व्यावसायिक अवकाश संशोधनाचे कुठलेही प्रशिक्षण नसताना तामिळनाडूच्या एका छोटय़ा खेडय़ातील मुलाने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने अवघ्या ६४ ग्रॅम वजनाचा उपग्रह तयार केला. तो काही हौशी वैज्ञानिकाचा प्रयोग होता असे म्हणता येणार नाही, कारण हा उपग्रह अमेरिकेत नासाच्या व्ॉलॉप्स आयलंड येथून २२ जून रोजी अवकाशात सोडण्यात आला. हा उपग्रह तयार करणारा किशोरवयीन वैज्ञानिक आहे रिफत शारूक. तो अवघा १८ वर्षांचा आहे. त्याने ‘कलामसॅट’ हा जगातील आतापर्यंतचा सर्वात कमी वजनाचा उपग्रह अवकाशात सोडण्याचा उपक्रम तोही नासाच्या मदतीने यशस्वी करून इतिहास घडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय विद्यार्थ्यांनी यापूर्वीही असे उपग्रह तयार केले ते इस्रोच्या मदतीने सोडले गेले, पण शारूक व त्याच्या चमूचा उपग्रह नासाच्या अग्निबाणाने सोडला गेला हे वेगळेपण. त्याचा हा इवलासा उपग्रह नासाच्या त्या महाकाय अग्निबाणाच्या सोबतीने सोडला गेला तेव्हा १२५ मिनिटांत प्रक्षेपकापासून वेगळा झाला व १२ मिनिटे त्याने सूक्ष्म गुरुत्वात काम केले. त्रिमिती कार्बन फायबरच्या उपग्रहाची क्षमता तपासणे हा या मोहिमेचा मूळ हेतू होता असे रिफत सांगतो. ‘नासा’ व ‘आय डुडल लर्निग’ यांनी संयुक्तपणे ‘क्युबस इन स्पेस’ ही स्पर्धा आयोजित केली होती, त्यात रिफतचा हा उपग्रह निवडला गेला. चार मीटरच्या घनाकृतीत बसेल असा ६४ ग्रॅमचा उपग्रह तयार करणे हे या स्पर्धेतील आव्हान होते. रिफत व त्याच्या चमूला तामिळनाडू सरकारने आता १० लाख रुपये बक्षीस म्हणून दिले आहेत. रिफत हा तामिळनाडूतील करूर जिल्ह्य़ातील पल्लापट्टीचा असून त्याला या प्रकल्पात ‘स्पेसकीड्स’ या संस्थेची आर्थिक मदत होती. कार्बन फायबरवर त्रिमिती छपाई करून कलामसॅट उपग्रह तयार केला होता. एवढा लहानसा उपग्रह असूनही त्याच्यावर तापमान व आद्र्रता संवेदक होते व अवकाशातील प्रारणांचे मापन करण्यासाठी नॅनो गेजर म्युलर काऊंटर त्यात होता. या उपग्रहाचे काही भाग परदेशातील व काही स्वदेशी होते. माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आले. त्रिमिती छपाई तंत्राने तयार केलेला हा रिफतचा पहिलाच उपग्रह. आम्ही शून्यातून सुरुवात केली. एक संगणक व आठ संवेदक यांच्या मदतीने पृथ्वीचे चुंबकीय आवरण, त्वरण यांचा अभ्यास आम्ही केला तरी कमी वजनाचा उपग्रह तयार करणे आव्हानच होते असे रिफत सांगतो. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ मध्ये त्याने १२०० ग्रॅमचा हेलियम बलून तयार करून तो केलामबक्कम येथून अवकाशात सोडला होता, तो हवामान अभ्यासासाठी वापरण्यात आला. भारतात खासगी अवकाश संशोधन संस्था स्थापन करण्याचा त्याचा मानस आहे. कलामसॅट उपग्रह मोहिमेच्या प्रकल्प संचालक चेन्नई येथील श्रीमती केशन या होत्या. त्यांच्या निवासस्थानी या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. खराब हवामानामुळे या वेळीही कलामसॅटची अवकाशवारी लांबणीवर पडणार होती पण सुदैवाने हे उड्डाण पार पडले व आमचे स्वप्न पूर्ण झाले, असे त्या सांगतात. हा उपग्रह नंतर सागरात कोसळला असून आता नासा तो भारतात पाठवणार आहे. त्यानंतर त्यातील माहिती उलगडली जाईल. अवघ्या बारा मिनिटांच्या प्रयोगात गवसलेले सत्य त्यातून समजेल. त्यातील माहितीविषयी सर्वानाच उत्कंठा आहे. आतापर्यंत इस्रोच्या कामगिरीने जगाचे लक्ष वेधले असले तरी आता खासगी पातळीवर संशोधन करणारे विद्यार्थी गटही आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करून जगाचे लक्ष भारताकडे वेधत आहेत. आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमी नाही, फक्त प्रतीक्षा असते योग्य संधीची.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rifath sharook
First published on: 26-06-2017 at 00:31 IST