पुस्तके केवळ त्यातील मजकुरामुळेच वाचनीय होतात असे नाही, तर त्यासाठी ते सुबक आणि देखणेही असावे लागते, याचे भान मराठी वाचकांना देणाऱ्यांमध्ये कल्पना मुद्रणालयाचे चिं. स. तथा अण्णासाहेब लाटकर यांचा मोलाचा वाटा आहे. ‘कल्पना’ची मोहोर उमटलेली अनेक पुस्तके आज महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांमध्ये पाहायला मिळतात, तेव्हा ती अन्य पुस्तकांपेक्षा असलेले आपले वेगळेपण ठसठशीतपणे दाखवतात. याचे कारण लाटकरांनी मुद्रणाच्या व्यवसायावर मनापासून प्रेम केले हे आहे. छोटेसे हॅण्डबिल असो की प्रख्यात लेखकाचे पुस्तक असो, अण्णासाहेबांनी त्यात अतिशय बारकाईनेच लक्ष घातले. छपाईसाठी आवश्यक असणारा टाइप रेखीव असावा, यासाठीचा त्यांचा आग्रह इतका होता, की त्या काळातील कर्नाटक फॉण्ट म्हणून प्रसिद्ध असलेले अक्षरवळणाचे सर्व अधिकारच त्यांनी विकत घेतले. हे अक्षरवळण हीच ‘कल्पना’ची ओळख व्हावी, यासाठी लाटकर प्रयत्नशील राहिले. मुद्रणाच्या तंत्रात फारशा वेगाने प्रगती होत नसतानाच्या काळातही कल्पना मुद्रणालय हे सगळ्या प्रकाशकांचे आशास्थान झाले, याचे कारण लाटकर त्या पुस्तकासाठी केवळ तंत्रसाह्य करीत नसत, तर त्यामध्ये स्वत:चा जीवही ओतत असत. शाईचा काळा रंग पानभर सारखेपणाने पसरला आहे की नाही, यावर ते कटाक्षाने लक्ष देत असत. पाठपोट छापल्या जाणाऱ्या पानांवरील अक्षरांच्या ओळी बरोबर एकमेकावरच असल्या पाहिजेत, यावर त्यांचा भर असे. खरे तर ही गोष्ट वाचकाच्या किती नजरेत भरेल, याबद्दल शंका वाटावी अशी स्थिती असतानाही लाटकर मात्र त्यावर ठाम असत. अनेकदा या एका कारणासाठी छापलेले कागद फेकून देऊन ते पुन्हा छापण्याची तोशीस घेताना, त्या मुद्रणावर आपलीच मुद्रा असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. विविधरंगी छपाईचे तंत्रज्ञान किंवा ऑफसेटचे तंत्र विकसित होण्यापूर्वीच्या काळात रंगांची उधळण न करता, एखादाच रंग ते मुद्रण अधिक उठावदार कसे करू शकेल, याचा अतिशय सर्जनशीलपणे विचार करणारे मुद्रक म्हणून लाटकर सर्वाना परिचित असत.
महाराष्ट्रात असा आग्रह धरणारे कल्पना मुद्रणालय आणि मौज प्रिंटिंग ब्यूरो असे दोन लक्षात राहणारे मुद्रक झाले. आठ वर्षांत दहा वेळा मुद्रणाचा राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे लाटकर हे एकमेव मुद्रक होते. साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर क्वचितच झालेला मुद्रकांचा सत्कार स्वीकारण्याचे भाग्यही लाटकरांच्याच वाटय़ाला आले. आदर्श शिक्षण संस्था हे त्यांनी निगुतीने वाढवलेले झाड आहे. शिक्षण संस्था चालवण्यासाठी आवश्यक असणारी तटस्थता आणि तळमळ दोन्हींचा संगम त्यांच्यामध्ये होता, म्हणूनच डाव्या विचारसरणीचे लाटकर सगळ्याच क्षेत्रांत सतत तळपत राहिले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2014 रोजी प्रकाशित
चिं. स. लाटकर
पुस्तके केवळ त्यातील मजकुरामुळेच वाचनीय होतात असे नाही, तर त्यासाठी ते सुबक आणि देखणेही असावे लागते,

First published on: 08-01-2014 at 12:16 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh annasaheb latakar