परीक्षक नि:पक्षपाती नसले तरी परीक्षा नि:पक्षपाती राहावी या भरात ‘वस्तुनिष्ठ’ प्रश्नांचा जमाना आला. तपासणाऱ्यावर कौल (जजमेंट) देण्याची जबाबदारी येऊ न देण्यासाठी हो/नाही या ‘बिट’पर्यंत तयार उत्तरे बनली. पण यात विचारशक्तीचे जे भजे होत आहे त्याचे काय?  
वास्को द गामाच्या जहाजातून कलिकतला उतरलेल्या पहिल्या खलाशाचे नाव काय? तुम्ही म्हणाल काय फरक पडतो? खरेच काहीही नाही. रावणाने सीतेला अशोकवनातच का ठेवले, आम्रवनात का नाही? हा प्रश्न गरलागू असतो. कारण ते अशोकवन होते इतकेच अशोकवन ‘च’ असे काही नव्हते. पण अशोक आणि आंबा यात आणखी दोन झाडांची नावे घातली की उदा. ५,००० रुपयांच्या प्रश्नाची चौकडी तयार होते. ‘‘कम्प्युटरजी ‘अशोक’ को ताला लगाया जाय। बिलकुल सही जवाब दिया आपने।’’
अमिताभ-निवेदित कौ.ब.क. हा कार्यक्रम छानपकी करमणूक करणारा आहे आणि त्यात फोन-बिला-द्वारे स्टेक(पसा ‘पणा’ला) लावणाऱ्यांपासून बिग-बीपर्यंत सारेच स्वेच्छेने उतरत असल्याने माझा त्यावर ‘नतिक’ प्रकारचा आक्षेप नाही. तरीही जेव्हा अमिताभ म्हणतो, ‘‘हमने कुछ नहीं दिया (हे अगदी बरोबर आहे) आपका ग्यान,आपकी प्रग्या के जोर पर आप जीते/जीती’’ यात येणारे ज्ञान व प्रज्ञा हे शब्द मात्र आक्षेपार्ह आहेत. जगातले दुसऱ्या नंबरचे उंच शिखर के-टू या नावाचे आहे आणि ते पहिल्यांदा चढणाऱ्या महिलेचे नाव काहीतरी पूर्व-युरोपियन आहे. (हे दोन्ही मी प्रथमच ऐकले!) यावर एक भारतीय महिला चक्क पाच कोटी रुपये जिंकली.
मला लागून राहिलेली एक गंभीर टोचणी मात्र जागवली गेली. जरा तरी विचार करायला लावा की! उदाहरणार्थ, रंग बदलणाऱ्या सरडय़ाचे डोळे बांधले तर, त्याचा रंग अ) होता तोच राहील, ब) भोवतालाप्रमाणेच बदलेल, क) ‘भ्यायलेला’ रंग दिसेल, ड) अंधार पाहून काळा पडेल, रंग बदलण्याचे कार्य काय आणि यंत्रणा कोणती, यात शिरायला नको का?
शिक्षणातसुद्धा सगळेच प्रश्न त्यांचे बिट-बाईट पाडून ‘जोडय़ा लावा’ या सदरात आणण्याचे कार्य चालू आहे. ‘तळेगाव’ची जोडी, ‘काचकारखाना’, की मिळाला एक मार्क! ‘कळसू’वरून ‘सर्वात उंच शिखर’ आणि ‘बाई’वरून ‘महाराष्ट्रातले’ आणखी एक मार्क! कोकरू, वासरू, शिंगरू ही पिल्ले आणि त्यांचे कॉरस्पॉण्डिग प्राणी यांच्या जोडय़ा पाठ केल्या जातात. यात घोडय़ाला शिंगे नसूनही पिल्लाला शिंगरू का म्हणतात? अशा वाह्य़ात(!) प्रश्नांना वाव नसतोच. पण गंभीर प्रश्नही उपेक्षित राहतात. रेडकू मारले किंवा मरू दिले नाही तर रेडेही पोसावे लागून, म्हशीच्या दुधाचा भाव दुप्पट होईल आणि म्हणूनच दूध हेसुद्धा हिंसकच असते, हे लक्षणीय तथ्य (सिग्निफिकंट फॅक्ट) आहे. तसेच, शांततेचे नोबेल हे दारूगोळा उत्पादनाच्या नफ्यातून जमलेल्या भांडवलाच्या व्याजातून दिले जाते, हेही लक्षणीय तथ्य आहे. म्हणजे फक्त फॅकट्सच विचारायच्या झाल्या, तरी कोणत्या माहीत झाल्याने आपली दृष्टी बदलते आणि कोणत्या ‘क्या फर्क पडता है’ या सदरात मोडतात, याचा विचार कोण करणार?
