्रदीर्घ काळ सरकारविरुद्ध सनदशीर मार्गाने संघर्ष केला. सरकारच्या चुकीच्या निर्णयांमधील शास्त्रीय कारणे शोधून सरकारला त्यांचे धोरण बदलण्यास बाध्य केले. सोयाबीन, मीठ, मोहफूल यांची उपयुक्तता सरकारला सांगण्यासाठी आपल्या पूर्ण हयातीत ३८ हजार पत्रे लिहिली. लोकहितास्तव असा ‘पत्रपराक्रम’ करणारे देशात कदाचित डॉ. शांतिलाल कोठारी हे एकमेव असतील. लाखोळी डाळ हा विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक आधार. परंतु, सरकारने त्यावर बंदी घातली. ती कशी चुकीची आहे हे डॉ. कोठारी यांनी सप्रमाण सिद्ध करून दाखवले. त्यासाठी अनेकदा बेमुदत उपोषणाचा मार्गही पत्करला. शेवटी तब्बल २५ वर्षांनी केवळ डॉ. कोठारी यांच्या अविरत संघर्षांमुळे सरकारला ही बंदी उठवावी लागली. मोहफुलांसाठीचा संघर्षही असाच दीर्घकाळचा. आदिवासींच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या मोहफुलांवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी डॉ. कोठारी यांनी गावकऱ्यांना जागृत केले, त्यांची आंदोलने उभी केली. मोहफुलांवर महाराष्ट्र सोडले तर कुठेही बंदी नाही, हे त्यांनी सरकारला खडसावून सांगितले. डॉ. शांतिलाल कोठारी यांचा एड्सविरोधातील लढाही बराच गाजला. मोठमोठे आकडे देऊन या आजाराला वलयांकित केले जात असताना डॉ. कोठारी यांनी या आजाराचा बागुलबुवा कसा आर्थिक लोभापायी उभा केला आहे, याचा पुराव्यानिशी युक्तिवाद केला. आपल्या म्हणण्याला आधार आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी चक्क एड्स्गस्ताचे रक्त आपल्या शरीरात टोचून घेण्याची तयारी दर्शवली. अशा या ज्ञात असूनही देशव्यापी प्रसिद्धीच्या दृष्टीने अज्ञातच राहिलेल्या डॉ. शांतिलाल कोठारी यांनी त्याबाबतचे कुठलेही शल्य मनात न बाळगता अखेर २८ जुलैला या जगाचा निरोप घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile dr shantilal kothari akp
First published on: 30-07-2021 at 00:33 IST