ऐंशीच्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर बुनियाद, हमलोग, भारत एक खोज या दीर्घकाळ चाललेल्या मालिका घराघरांत पाहिल्या जात. नंतरच्या काळात रामायण आणि महाभारत या पौराणिक मालिकांनाही असेच भाग्य लाभले. कालांतराने वाहिन्या वाढल्या आणि मग मालिका कंटाळवाण्या होतील इतपत लांबवल्या जाऊ लागल्या. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मात्र त्यास अपवाद म्हणावी लागेल. गेली नऊ वर्षे सुरू असलेली ही विनोदी मालिका देशातच नव्हे तर जिथे भारतीय राहतात त्या सर्व प्रदेशांत आवर्जून पाहिली जाते. आयुष्याकडे उल्टय़ा चष्म्यातून पाहणारे या मालिकेचे लेखक तारक मेहता यांच्या लिखाणाची ताकद यातील कलाकारांइतकीच महत्त्वाची आहे, हे मान्य करावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ डिसेंबर १९२९ रोजी अहमदाबाद येथे जन्मलेले तारकजी एसएससी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. गुजराती साहित्याची आवड असल्याने त्यांनी खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९५६ मध्ये प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवल्यानंतर एमए करण्यासाठी ते भवन्स महाविद्यालयात गेले. त्याच काळात त्यांनी लेखनास सुरुवात केली. आजूबाजूला घडणाऱ्या दैनंदिन घटनांवर मिश्कील शैलीत भाष्य करणाऱ्या त्यांच्या कथा ‘चित्रलेखा’सह अनेक नियतकालिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या. १९५८ मध्ये एमए उत्तीर्ण झाल्यानंतर ते गुजराती रंगभूमीच्या चळवळीत ओढले गेले. गुजराती नाटय़ मंडळात ते कार्यकारी मंत्री राहिले. याच काळात त्यांची काही नाटके रंगभूमीवर आली. लिखाणाचे काम करता यावे म्हणून ‘प्रजातंत्र’ या गुजराती दैनिकात उपसंपादक म्हणून ते रुजू झाले.  जेमतेम वर्षभर तेथे काढल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील फिल्म्स डिव्हिजनमध्ये त्यांची निवड झाली. वाचन, लेखनासाठी त्यांना येथे भरपूर वेळ मिळू लागला. ‘नवूं आकाश नवूं धरती’, ‘कोथळामांथी खिलाडी’ यांसारखी अनेक वाचकप्रिय पुस्तके याच काळात त्यांनी लिहिली. २६ वर्षे त्यांनी फिल्म्स डिव्हिजनमध्ये काढली. काही माहितीपटांचे लेखनही त्यांनी यात केले. त्यांच्या विनोदी लेखनामध्येही नव्या पिढीचे प्रतिबिंब पाहायला मिळत असल्याने काही दैनिके, नियतकालिकांच्या संपादकांनी त्यांना सदरलेखन करण्यास सुचवले. यातूनच १९७१ मध्ये ‘चित्रलेखा’ या साप्ताहिकातून ‘दुनिया ने ऊंधा चश्मा’ हे सदर सुरू झाले आणि या विनोदी सदरामुळे तारक मेहता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. या सदरातील लेख नंतर पुस्तक रूपात प्रसिद्ध झाले. त्यावर आधारित ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने नवनवे विक्रम प्रस्थापित केले. लिम्का बुकमध्ये या मालिकेची नोंद झाली. गुजराती भाषेत त्यांनी विनोदी नाटके लिहिलीच, पण देश-विदेशातील अनेक उत्तमोत्तम नाटकेही त्यांनी आवर्जून गुजरातीत आणली. गुजराती रंगभूमी आणि विनोदी लेखनातील योगदानाबद्दल त्यांना २०१५ मध्ये ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात आले. त्याआधीही गुजरात साहित्य अकादमी, रमणलाल नीलकंठ हास्य पारितोषिक असे अनेक मानसन्मान मिळवणाऱ्या तारकजींनी ८० पुस्तके लिहिली. ‘तारक मेहता का..’मधील जेठालाल,  दयाबेन, चंपकलाल ही व अन्य सर्वच पात्रे आणि ती सादर करणारे कलावंत लोकप्रिय होण्यात तारकजींचे योगदान महत्त्वाचे आहे.  जगभरातील लाखो दर्शक आणि वाचकांना हसवणाऱ्या तारकजींनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर कोणतेही विधी न करता आपला मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी द्यावा ही त्यांची अखेरची इच्छा ते विनोदावरच नव्हे तर विज्ञानावरही प्रेम करणारे होते हेच दाखवून देते..

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta
First published on: 02-03-2017 at 03:09 IST