‘मराठी शाळा वाचवा,’ असा टाहो फोडणाऱ्यांची संख्या कमी नाही; परंतु त्यासाठी नेमके काय करावे, कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे सुचविणाऱ्यांची कमतरता आहे. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि नाशिकमधील ‘आनंद निकेतन’ या प्रयोगशील शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर हे मात्र मराठी शाळा वाचविण्याचे आवाहन करून थांबले नाहीत, तर त्यासाठी राज्यपातळीवर लढा उभारला. मराठी शाळांसाठी योजना, उपक्रमांची आखणी करीत शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला. शैक्षणिक क्षेत्रातील साचलेपण दूर करण्यासाठी वेगळी वाट अनुसरणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन प्रयोगशील शिक्षणाचा त्यांनी आग्रह धरला. त्यासाठी आनंद निकेतन ही प्रयोगशील शाळा सुरू केली. या शाळेतील विद्यार्थी इतर कोणत्याही शाळांमधील विद्यार्थ्यांइतकेच हुशार असतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. शिक्षण क्षेत्रात या शाळेने आपला स्वतंत्र ठसा उमटविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय असणारे ठाकूर हे मूळ नाशिकचे. त्यांचे वडील कृष्णराव ठाकूर हे पोलीस दलात होते. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांची बदली होई. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासह परिवारातील सदस्यांना जावे लागे. कृष्णराव यांच्या मृत्यूनंतर ठाकूर कुटुंबीयांचा नाशिकमध्ये कायमचा मुक्काम झाला. पतीच्या आकस्मिक मृत्यूनंतर डगमगून न जाता सुशीला यांनी विजया, शोभा, शकुंतला या तीन मुलींसोबत अरुण यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. मॉडर्न हायस्कूल व पेठे विद्यालयात अरुण यांचे विद्यालयीन शिक्षण झाले. भि. य. क्ष. महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. या काळात त्यांचा सेवादलाशी संबंध आला. लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता मूल्यांची ओळख झाली. सेवादलात कार्यकर्ता म्हणून त्यांची जडणघडण झाली. सेवादलात काम करतानाच त्यांनी अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. विद्यापीठाच्या ‘नामांतर आंदोलना’त त्यांना कारागृहात जावे लागले. या ठिकाणी समविचारी मंडळींशी संपर्क आला. युवावर्गाला दिशा देण्यासाठी त्यांनी कारागृहातूनच तरुणांचे संघटन असलेल्या समता आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली. सेवादलासाठी कार्यकर्त्यांची जडणघडण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की करणे, त्यांच्या विचारांना दिशा देणे, यासाठीचे काम त्यांनी सुरू केले. समता आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेले शंभरपेक्षा अधिक कार्यकर्ते आजही सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. समता आंदोलनाबरोबर बाबा आढाव यांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आंतरजातीय विवाह, जाती तोडो आंदोलनात अरुण ठाकूर यांनी सहभाग घेतला. याशिवाय परित्यक्तांच्या समस्या आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर गुजरात, महाराष्ट्रात सर्वेक्षण, अभ्यास करीत त्यांनी ‘नरक सफाईची गोष्ट’ या पुस्तकातून आवाज उठविला. अरुण ठाकूर यांच्या निधनाने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात वेगळी वाट धुंडाळणारा एक अवलिया कायमचा निघून गेला. त्यांच्या शिकवणुकीनुसार चालण्याची जबाबदारी आता त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची आहे.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior educationist arun thakur profile
First published on: 23-03-2019 at 01:10 IST