सारंगी या वाद्याचा भारतीय अभिजात संगीताशी फारच जवळचा संबंध राहिला आहे. तो इतका, की ब्रिटिशांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या हार्मोनिका आणि व्हायोलिन या वाद्यांना संगीताच्या मैफलीत चक्क प्रवेशबंदी करण्यात आली होती. आकाशवाणीवरील संगीत कार्यक्रमांतही प्रवेश मिळवण्यासाठी हार्मोनिका म्हणजेच हार्मोनिअम या वाद्यास स्वातंत्र्यानंतरही पंचवीस वर्षे लढा द्यावा लागला होता. हार्मोनिअमचा मोठा भाऊ असलेल्या ऑर्गन या वाद्याने संगीत नाटकांत आपले स्थान सारंगीच्या बरोबरीने पक्के करून टाकले होते. गळ्यातून निघणाऱ्या स्वरांशी तंतोतंत मिळणारे स्वर सारंगीतून व्यक्त होऊ शकतात. त्यामुळेच भारतीय संगीताचा अविभाज्य घटक बनलेल्या सारंगीला अनेक दशके अतिशय मानाचे स्थान मिळाले. हार्मोनिअमच्या आगमनानंतर सारंगी या वाद्याची पीछेहाट सुरू झाली. तशाही स्थितीत सारंगीला जिवंत ठेवणाऱ्या कलावंतांमध्ये पंडित रमेश मिश्र यांचे स्थान फारच वरचे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या वाद्याचा झगमगाट संपला आहे, त्याला जगाच्या नकाशावर तळपत ठेवण्याचे जे कार्य पं. मिश्र यांनी केले, त्यास तोड नाही. सुलतान खाँ यांच्यासारख्या दिग्गज कलावंताने आणि नंतरच्या पिढीतील त्यांच्या शिष्यवर्गाने सारंगी टिकवून ठेवली हे तर खरेच, परंतु पं. मिश्र यांनी सारंगीला पाश्चात्त्य संगीताच्या दरबारातही मोलाचे स्थान मिळवून दिले. पस्तीस तारा असलेल्या या वाद्यावर प्रभुत्व मिळवणे, ही फारच कठीण बाब. मिश्र यांना त्यांचे वडील पं. रामनाथ मिश्र यांच्याकडूनच तालीम मिळाली. सारंगीवादनातही गायनाप्रमाणे घराणी आहेत. पं. मिश्र हे त्यांपैकी बनारस घराण्याचे. त्यांनी या वाद्यावर नुसते प्रभुत्वच मिळवले नाही, तर त्यावर अनेक नवनवे प्रयोग केले. सारंगी हे मुख्यत: साथीचे वाद्य म्हणून पुढे आले. त्यावर स्वतंत्रपणे एकलवादन करण्यासाठी गायकाप्रमाणेच प्रतिभा असणे आवश्यक. पं. मिश्र यांनी भारतीय संगीतक्षेत्रात सारंगी अस्तंगत होत असतानाच अमेरिकेत प्रस्थान ठेवले. तेथील संगीतकारांना या अद्भुत वाद्याचा गळ्याशी असलेला ताळमेळ हा एक चमत्कार न वाटता तरच नवल! सतारवादक पं. रविशंकर यांनी भारतीय संगीताला तेथील संगीतकारांपर्यंत पोहोचवले होतेच. त्या पाश्र्वभूमीवर पं. मिश्र यांचे अमेरिकेतील स्थलांतर सुकर म्हणावे असे झाले. एरो स्मिथ या अमेरिकेतील प्रख्यात कलावंताबरोबर ‘नाइन लाइव्ह्ज’ या अल्बममध्ये रमेश मिश्र यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या तेथील अस्तित्वावर सांगीतिक शिक्कामोर्तब झाले. जगभर भारतीय संगीताच्या प्रसाराबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळणे ही स्वाभाविकच गोष्ट होती. पाकिस्तानला पाठवण्यात आलेल्या सांस्कृतिक शिष्टमंडळात त्यांना पं. नेहरू यांनी अगत्यपूर्वक आमंत्रित केले होते. पाश्चात्त्यांना भारतीय संगीताची गोडी लावणाऱ्या पं. रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांच्यानंतर पं. मिश्र यांचे कार्य अधोरेखित करावे एवढे मोठे आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramesh mishra
First published on: 15-03-2017 at 02:11 IST