एल्टन जॉन

‘एल्टन जॉन’ यांचे रेजिनाल्ड केनेथ ड्वाईट हे जन्मनाव १९४७ पासून विशीपर्यंत पुरले.

आंतरराष्ट्रीय जनप्रिय (पॉप्युलर) संगीतात साठोत्तरीतील बंडखोरीची संकल्पना सत्तरोत्तरीत बाद झाली, कारण व्हीडिओ युगाचा आरंभ झाला आणि पुढे-पुढे व्हायरलक्लिपचा जमाना आला. या सर्व स्वरचक्रात कितीएक संगीतसमूह तयार झाले. कितीएक एकलप्रवाह तयार झाले. रॉकस्टार्स, पॉपस्टार्स, ब्लू-जॅझची पताका फडकाविणाऱ्या, मिश्रावटी सूर परजणाऱ्या मोहिन्यांची मंडळे निर्माण झाली. गानकलाकारांनी नृत्यादी हरकतींचा सोहळा दाखवत कानकलाकारांची जागतिक पिढी वगैरे ‘वर्ल्ड इज फ्लॅट’ तत्त्वज्ञान शून्यावस्थेत असताना घडविली. म्युझिक बॅण्ड्स फुटले, कलाकारांचे ताफेच्या ताफे अमली पदार्थांच्या, एड्सच्या वा स्वघृणेतून आत्मनाशाच्या वळणाला कवटाळून बसले. जुन्यांच्या बंडखोरची थट्टा होण्याचेही दिवस आले… पण या सर्व काळात  ब्रिटिश गायक ‘एल्टन जॉन’ या कलाकाराचे आंतरराष्ट्रीय पटलावर तळपत राहणे थांबले नाही… ब्रिटनच्या राजघराण्याने नुकताच त्याच्या मानाच्या तुऱ्यांनी गच्च भरलेल्या शिरपेचात मोठीच भर पाडली आहे!

 ‘मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ द कम्पॅनिअन्स ऑफ ऑनर’ हा नवा ब्रिटिश खिताब एल्टन जॉन याला राणीकडून देण्यात आलेल्या ‘सर’ या पदवीलाही कैक योजने मागे टाकणारा. १९१७ साली पंचम जॉर्ज यांनी कला, विज्ञान, औषधनिर्माण आणि राजकारणात सातत्याने मोठे योगदान देणाऱ्या, ‘हयात असणाऱ्या केवळ ६५ व्यक्तींसाठी’ हा सन्मान राखून ठेवला होता. ब्रिटन आणि राष्ट्रकुल देशांतील परमोच्च समजल्या जाणाऱ्या या सन्मानाचे मानकरी युद्धनियोजक विन्स्टन चर्चिल, विज्ञानमहर्षी स्टीफन हॉकिंग हे होते. हयात असलेल्या लेखिका मार्गारेट अ‍ॅटवूड,  जे.के.रोलिंग्ज,  पर्यावरणवादी- माहितीपटकार डेव्हिड अ‍ॅटनबरो या पासष्टपंथात एल्टन जॉन याचा समावेश होईल.

‘एल्टन जॉन’ यांचे रेजिनाल्ड केनेथ ड्वाईट हे जन्मनाव १९४७ पासून विशीपर्यंत पुरले. पण चौथ्या वर्षी पियानो आकलन, अकराव्यावर्षी संगीत शिष्यवृत्ती, या टप्प्यांनंतर सतराव्या वर्षी पारंपरिक शिक्षणचा संन्यास घेऊन स्वरहैदोस घालण्याचा त्याने विडा घेतला. बर्नी टोपिन या गीतकाराच्या जोडीने त्याची चार्टबस्टर्स गीतधारा सुरू झाली. बिनाका गीतमालाच्या अमेरिकी तसेच ब्रिटिश अवतारांमध्ये कित्येक आठवडे पहिल्या नंबरांत गाणी वाजण्याचे विक्रम त्याच्या नावे आहेत. तिसाहून अधिक अल्बम्सना पुरस्कार-सन्मानांच्या राशी मिळाल्या आहेत. भारतीयांना एफएम आणि आंतरराष्ट्रीय संगीतवाहिन्यांनी जी आंग्लसंगीत दीक्षा दिली; त्या काळात एल्टन जॉन यांच्या संगीत कारकीर्दीचा दुसरा टप्पा सुरू झाला होता. त्याच्या सुपरहिट गाण्यांचा भर ओसरला होता आणि अमली पदार्थ/व्यसनांनी घशावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या आवाजात वाल्मिकी थाटातले ‘सॅक्रिफाईझ’ हे गाणे दररोज एमटीव्ही, चॅनल व्ही वर पडिकांना ऐकाय-पहायला मिळत होते. त्याच दशकात त्याच्यावर ब्रिटिश राजघराण्याने गौरव, सन्मानांची मोहोर उमटवली. लेडी डायनाच्या शोकसभेतील ‘कॅण्डल इन द विण्ड’ त्याच्या शोकगीतालाही ब्रिटन-अमेरिकेत हिटपद मिळाले. फ्रेडी मक्र्युरी या आपल्या समकालीन कलाकार मित्राचा एड्सने मृत्यू झाल्यानंतर त्याने ‘एल्टन जॉन एड्स फाऊंडेशन’ उभारून जगभर एड्स रुग्णांवर उपचारांसाठी मदतीचे जाळे तयार केले. अमेरिकी गिटाराधीन रॉक संगीतात पियानोप्रभाव वाढवण्यात एल्टन जॉनचे साठोत्तरीतले प्रयोग कारणीभूत होते. ब्रिटिश संगीतसमूह बीटल्स आणि अमेरिकी गान-दिवा मॅडोना यांच्या तुल्यबळ प्रसिद्धी लाभलेला हा कलाकार जुना कधीच झाला नाही, हे त्याला मिळालेल्या नव्या सन्मानाने स्पष्ट केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Profile elton john akp

Next Story
अनलजित सिंग
ताज्या बातम्या