गर्ड म्युलर

जर्मनीने १९७२ मध्ये युरोपियन अजिंक्यपद आणि १९७४ मध्ये जगज्जेतेपद पटकावले, त्या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये म्युलर यांनी गोल झळकावले.

‘द बॉम्बर’ असा त्यांचा उल्लेख केला जाई, तो त्यांच्या गोलसातत्यासाठी. आक्रमकतेसाठी नव्हे. देशनिष्ठेइतकीच क्लबनिष्ठा पवित्र मानल्या जाण्याच्या काळात गर्ड म्युलर फुटबॉल खेळले. म्हणूनच जर्मन राष्ट्रीय संघाइतकेच बायर्न म्युनिच या क्लबकडूनही सातत्याने चमकले. १९५०-६०च्या दशकातील ब्राझीलचा संघ किंवा नवीन सहस्राकाच्या पहिल्या दशकाच्या उत्तरार्धातील स्पॅनिश संघ यांच्याइतकेच किंबहुना काकणभर अधिक वर्चस्व जर्मनीच्या संघाने १९७०च्या दशकात गाजवले. त्या काळातील जर्मन राष्ट्रीय संघाचे कर्ता-धर्ता होते विख्यात फुटबॉलपटू फ्रान्झ बेकेनबाउर. पण जिंकण्यासाठी गोल झळकावण्याचे काम करायचे गर्ड ‘द बॉम्बर’ म्युलर. जर्मनीसाठी त्यांनी ६२ सामन्यांमध्ये ६८ गोल झळकावले. कमी सामन्यांमध्ये अधिक गोल करण्याची ती किमया आजवर कोणालाही साधलेली नाही. एखाद्या खेळाडूची महती त्याचे विक्रम किती वर्षे किंवा किती दशके अबाधित राहतात यावरही ठरत असते. म्युलर यांचे अनेक विक्रम अलीकडच्या काळापर्यंत अबाधित होते. बायर्न म्युनिचसाठी एकाच हंगामात ४० गोल करण्याचा त्यांचा विक्रम गेल्या वर्षी रॉबर्ट लेवांडोवस्कीने मोडला. १९७२ मध्ये त्यांनी क्लब व देशासाठी एकाच वर्षात ८५ गोल झळकावले. तो विक्रम २०१२ मध्ये लियोनेल मेसीने मोडला. जर्मनीतर्फे सर्वाधिक ६८ गोल आणि दोन विश्वचषकांमध्ये मिळून १४ गोल हा दुहेरी विक्रम २०१४ मध्ये मिरोस्लाव्ह क्लोसाने मोडला. पण बायर्न म्युनिचसाठी ४२७ सामन्यांमध्ये ३६५ गोलांचा विक्रम अजूनही बरीच वर्षे अबाधित राहण्याची शक्यता अधिक. जर्मनीने १९७२ मध्ये युरोपियन अजिंक्यपद आणि १९७४ मध्ये जगज्जेतेपद पटकावले, त्या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यांमध्ये म्युलर यांनी गोल झळकावले. त्यातही १९७४ मधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य हॉलंडविरुद्ध केलेला विजयी गोल फुटबॉलरसिकांच्या अधिक स्मरणात राहील. तो सामना म्युलर यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील अखेरचा होता, पण आपल्या कारकीर्दीवर अशा प्रकारे खणखणीत शिक्कामोर्तब करणे फारच थोड्या फुटबॉलपटूंना जमले. त्यानंतरही क्लब फुटबॉलमध्ये म्युलर सक्रिय राहिले. १९७४ ते १९७६ अशी तीन वर्षे बायर्न म्युनिचने युरोपियन अजिंक्यपद पटकावले. म्युलर फार उंच नव्हते. पण धावणे आणि बुद्धीचे चापल्य गाठीशी असल्यामुळे विलक्षण वेगाने ते प्रतिस्पर्धी गोलक्षेत्रात मुसंडी मारत. सहा यार्डांच्या पेनल्टी क्षेत्रात चटकन चेंडूवर ताबा मिळवत गोल झळकावणे ही त्यांची खासियत. त्यांचे हेडरही विलक्षण परिणामकारक ठरत. म्युलर यांच्या जीवनाचा उत्तरार्ध फार सुखावह नव्हता. काही काळ अतिरिक्त मद्यसेवनाच्या आहारी ते गेले, शिवाय गेली सहा वर्षे स्मृतिभ्रंशाने त्यांना ग्रासले. या अवस्थेतच गेल्या आठवड्यात वयाच्या ७५व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण जर्मनी व बायर्न म्युनिचच्या सुवर्णकाळाचे साक्षीदारच नव्हे, तर भागीदार व शिल्पकार बनण्याचे त्यांचे श्रेय अमीट राहील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Profile gerd muller akp

ताज्या बातम्या