पन्नासच्या दशकाच्या मध्यास ते अमेरिकेत फिरले. दोन वर्षांत अमेरिकेतील ४८ राज्यांत दहा हजार मैलांहून अधिक अंतर एका जुन्या मोटारगाडीतून त्यांनी पालथे घातले. कशासाठी? तर छायाचित्रांसाठी. या स्वैर भटकण्यात त्यांनी २७ हजारांहून अधिक छायाचित्रे टिपली. त्यातील निवडक ८३ छायाचित्रांचे पुस्तक आले १९५९ साली. ‘द अमेरिकन्स’ या शीर्षकाने. या निव्वळ छायाचित्रांच्या संग्रहातील चित्रांनी त्या वेळच्या अमेरिकेचा अंत:स्थभाव नेमका पकडला. त्यात दिसलेली अमेरिका ही तोवर सिनेमा वा नियतकालिकांतून दाखविली गेलेली चकचकीत अमेरिका नव्हती. त्यात जशी शहरे दिसली, तशी गावेही. गोरे दिसले तसे काळेही. मुख्य म्हणजे, या साऱ्यांतल्या संबंधांचे लिप्ताळे दिसले. त्यातून आधीच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली अन् नवे प्रश्नही उपस्थित झाले. त्यांची उत्तरे पुढे नागरी हक्कांच्या चळवळींना, बहुसांस्कृतिकतेच्या पुरस्कर्त्यांना, युद्धविरोधी गटांना शोधावी लागली. त्यामुळे अमेरिका काय आहे आणि कशी असावी, हेच जणू त्या ८३ छायाचित्रांनी तपासायला भाग पाडले असे म्हणता येईल. म्हणूनच त्या छायाचित्रांमागची दृष्टी.. रॉबर्ट फ्रँक हे सोमवारी, वयाच्या ९४ व्या वर्षी निवर्तले आणि अमेरिकेसह जगभरचे अनेक जण त्यांनी छायाचित्रांतून उपस्थित केलेल्या प्रश्नांचा पुन्हा एकदा विचार करते झाले.
अमेरिकेवरच्या छायाचित्रांमुळे चर्चेत आले असले, तरी रॉबर्ट फ्रँक हे मूळचे स्वित्झर्लंडचे. १९२४ साली तिथल्या ज्यू कुटुंबातला त्यांचा जन्म. घरचे सारेच व्यापारी वृत्तीचे. त्याचा रॉबर्ट यांना तिटकारा. त्यातून सुटायचे म्हणून ते छायाचित्रणकलेकडे वळले. १९४१ पासून छायाचित्रणकला शिकायला त्यांनी सुरुवात केली. पुढे सहाएक वर्षे त्यांनी व्यावसायिक छायाचित्रण केले. अगदी ग्राफिक डिझाइन स्टुडिओंमध्येही कामे केली. त्यात मधे ‘फोर्टी फोटोज्’ हा छायाचित्रांचा हस्तसंग्रहही काढला. पण नेमके मर्म सापडत नव्हते, म्हणून अमेरिकेला आले. तिथे फॅशनसृष्टीतील बडे प्रस्थ असलेल्या अॅलेक्सी ब्रोडोविच या छायाचित्रकाराच्या पारखी नजरेने त्यांना हेरले. ‘हार्पर्स बझार’ या फॅशन या विषयाला वाहिलेल्या नियतकालिकासाठी छायाचित्रे काढण्याची संधी फ्रँक यांना मिळाली. फ्रँक हे ३५ मिमी लैका कॅमेरा वापरत. फॅशन छायाचित्रणासाठी तो वापरला जात नसे, तरी फ्रँक यांनी त्या कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्रे प्रसिद्ध झाली. परंतु लवकरच फॅशन छायाचित्रणातला तोकडेपणा त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी ते काम सोडले. मग काही वर्षे ‘लाइफ’, ‘चार्म’, ‘लुक’ आदी प्रसिद्ध नियतकालिकांसाठी त्यांनी मुक्तछायाचित्रकारिता केली आणि मित्रांच्या सांगण्यावरून एके वर्षी ‘गुगेनहाइम फेलोशिप’साठी अर्ज केला. तो स्वीकारला गेला. त्यांना पाठय़वृत्ती मिळाली आणि ते अमेरिकेला आले. त्यातूनच ‘द अमेरिकन्स’ साकारले. त्यांच्या या प्रकल्पाने छायाचित्रकलेत क्रांती केली असे मानले जाते. त्यात त्यांनी पाडलेले नवे पायंडे पुढे त्या मार्गावर गेलेल्या इतर छायाचित्रकारांच्या कामाने मान्यताप्राप्त झालेही; पण मग फ्रँक छायाचित्रणाकडून सिनेमा- लघुपट/ माहितीपट- निर्मितीकडे वळाले. ‘पुल माय डेझी’, ‘मी अॅण्ड माय ब्रदर’, ‘कीप बिझी’, ‘कॅण्डी माऊंटेन’ किंवा रोलिंग स्टोन या रॉकबँडवरील ‘कॉकसकर ब्ल्यूज्’ हा माहितीपट अशा निर्मितीत ते गुंतले. ‘द अमेरिकन्स’आधी आणि नंतर काढलेली छायाचित्रे ‘द लाइन्स ऑफ माय हॅण्ड’ या संग्रहात एकत्रित केली गेली. १९७२ साली आलेल्या या पुस्तकाला फ्रँक यांचे वैयक्तिक संदर्भ लगडलेले आहेत. पुढील काळात एक सुशेगात जीवन ते जगले.