अभिजात संगीताच्या दरबारात एके काळी अतिशय मानाचे स्थान पटकावणाऱ्या सारंगी या वाद्यावर कमालीची हुकमत गाजवणारे उस्ताद साबरी खाँ यांचे निधन ही खरोखरीच अतिशय दु:खद घटना आहे. एक तर हे वाद्य हळूहळू काळाच्या पडद्याआड चालले असताना, या उस्तादांनी तिला जिवंत ठेवण्याचे कार्य केले. एवढेच नव्हे, तर ते लोकप्रिय करण्यासाठी आपले सारे जीवन समर्पितही केले. गायनाला साथसंगत करणारे हे वाद्य प्रत्यक्ष गळय़ातील आवाजाबरहुकूम वाजू शकते. ही खासियत अन्य कोणत्याच वाद्यात नाही. साबरी खाँ यांनी अतिशय मेहनतीने हे कौशल्य आत्मसात केले.
साबरी खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे १९२७ मध्ये झाला. त्यांनी सैनिया घराण्याची शैली पुढे नेली. खाँसाहेबांच्या घराण्यालाच सारंगीचा संपन्न वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा उस्ताद हाजी महंमद खान आणि वडील उस्ताद छज्जू खान यांच्याकडून तालीम मिळाल्यानंतर स्वप्रतिभेने साबरी खाँ यांनी सारंगीला आपला चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे जगभर प्रवास करून खाँसाहेबांनी आपला रसिकवर्ग तयार केला.
सामान्यत: गायनाच्या संगतीचे हे वाद्य सतार आणि व्हायोलिन या वाद्यांच्या बरोबरीने उभे राहिले तेही साबरी खाँ यांच्यामुळे. येहुदी मेन्यूहीन, पंडित रविशंकर यांच्याबरोबर त्यांनी सादर केलेले कार्यक्रम म्हणूनच लक्षात राहणारे ठरले. संगीत कलेतील त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि पद्मभूषण या मानाच्या किताबांबरोबरच त्यांना उत्तर प्रदेशच्या साहित्य कला परिषदेचा पुरस्कार, उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बेगम अख्तर पुरस्कार, उस्ताद चाँद खान पुरस्कार, टागोर रत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यांचा मुलगा कमल साबरी हा तितक्याच जोमाने सारंगीवादनाचा वारसा पुढे नेत आहे. त्यांचे दुसरे पुत्र सरवर साबरी यांचा हात तबल्यावर तितक्याच कुशलतेने फिरतो. सारंगीतूनही वेगवेगळे मानवी भाव सहजपणे व्यक्त करण्याची कला साबरी खाँ यांना साधली होती. नव्याने वाद्य शिकू इच्छिणाऱ्या कलावंतांना साबरी खाँ हे आदर्श वाटत असत.
वादनास अतिशय अवघड असलेल्या सारंगीतून निघणाऱ्या स्वरांमधून जी जादू निर्माण करता येते, ती मात्र अतुलनीय अशीच असते. स्वत:ला तानसेनांचे वंशज मानणाऱ्या खाँसाहेबांनी सारंगीला भारतीय संगीताचे जे प्रतीक बनवले, त्यामुळे त्यांचे नाव इतिहासाला कधीच विसरता येणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2015 रोजी प्रकाशित
उस्ताद साबरी खाँ
साबरी खाँ यांचा जन्म उत्तर प्रदेशात मोरादाबाद येथे १९२७ मध्ये झाला
Written by रत्नाकर पवार

First published on: 04-12-2015 at 01:13 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ustad sabir khan