‘पुस्तके मानवी संस्कृतीला प्रवाही ठेवण्याचे काम करतात’, यावर सुधीर देव यांचा अटळ विश्वास होता. मात्र, अर्थार्जनाचे गणित जुळवत जगणारा मध्यमवर्गीय माणूस मनात इच्छा असूनही पुस्तकांची ही श्रीमंती अनुभवू शकत नाही, याची खंतही त्यांना होती. त्यांची ही खंतच अनेकांना पुस्तकांकडे नेणारी ठरली! सुधीर देव यांनी स्थापन केलेल्या माझा ग्रंथ संग्रह अर्थात ‘माग्रस’ या अभिनव ग्रंथ वाचन चळवळीने अर्धशतकाचा प्रदीर्घ प्रवास करून एका अख्ख्या पिढीला सुसंस्कृत केले. नागपुरातील सुधीर देव हे तसे सरकारी नोकरदार. पाचवा, सहावा वेतन आयोग वगैरे शब्द जन्मालाही आले नव्हते असा तो साठच्या दशकाचा काळ. मध्यमवर्गीयांच्या तुटपुंज्या पगारात नवीन पुस्तकांची मिजास परवडत नव्हती. त्या काळात देवांच्या प्रयोगशील डोक्यात एक कल्पना आली. ‘माझा ग्रंथ संग्रह’ असे त्याचे नामकरणही झाले. या ‘माग्रस’च्या सदस्यांनी महिन्याच्या शेवटी जमेल तितकी रक्कम देवांकडे गोळा करायची व वर्षांच्या शेवटी त्यातून हवी ती पुस्तके खरेदी करायची. पुस्तकप्रेमींनी ही कल्पक योजना अक्षरश: डोक्यावर घेतली. आधी केवळ नागपूरपुरती मर्यादित असलेली ‘माग्रस’ पुढे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. स्वत: देवांनी अनेक वर्षे सायकलवर फिरून हे शब्दधन घराघरांत दिले. या पुस्तक चळवळीने महाराष्ट्राचा उंबरठा ओलांडून भोपाळ, हैदराबाद आणि दिल्लीही गाठली. लेखक, अभिनेते, चित्रकार, गायक, डॉक्टर, वकील, अभियंता, पत्रकार, प्राध्यापक असे सर्व स्तरांतील लोक देवांच्या या अभिनव संकल्पनेचा भाग झाले. दोन-तीन दशकांच्या प्रवासानंतर ‘माग्रस’चे रूप पूर्णत: बदलून गेले. पुस्तकप्रेमींच्या या चळवळीला विशेष असे सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे मग ग्रंथखरेदीसोबतच साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वाढली. दिवसागणिक सदस्यसंख्येचा आलेख उंचावत गेला. त्या काळातील सर्व प्रमुख दैनिकांना ‘माग्रस’ची आदरपूर्वक दखल घ्यावी लागली. अगदी ठरवून एखाद्या सदस्याची घरी मासिक बैठक, नंतर वार्षिक मेळावा अशी मजल-दरमजल करीत ‘माग्रस’ने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. चांगला प्रतिसाद आणि नावलौकिक कमावलेली ही चळवळ देव यांनी त्यांच्या सौभाग्यवती अपर्णा देव व काही समर्पित सहकाऱ्यांच्या मदतीने २०१८ पर्यंत नेटाने चालवली. २०१८ मध्ये अपर्णा देव यांच्या मृत्यूनंतर सुधीर देव हैदराबादला मुलाकडे राहायला गेले. वाढत्या वयानुसार शरीर थकत गेले आणि अखेर २३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी सुधीर देव यांनी जगाचा निरोप घेतला.