कुठल्याही स्वभाव-वृत्तीच्या वाचकाला जिव्हाळ्याची वाटेल, अशी दुर्मीळ होत चाललेली भावकविता लिहिणाऱ्या अनुराधा पाटील यांना ‘कदाचित अजूनही’ या संग्रहासाठी यंदाचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मूळच्या जळगाव जिल्ह्य़ातल्या पहूरच्या असलेल्या अनुराधाताई आता साठीत आहेत, पण वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच त्या लिहित्या झाल्या. लहानपणी नकळत्या वयापासून पाहिलेला भरल्या गोकुळासारखा गाव आणि आता या प्रदेशाची होणारी भयानक पडझड, अनागर स्त्रीच्या देहमनाची तलखी, एकूणच मानवी जगण्यातली वाढती तगमग आणि मृत्यूविषयीची संवेदना, हा अनुराधाताईंच्या कवितेचा आत्मा म्हणता येईल. १९८१ साली आलेला ‘दिगंत’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. त्यानंतर  ‘..तरीही’, ‘दिवसेंदिवस’, ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ असा २००५ सालापर्यंतचा त्यांचा काव्यलेखन प्रवास. या प्रवासातील प्रगल्भ टप्पा म्हणावा असा, ‘कदाचित अजूनही’ हा अनागर लोकपरंपरेतील स्त्रीसंवेदनांचे दर्शन घडवणारा त्यांचा संग्रह अगदी अलीकडे प्रसिद्ध झाला. कधीही कुठल्या साहित्यिक कंपूचा भाग न होता अनुराधाताईंनी आपल्या कवितेसह जगण्याचीही स्वायत्तता डौलदार राखली. त्या क्वचितच साहित्यिक-सांस्कृतिक मंचांवर जातात. मात्र अपवादाने जिथे जातील, तिथल्या भाषणात- ‘नवकविता, समीक्षा आणि वर्तमान साहित्य-संस्कृतीबाबत मोजक्या शब्दांत अप्रिय सत्य सुनावणाऱ्या’ ही त्यांची ओळख आहे. सार्वजनिक वावर खूप मर्यादित असला तरी, नव्या लिहित्या हातांना त्या भरभरून बळ देत दिशा दाखवतात.

स्त्रीजीवनासह कुठलीच सुरक्षितता नसलेल्या सामान्यांच्या जगण्यातले दृश्यादृश्य काच अनुराधाताईंची कविता संयत, घरगुती लहेजात सांगते. त्यातील- ‘पोपडे उडालेल्या भिंती शेणामातीनं सारवणारे मुकाट समंजस हात..’, ‘बाशिंगबळच कमी म्हणत विहिरीच्या तळाशी विसावणाऱ्या पोरी..’, ‘पाठीवर लादलं जातं सक्तीचं रेखीव कुबड..’, ‘नकाशावर न सापडणाऱ्या गावांच्या वाटा..’, ‘दुबार पेरणीच्या भयाभोवती आकसलेल्या दिशा..’ अशा साध्यासुध्या, तरी हरखून टाकणाऱ्या प्रतिमा चेहराविहीन व्यथांना आवाज देत राहतात. अनुराधाताईंची कविता अनेकदा आत्ममग्न, स्वसंवादी वाटते. पण वाचताना हळूहळू उमजत जाते की, ती वैयक्तिक आयुष्यातील दु:ख मांडताना वैश्विक आणि सार्वकालिक दु:खाचाही उदात्त चेहरा दाखवते. ‘कदाचित अजूनही’मध्ये तर आशय-विषयाचे वैविध्य ठळक जाणवते. पर्यावरण, माध्यमे, हिंसा, जगण्याला आलेला अनावश्यक वेग यावर कवितांतून त्यांनी केलेले भाष्य चिंतनगर्भ आहे. हरेक क्षण अदृश्य सोबत करणाऱ्या मृत्यूबाबत तर त्यांची कविता अनोखेपणाने बोलत राहते. ‘आतल्या काळोखात पाकळीपाकळीनं उमलत गेलेला मृत्यू..’, ‘हजारो पाकळ्यांचं काळं कमळ..’ अशा किती तरी प्रतिमा मृत्यूच्या अनोळखी प्रदेशात घेऊन जातात. ओढ लावणाऱ्या उदासीचा प्रवाह या कवितांतून वाहताना जाणवतो. थकल्याभागल्या संध्याकाळी चारदोन कष्टकरी बायांनी ओवरीवर बसत एकमेकींना चार सुखदु:खाचे बोल सांगावेत, तशी त्यांची कविता आहे. ती खुपणारे आचपेच गडदपणे मांडते; पण किंचितही आवाजी, आक्रस्ताळी होत नाही. तरी वाटय़ाला आलेल्याचा निमूट स्वीकार न करता बदलाचे दानही ती भवतालाकडे मागते अन् म्हणते, ‘बाळाची टाळू भरणारा मायाळू हात त्यांच्याही माथ्यावर असो..’