प्राजक्त देशमुख

गेली कित्येक वर्षे नाटकाला साहित्याचा दर्जा मिळालेला नाही.

विठ्ठलाची बायको रखुमाई आणि संत तुकारामाची बायको आवली. देवस्वरूप रखुमाईत असलेले माणूसपण आणि सामान्य माणसाचे जिणे जगणाऱ्या, संसाराचा व्याप-ताप सोसणाऱ्या आवलीच्या अंगी असणारे देवत्व यांची सांगड घालत या दोघींमधल्या संवादातून त्यांच्या स्त्रीत्वाचा हुंकार पोहोचवणारे नाटक म्हणजे ‘देवबाभळी’. पौराणिक कथेतील संदर्भांचा आधार घेत, तात्त्विक- आध्यात्मिक विचारांच्या कोंदणातून जगण्याचे सार समजावून सांगणाऱ्या ‘देवबाभळी’ या नाटकाला प्रतिष्ठित अशा साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कित्येक वर्षांनंतर एका नाटकाला उत्कृष्ट साहित्यासाठीचा पुरस्कार मिळणे आणि इतक्या कमी वयात आध्यात्मिक विचारही सहजी उलगडून सांगण्याची प्रतिभा असणाऱ्या युवा साहित्यिकाचा गौरव ही किमया या नाटकाचा लेखक- दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याच्या अलौकिक प्रतिभेने साधली आहे.

मूळचा नाशिककर असलेला प्राजक्त गेली १५ वर्षे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका, राज्य नाट्यस्पर्धांच्या माध्यमातून आशयलेखन- मांडणीचे नवनवे प्रयोग करण्यात रमला आहे. विज्ञान शाखेचा पदवीधर आणि व्यवसाय व्यवस्थापनातील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या प्राजक्तचा कला क्षेत्रातील प्रवास हा अपघातानेच झाला आहे. पण एकदा या क्षेत्रात उतरल्यानंतर त्याचा सर्वांगाने परिपूर्ण अभ्यास करत त्यावर हुकूमत मिळवण्याच्या त्याच्या जिद्दीनेच या कलाप्रवासाला नवा आयाम मिळवून दिला आहे. एकांकिका लिहिणारा तरुण ते रंगभूमीवरचा आश्वासक लेखक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्राजक्तने अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्यासह इतर तांत्रिक बाबीही शिकून घेत त्यावर हुकूमत मिळवली आहे. सर्जनशील निर्मितीच्या आंतरिक इच्छेशी प्रामाणिक राहात एखाद्या विषयाचा वरवर अभ्यास न करता त्यात खोलवर उतरण्याच्या, नवे काही शोधून पाहण्याच्या त्याच्या प्रयोगशील धडपडीमुळेच व्यावसायिक रंगभूमीवर लेखक- दिग्दर्शक म्हणून त्याने खणखणीत यश मिळवले आहे.

‘देवबाभळी’ हा दीर्घांक व्यावसायिक रंगभूमीवर पूर्ण नाटकाच्या स्वरूपात अवतरला आणि त्याने नाट्यरसिकांचे मन जिंकले. संगीत नाटकांची परंपरा लयाला गेली अशी ओरड होत असतानाच या नाटकाने ३३३ प्रयोग आणि ४० हून अधिक पुरस्कार मिळवत हे म्हणणे खोटे ठरवले. मात्र तेवढ्यापुरतेच हे यश मर्यादित नाही. गेली कित्येक वर्षे नाटकाला साहित्याचा दर्जा मिळालेला नाही. पूर्वी नाटकांची पुस्तके  प्रकाशित होत असत, मात्र अलीकडच्या काळात आलेल्या नाटकांमध्ये साहित्यिक मूल्य कमी असल्याने प्रशांत दळवी, शफाअत खान, अभिराम भडकमकर अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशा नाटकककारांची पुस्तके  प्रकाशित होतात. या पार्श्वभूमीवर ‘देवबाभळी’ नाटकातील उच्च दर्जाच्या साहित्यिक मूल्यांचा सन्मान करणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार नाटकाला साहित्याच्या प्रवाहात पुन्हा स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत प्राजक्तची ‘बुद्रुकवाडीचा मारुती बाटला’ ही एकांकिका महाविजेती ठरली. ‘एकादशावतार’, ‘हमिनस्तु’, ‘१२ कि.मी.’, ‘दो बजेनिया’, ‘मून विदाऊट स्काय’सारख्या एकांकिकांमधून त्याने समकालीन विषयांवरही प्रगल्भ आणि टोकदारपणे भाष्य के ले आहे. सामाजिक आणि राजकीय विषयांवरही परखडपणे भाष्य करणारा, वर्तमानाशी घट्ट नाळ असलेला, संवेदनशील, प्रतिभावंत असा उत्तम तरुण लेखक-दिग्दर्शक म्हणून प्राजक्त देशमुख लवकरच मराठी रंगभूमीला नवे परिमाण मिळवून देईल असा विश्वास रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Profile prajakt deshmukha akp

ताज्या बातम्या