‘तेल ही आपली निसर्गसंपत्ती आहे. मग तिचे नियंत्रण ,आर्थिक नियमन पाश्चिमात्त्य राष्ट्रांकडे का असावे’ असे अवघड प्रश्न उपस्थित करणारा अरबांचा तेल राष्ट्रवाद १९७०च्या दशकात मूळ धरू लागला. या बदलत्या दृष्टिकोनाचे प्रणेते होते सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री शेख झाकी यामानी. तेलसमृद्ध सौदी अरेबियाचे सर्वाधिक काळ  (१९६२ ते १९८६) तेलमंत्री राहिलेले यामानी काही मूलभूत बदलांचे साक्षीदार होते. काही अत्यंत दूरगामी निर्णय त्यांनी घेतले. त्यांतील प्रमुख आणि सुपरिचित होता, १९७३मधील ‘ऑइल शॉक’चा निर्णय. त्या वर्षी उद्भवलेल्या दुसऱ्या अरब-इस्रायल संघर्षांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व इतर इस्रायलधार्जिण्या पाश्चिमात्त्य देशांना तेल न विकण्याच्या निर्णयाचा मोठा फटका तेव्हा आघाडीच्या अर्थव्यवस्थांना बसला होता. त्या काळात तेलाचे भाव प्रतिबॅरल ३ डॉलरवरून १२ डॉलरवर पोहोचले. चढय़ा भावांचा मोठा फायदा ‘ओपेक’च्या सदस्य देशांना झाला होता. इस्रायलला धडा शिकवण्यासाठी व पॅलेस्टाइनला न्याय मिळावा म्हणून तो निर्णय घेतल्याचे यामानी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते. त्या निर्णयाविषयी नाही, तरी त्यातून तेल भावांच्या चढ-उतारांची जी चटक ‘ओपेक’ला लागली, त्याबद्दल यामानींनी नंतर खंत व्यक्त केली. तेलाचे राजकारण, अर्थकारण आमूलाग्र बदलून टाकणाऱ्या या मुत्सद्दय़ाचे अलीकडेच निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यामानी यांचा जन्म मक्केतला. त्यांचे आजोबा आणि वडील तेथे धर्मगुरू व धार्मिक वकील होते. यामानी यांनी मात्र पारंपरिक शिक्षण घेतल्यानंतर पाश्चिमात्त्य उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले. हार्वर्ड येथे कायद्याचे शिक्षण घेतल्यामुळे त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व होते. पारंपरिक सौदी पोशाखाऐवजी सूट-बुटात वावरल्याने आणि सावकाश, मुद्देसूद मते मांडण्याच्या लकबीमुळे अमेरिकी तेलउद्योगातील धुरिणांसह तेथील माध्यमांशीही त्यांची जवळीक निर्माण झाली. सौदी राजघराण्यातील नसूनही त्यांनी स्वकर्तृत्वावर प्रथम राजे फैसल आणि नंतर राजे फहाद यांचा विश्वास संपादन केला. व्हिएन्नात १९७५मध्ये ऐन ‘ओपेक’ परिषदेत त्यांचे  अपहरण झाले! सूत्रधार होता, त्यावेळचा सर्वाधिक कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी इलिच रामिरेझ सांचेझ ऊर्फ कालरेस द जॅकल! यामानी यांची हत्या करण्याचाच म्हणे कालरेसचा डाव होता. परंतु या क्रूरकम्र्याशीही यामानींनी संवाद साधला. यामानी यांच्या सुटकेत या संवादाचा वाटा होता असे काहींना आजही वाटते. १९७३मधील तेल पेचानंतर अरेबियन अमेरिकन ऑइल कंपनीचे राष्ट्रीयीकरण हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे योगदान. आज ती कंपनी ‘अराम्को’ म्हणून ओळखली जाते!

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sheikh zaki yamani profile abn
First published on: 25-02-2021 at 00:06 IST