नाटककार वामन तावडे हे नाव आजच्या पिढीला अपरिचित असले तरी सत्तर-ऐंशीच्या दशकांतील रसिकांना चांगलेच परिचित आहे. अभिनेत्री स्मिता पाटील या चित्रपटांतून प्रसिद्धीच्या झोतात असताना त्यांनी वामन तावडे यांच्या ‘छिन्न’ नाटकात काम केले होते व सदाशिव अमरापूरकर यांनी ते बसवले होते. यावरूनच ‘छिन्न’चे वेगळेपण लक्षात यावे.
चेंबूरच्या कामगार वस्तीत लहानाचे मोठे झालेल्या वामन तावडे यांच्यावर कामगार रंगभूमीवरच्या नाटकांचे संस्कार होणे स्वाभाविकच होते. सभोवती कोकणी माणसांचे वास्तव्य असल्याने नमन, खेळे, दशावतार या लोककलांचे संस्कारही त्यांच्यावर आपसूक झाले. नाटकाची आवड असलेल्या तावडेंना या पोषक वातावरणाने खतपाणी घातले. त्यातून त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ कादंबरीवर आधारित एक नाटक लिहिले. दरम्यान ते शिवाजी मंदिरची नाटकेही पाहत होते. ‘काळे बेट, लाल बत्ती’, ‘अवध्य’सारखी प्रायोगिक नाटकेही अवलोकीत होते. त्यातून त्यांची नाटकाची जाण वाढत होती. आपण लिहिलेले नाटक फसले आहे, ते आंतरिक ऊर्मीतून लिहिलेले नाही याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी ते फाडून टाकले. पुढे त्यांनी ‘कन्स्ट्रक्शन’, ‘रायाची रापी’, ‘पिदी’, ‘मी घोडा हुसेनच्या चित्रातला’ आदी वेगळ्या आशय-विषयांवरील एकांकिका लिहिल्या. त्यामुळे एक लक्षवेधी लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. त्यातूनच पुढे त्यांनी ‘छिन्न’, ‘इमला’, ‘रज्जू’, ‘चौकोन’, ‘तुम्ही-आम्ही’ अशी विविधांगी धाटणीची नाटके लिहिली.
या वाटचालीतच ‘छिन्न’चे यश पचवता न आल्याने ते व्यसनात गुरफटले गेले आणि रंगभूमीपासून दुरावले. काही काळाने ते त्यातून सावरले; परंतु तोवर रंगभूमीवर अनेक स्थित्यंतरे झाली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी ‘रज्जू’, ‘चौकोन’, ‘तुम्ही-आम्ही’ इ. नाटके लिहिली. परंतु एका नाटकात वैविध्यपूर्ण आशय कोंबण्याचा अट्टहास, शब्दबंबाळ संहिता आणि भरकटलेपण यामुळे ती यशस्वी होऊ शकली नाहीत. तरीही त्यांचे लेखन थांबले नाही. महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, ओशो, डॉ. आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचे संदर्भ त्यांच्या लेखनातून पेरलेले असत. लोकांपर्यंत ते पोहोचायला हवेत असे त्यांना वाटे. चित्रकलेतही त्यांना गती होती. बोधी नाटय़लेखन कार्यशाळेच्या उपक्रमांतून त्यांचा सहभाग असे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अगदी साधे होते. उत्तरायुष्यात महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यात भास होत असे. गतकाळाचे भांडवल केलेले त्यांना आवडत नसे. आयुष्यातील चढउतारांकडे ते तटस्थपणे पाहत. त्याबद्दल हातचे न राखता बोलत. रंगभूमीवर येणारी नवी नाटके ते आवर्जून पाहत. सोशल मीडियावरही ते सक्रीय असत. खरे तर त्यांचे आडवेतिडवे आयुष्य हा एखाद्या नाटकाचा विषय होऊ शकला असता. निदान आत्मकथनाचा तरी! परंतु त्या भानगडीत ते कधी पडले नाहीत. मावळतीला ते अध्यात्माकडे झुकल्यासारखे वाटत. त्यांच्या जाण्याने एका कुतूहलयुक्त व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली आहे.