पी. के. वारियर

मोपल्यांच्या बंडावेळी (१९२१) मी जन्मलो, तेव्हा हिंदू व मुस्लीम तेढ विकोपास गेली होती.

विविध उपचारपद्धती अहंकार जपताहेत असे म्हणणे हे राजकारणासाठी सोयीचे असेल वा नसेल; पण या विविध उपचारपद्धतींचा आदर करीत, इतर पद्धतींची शिस्त बाणवीत आपली उपचारपद्धती अधिक समृद्ध करणे, हा विद्वत्तेचा पुरावा निश्चितच आहे. अशी विद्वत्ता पी. के. वारियर यांच्याकडे होती. ‘कोट्टकल आर्य वैद्य शाळे’चे प्रमुखपद अनेक वर्षे सांभाळलेले वारियर शतायुषी होऊन १० जुलैस निवर्तले. ही वैद्यशाळा १९०२ पासूनची, ती स्थापणारे पी. एस. वारियर हे त्यांचे दूरचे नातलग. पण ज्ञानाच्याच आधारावर पी. के. (पण्णियमपिल्ली कृष्णनकुट्टि) वारियर या संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि प्रमुख चिकित्सक झाले. याच संस्थेत पी. एस. वारियर (यांच्या आडनावाचे स्पेलिंग ‘व्ही’पासून) असताना पी. के. वारियर (हे ‘डब्ल्यू’पासून) यांचे शिक्षण झाले. पी. एस. यांच्याप्रमाणेच, अ‍ॅलोपॅथीची शिस्त बाणवून आयुर्वेदाला संशोधन, प्रयोगाधारित निष्कर्ष यांची जोड देण्याचा वसा पी. के. यांनीही जपला. पी. के. यांनी कोट्टकलच्या वैद्यशाळेत, वनौषधींचे रासायनिक- औषधशास्त्रीय गुण ओळखण्यासाठी रीतसर प्रयोगशाळेची स्थापना केली. विविध आजार/व्याधींचे ‘शोध’ अ‍ॅलोपॅथीने लावले असले तरी त्या-त्या वैशिष्ट्यांवर आयुर्वेदाने उपचार होऊ शकतील काय, हे पडताळण्यासाठी त्या व्याधींचा अ‍ॅलोपॅथिक अभ्यासही करणे, मग आयुर्वेदिक औषधींवरच केवळ न विसंबता योग, मसाज आदी अन्य पद्धतींनी काय फरक पडतो याचेही प्रयोग करत राहणे अशी अभ्यासद्वारे कोट्टकल वैद्यशाळेत त्यांच्यामुळे खुली झाली. याला ते ‘पूर्णात्मक (होलिस्टिक) उपचारपद्धती’ म्हणत आणि तिचा प्रसार हवा, असा आग्रहदेखील मांडत.

५०० वनस्पतींची माहिती देणारा ‘इंडियन मेडिनिसल प्लँट्स’ हा पाच खंडांचा ग्रंथ त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने लिहिला, तर वेळोवेळी त्यांनी लिहिलेल्या शोधनिबंधांचे संकलनही ग्रंथरूप झाले. ‘स्मृतिपर्वम्’ या त्यांच्या आत्मपर पुस्तकास केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. पद्माश्री (१९९९), पद्माभूषण (२०१०) व धन्वंतरी पुरस्कार हे सन्मानही त्यांना मिळाले. १९५४ मध्ये कोट्टकलच्या वैद्यशाळेची सूत्रे हाती घेतल्यावर, १९८७ मध्ये ‘आर्यवैद्यन्’ हे इंग्रजी शोध-त्रैमासिक सुरू करण्यातही त्यांचा पुढाकार होता.

‘मोपल्यांच्या बंडावेळी (१९२१) मी जन्मलो, तेव्हा हिंदू व मुस्लीम तेढ विकोपास गेली होती. पण पी. एस. वारियर यांनी सेक्युलर भूमिका घेतली’ असे, वयाच्या विशीत १९४२च्या चळवळीत भाग घेणारे पी. के. वारियर आवर्जून सांगत. हा संस्कार त्यांना आयुर्वेदाच्या दुरभिमान वा अहंकार यांच्या विषाणूपासून नेहमीच दूर ठेवत असे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Profile p k warrior akp

ताज्या बातम्या