आज आपण व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, यूटय़ूब, फेसबुक या समाजमाध्यमांच्या जगात अगदी लीलया वावरत आहोत. क्षणार्धात एखादा संदेश दुसऱ्या एखाद्यापर्यंत किंवा समूहापर्यंत पोहोचवण्याची किमया समाजमाध्यमांतून साधली आहे. पण हा सगळा प्रवास पूर्वी काही तंत्रवेडय़ा विक्षिप्तांनी केलेल्या अचाट प्रयोगांचे फलित आहे. असाच एक प्रयोग १९७८ मध्ये हौशी संगणकतज्ज्ञ रँडी स्यूस व त्यांचे सहकारी वार्ड ख्रिस्तेनसन यांनी केला होता, त्यातून ऑनलाइन बुलेटिन बोर्डचा जन्म झाला. त्यातून पुढे समाजमाध्यमांचा उदय झाला. या द्वयातील स्यूस यांचे नुकतेच निधन झाले.

जानेवारी १९७८ मध्ये त्यांनी ‘होम कॉम्प्युटर क्लब’ शिकागोत स्थापन केला होता. हौशी संगणकवेडय़ांचा हा कंपू. त्यात स्यूस व ख्रिस्तेनसन हे सूत्रधार. त्यांना एकदा संगणकावरून संदेश पाठवण्यासाठी नवीन यंत्रणा तयार करण्याची युक्ती सुचली. त्यांनी एक हार्डवेअर (यंत्र) व एक सॉफ्टवेअर (आज्ञावली) असे दोन प्रमुख घटक तयार केले. एका प्रमुख संगणकाला इतर संगणक व दूरध्वनी तारा जोडण्याचा हा प्रयोग होता. सुरुवातीला त्याचे नाव कॉम्प्युटर एलिटस कम्युनिकेशन प्रोजेक्ट असे ठरले, नंतर कॉम्प्युटराइज्ड बुलेटिन बोर्ड सिस्टीम म्हणजे सी-बीबीएस असे नाव ठरले. १९७० मध्ये त्यांच्या या यंत्रणेची माहिती व्यावसायिक नियतकालिकातून आल्यानंतर अनेकांनी असे ऑनलाइन सूचना फलक तयार केले.

रँडी जॉन स्यूस यांचा जन्म स्कोकी या शिकागोतील एका गावचा. ते आधी नौदलात होते. तेथे त्यांनी अनेक तांत्रिक कामे केली. आयबीएम व झेनिथमध्ये नोकरीही केली. नंतर ते शिकागोच्या हौशी संगणक क्लबमध्ये सामील झाले. त्या वेळी स्यूस व ख्रिस्तेनसन यांनी एस १०० या संगणकावर पहिला ऑनलाइन वार्ताफलक तयार केला. त्यात मोडेममुळे संदेश पाठवणे व स्वीकारणे याची सोय होती. त्यांच्या या यंत्राच्या माध्यमातून कुणीही लांब अंतरासाठीच्या कॉलला लागणारे पैसे न भरता संदेश पाठवू शकत असे. स्यूस यांनी नंतर ‘शि-नेट’ नावाची यंत्रणा उभारली जी ‘शिकागो नेटवर्क’ नावाने प्रसिद्ध होती. सॅटेलाइट रेडिओमार्फत त्यावर इंटरनेट चालत असे. नंतर एकाच प्रणालीवर पाच लाख कॉल स्वीकारण्याची सोय त्यांनी केली. त्यातूनच पुढे आधुनिक इंटरनेटचा जन्म झाला, तरीही पूर्वी सीबीबीएस बुलेटिन बोर्डच्या माध्यमातून रात्रभर जागून डाऊनलोड केलेले नवीन गेम, फोन लाइन मिळवण्यासाठी आईवडिलांशी केलेली स्पर्धा या आठवणी आजही पुसल्या गेलेल्या नाहीत, हेच स्यूस यांच्या संशोधनाचे मोठे फलित आहे.