‘‘मी अभिव्यक्ती करतो पण ती केवळ माझ्याच भावनांची नसते. ती तुमच्या- वाचकांच्याही भावनांची अभिव्यक्ती असते.’’ आणि ‘‘कविता दुबरेध असेल, तर लोकांपर्यंत ती पोहोचणार नाही. ती लोकांच्या भाषेतच असायला हवी’’ अशी स्पष्ट भूमिका घेणारे महत्त्वाचे कन्नड कवी के. एस. निसार अहमद ३ मे रोजी निवर्तले. त्यांच्या अनेक अजरामर कविता समूहगान म्हणून ध्वनिमुद्रित झाल्यामुळे आजही अनेकांना तोंडपाठ आहेत. राज्योत्सव पुरस्कार (१९८१), पम्पा प्रशस्ति (२०१७), कुवेम्पु विद्यापीठाची मानद डॉक्टरेट (२०१०) हे सन्मान त्यांना कर्नाटक सरकारकडून मिळाले होते; तर केंद्र सरकारकडून ‘पद्मश्री’ (२००८) किताबाने त्यांना गौरविण्यात आले होते. पहिले विश्व कन्नड साहित्य संमेलन १९८५ मध्ये भरले, त्याचे अध्यक्षपद निसार अहमद यांनाच मानाने देण्यात आले. त्यांच्या नऊ गाजलेल्या पुस्तकांमध्ये एक ललित गद्य आणि एक समीक्षापर पुस्तकही आहे; पण मूलत: कवी असलेल्या निसार अहमद यांना इतके प्रेम, इतकी कीर्ती मिळण्याचे कारण त्यांच्या कवितांतच शोधावे लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काळ्या ढगांआडून विजेसारखे लखलखतील शब्द माझे; ठिणगीप्रमाणे चमकून विझणार नाहीत, वणव्यासारखे पसरतील शब्द माझे..’ अशी बंडखोर काव्यगर्जना त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी केली होती खरी, पण ही बंडखोरी समाजाला आहे तसा स्वीकारणारी होती. निसार यांच्या एकूण कवितेने माणूस, निसर्ग, मानवी भावभावना आणि राजकारण यांकडे समदृष्टीने पाहिले म्हणून, काही समीक्षकांच्या मते, ती तत्त्वचिंतनाच्या पातळीला गेली. ‘नित्योत्सव’ या काव्यातून निसर्गरूपांचा उत्सव हा ‘राज्योत्सवा’पेक्षा वरचाच असतो ही भूमिका त्यांनी मांडली. थेट राजकीय भाष्य करण्याऐवजी उपरोधाचा आधार त्यांच्या राजकीय कवितांनी घेतला. त्यामुळेच, १९६३ साली चिनी आक्रमण झाले तेव्हा ‘कुरिगळु सार, कुरिगळु’ ही चिन्यांना ‘मेंढय़ांचा कळप’ म्हणून हिणवणारी कविता अवतरली; तर आणीबाणी घोषित करणाऱ्या इंदिरा गांधी १९७७ सालात म्हैसूरभेटीस आल्या असता ‘म्हैसूरचे प्राणिसंग्रहालय किती प्रख्यात, हरतऱ्हेचे प्राणी तेथे राहतात, सारेच कसे मुक्त फिरतात.. पण आपापल्या कुंपणात, आणि सारेच कसे संग्रहालय-प्रमुखांचे ऐकतात’ अशी कविता त्यांनी केली! मात्र, ‘सी. व्ही. रमण यांच्या निधनानंतर’ या कवितेत निसार अहमद यांनी खेडय़ातला हणम्या हा शेतकरीदेखील आणला आणि त्याला या मोठय़ा शास्त्रज्ञाच्या निधनाने काहीच कसे दु:ख नाही, असा साऱ्याच बुद्धिजीवींना पडणारा अस्तित्ववादी प्रश्नही ऐरणीवर आणला.

कन्नड साहित्यप्रवाहात ‘नव्य कविता’ हे एक मन्वंतर होते. कुवेम्पु (कुप्पळ्ळि वेंकटप्पा पुट्टप्पा) तसेच अन्य अनेक कवी या नव-काव्याच्या प्रवाहातील मानले जातात, त्यांपैकी निसार अहमद यांची कविता ही ‘मंचीय कविते’शी नाते सांगणारी होती. कुवेम्पु यांनी १९५९ मध्ये अवघ्या २३ वर्षांच्या निसार अहमद यांचे काव्यगुण हेरले, ते एका कविसंमेलनातच. त्यानंतर जणू निसार यांचे साहित्यिक पालकत्वच कुवेम्पु यांनी स्वीकारले. तोवर निसार अहमद हे भूगर्भशास्त्रात एम.एस्सी. झालेले होते. प्राध्यापकाची नोकरी करणाऱ्या, कोट-टाय घालणाऱ्या निसार अहमद यांनी लग्नही ‘आपल्या पसंतीची- बुरखा न पाळणारी’ मुलगी पाहूनच केले. पत्नीच्या मृत्यूनंतर (मार्च २०१९) ते खचले होते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renowned kannada poet k s nissar ahmed zws
First published on: 09-05-2020 at 01:43 IST