दहा वर्षे वयाचा एक मुलगा केम्ब्रिजमध्ये नेहमीप्रमाणे वाचनालयात गेला व तेथे त्याला एक पुस्तक मिळाले. त्यात एक गणिती कूटप्रश्न होता. तो त्याने वाचला तेव्हा या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ध्यासच जणू त्याने घेतला. तो कूटप्रश्न १६३७ मध्ये फ्रेंच गणितज्ञ पिअर द फेरमॅट याने सिद्धांताच्या रूपात मांडला होता, पण तो कुणाला सिद्ध करता आला नव्हता. तो या मुलाने १९९४ मध्ये संशोधनाअंती सिद्ध केला त्याचे नाव सर अ‍ॅण्ड्रय़ू वाइल्स. त्यांना यंदा गणितातील नोबेल मानला जाणारा सात लाख डॉलर्सचा आबेल पुरस्कार मिळाला आहे. नॉर्वे विज्ञान व साहित्य अकादमी हा पुरस्कार देते. ऑक्सफर्डच्या मॅथॅमॅटिकल इन्स्टिटय़ूटच्या इमारतीला वाइल्सचे नाव दिले आहे. लहान मुलांमध्येही ते लोकप्रिय. त्यांच्या गणितावरील भाषणांना मुलांची गर्दी असते, त्यांच्याबरोबर छायाचित्र काढण्यास मुलांची रांग लागते. साडेतीनशे वर्षे जो कूटप्रश्न कुणालाही सुटला नव्हता तो वाइल्स यांनी सोडवला. ते सध्या ऑक्सफर्डमध्ये गणिताचे प्राध्यापक आहेत.
पाचचा वर्ग २५ हा पुन्हा दोन संख्यांच्या वर्गामध्ये विभाजित करता येतो म्हणजे पाचचा वर्ग बरोबर तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग पण आपण एखाद्या संख्येचा घन, चौथा घात, पाचवा घात असलेली संख्या घेतली, तर त्या संख्येचे असे विभाजन पूर्णाकी संख्यांच्या मदतीने करता येत नाही किंबहुना त्याचे उत्तर पूर्णाकात (there cannot be any positive whole numbers x, y and z such that xn + yn = zn, if n is greater than 2.) काढता येत नाही असे फेरमॅटचे म्हणणे होते. वाइल्स यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात शिकवत असताना अनेक वर्षे त्यावर काम केले. त्यानंतर सहा वर्षांनी त्यांना नाइटहूड (सर किताब) मिळाले.
गणितात सगळ्यांनाच गोडी व गती असते असे नाही. वाइल्स यांना मात्र गणिताची आवड होती, लहानपणापासून त्यांनी फेरमॅटचे समीकरण सिद्ध करण्याचा ध्यास घेतला व तो पूर्ण केला, या शोधामुळे आत्मतृप्तीची भावना त्यांच्या मनात होती. अँड्रय़ू वाइल्स यांचा जन्म ब्रिटनमधील केंब्रिजचा. नंबर थिअरी हा त्यांचा संशोधनाचा प्रमुख विषय. विशेष म्हणजे लघुग्रह क्रमांक ९९९९ ला वाइल्स यांचे नाव १९९९ मध्ये देण्यात आले आहे. वाइल्स यांच्यावर बीबीसीने द प्रूफ हा माहितीपट काढला आहे.
त्यांच्या जीवनावर आधारित ‘फेरमॅट्स लास्ट थिअरम’ हे पुस्तक सिमॉन सिंग यांनी लिहिले आहे. ते रॉयल सोसायटीचे फेलो असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे त्यात वुल्फ गणित पुरस्काराचाही समावेश आहे. गेल्या वर्षी जॉन नॅश ज्युनियर व लुईस निरेनबर्ग यांना हा पुरस्कार मिळाला होता. भारतीय वंशाचे अमेरिकी गणितज्ञ आर. श्रीनिवास वर्धन यांनाही प्रॉबेबिलिटी थिअरी व युनिफाईड थिअरीतील संशोधनासाठी हा पुरस्कार २००७ मध्ये मिळाला होता.