पंढरपुरी देवदर्शन घेणाऱ्या भक्तिसंप्रदायातील प्रत्येकासाठी वा. ना. उत्पात हे व्यक्तिमत्त्व अतिशय महत्त्वाचे. गेली साडेतीन दशके विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात चातुर्मासात श्रीमद्भागवत व ज्ञानेश्वरीवर रसाळ प्रवचने देणारे, ही वासुदेव नारायण उत्पात यांची या संप्रदायातील महत्त्वाची ओळख. पेशाने शिक्षक; परंतु वंशपरंपरेने रुक्मिणीच्या मंदिराचे पुजारीही. कवठेकर प्रशालेतील त्यांच्या चार दशकांच्या अध्यापन कारकीर्दीत हजारो मुले शिकली. ज्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले त्याच शाळेचे मुख्याध्यापक होण्याचे भाग्य फार कमी लोकांच्या वाटय़ाला येते. पंढरपूर येथील कवठेकर प्रशाला येथे शिक्षक म्हणून उत्पात यांनी संस्कृत, मराठी, इतिहास आणि इंग्रजी या विषयांचे अध्यापन केले. मुख्याध्यापक म्हणून ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी राज्यभरात श्रीमद्भागवत, रुक्मिणी स्वयंवर, ज्ञानेश्वरी पारायणाचे सप्ताह आणि प्रवचने यांचा धडाका लावला होता. विविध विषयांवर ते व्याख्यानेही देत. कट्टर सावरकरभक्त ही त्यांची आणखी एक ओळख. सावरकर हा त्यांच्या जगण्याचा श्वास होता. पंढरपूर येथे स्वातंत्र्यवीरांचा नऊ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह एक लाख पुस्तकांचा संग्रह असलेले सावरकर वाचनालय साकारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यासाठी लागणारा दीड कोटी रुपयांचा निधी त्यांनी व्यक्तिश: देणग्या मिळवून, कीर्तन-प्रवचन आणि व्याख्यानांतून जमवला. गुरुवर्य वरदानंद भारती (अनंतराव आठवले) यांच्या सहवासात त्यांची आध्यात्मिक जडणघडण झाली. गीता, उपनिषदे, संस्कृत वाङ्मय, इतिहास व सावरकर वाङ्मय आदी विविध विषयांवर २५ पुस्तकांचे लेखन करणारे उत्पात यांची लेखणी जीवनाच्या अखेपर्यंत कार्यमग्न होती. पंढरपुरातील समाजकारण व राजकारणात मोलाचे योगदान देणारे उत्पात २५ वर्षे नगरसेवक, तर दोन वर्षे नगराध्यक्ष होते. देवर्षी नारद पुरस्कार, महर्षी याज्ञवल्क्य पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे आध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार, कविराय रामजोशी पुरस्कार आणि पुण्यातील सावरकर प्रतिष्ठानतर्फे जीवनगौरव असे पुरस्कार त्यांना मिळाले होते. भागवत धर्माची पताका फडकवत ठेवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर सुरू ठेवलेल्या ज्ञानयज्ञामुळे ते सर्वदूर पोहोचले. महाराष्ट्राच्या लोकसंगीतातील लावणी हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. डॉ. अशोक दामोदर रानडे यांनी सादर के लेल्या बैठकीची लावणी या कार्यक्रमासाठी  उत्पात यांची मोलाची मदत झाली होती. विविध विषयांच्या व्यासंगामुळे त्यांचा लोकसंग्रहही अफाट. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक रसाळ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: V n utpat profile abn
First published on: 30-09-2020 at 00:01 IST