माहिती बाळगणे आणि ज्ञान ‘जगणे’
‘माहिती’ आणि ‘ज्ञान’ यात गल्लत करून, शालेय शिक्षणात खांद्यांवर लठ्ठ दप्तराचे आणि मेंदूंवर भरगच्च माहितीचे ओझे लादल्याने, विचारशक्ती वाढण्याचे कार्य कुंठित होत आहे. हमखास अपेक्षित प्रश्नांची, हमखास अपेक्षित उत्तरे हे शिक्षणाचे स्वरूप बनले आहे. ज्ञान ही जगण्याची आणि जागण्याची गोष्ट आहे तर माहिती ही बाळगण्याची आणि वापरण्याची गोष्ट आहे. ज्या प्रश्नांचे एकच एक, निश्चित आणि सुटसुटीत उत्तर तयार असेल असे कृत्रिम प्रश्न बनवणे व सोडवणे म्हणजे ‘ज्ञान जगणे’ नाही. ज्याचे उत्तर माहीत नाही, किंबहुना कसे शोधावे हेही माहीत नाही, असे प्रश्न पडणे आणि ते झटकून न टाकता मनात जिवंत ठेवणे, ही ‘ज्ञान जगणे’ या प्रकारात मोडणारी गोष्ट आहे. ज्ञान-जगण्यासाठी अनपेक्षित प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत व त्यांची भीती न वाटता अप्रूप वाटले पाहिजे. जी मेंदूबाहेर साठवता येते ती माहिती असते. ती साठवण्याच्या आणि उपसण्याच्या(र्रिटाइव्हल) अचाट सोयी झाल्यानंतरच्या काळात तर, आपल्या बहुमोल मेंदूचा वापर, भांडार किंवा कबाडखाना म्हणून करणे, हा एक अपव्यय ठरतो. पाठांतर ही गोष्ट, छपाईसुद्धा नव्हती, त्या काळातच समर्थनीय होती. एकेकाळी निमकी, दीडकी, किंवा औटकीसारखी ‘आउट’ करणारी कोष्टकेसुद्धा पाठ असत. आज किमान १ ते १० हे पाढे तरी पाठ असतात. पण जे आपल्याला पाठ असते, त्याच्याकडेही आपण जिज्ञासेने पाहत नाही. कितीजणांच्या लक्षात येते, की १०० आकडय़ांच्या या कोष्टकात संख्या फक्त ५५च असतात? तीन चोक आणि चार त्रिक हे तेच असल्याने १२ ही संख्या दोनदा येणारच. अशा ४५ संख्या या दोनदा येतात. १ ते १०चे वर्ग (१,४,९,२५,३६—-१००) एकदाच येतात आणि १०० खाने भरतात. हे कळण्यात ‘गणित’ कळणे आहे. याचा व्यावहारिक उपयोगही आहे. येत नसलेल्या पाढय़ाच्या शेजारचा आठवला, तरी बेरीज मारून उत्तर मिळते. वरच्या पातळीचे उदाहरण म्हणजे मायनस गुणिले मायनस बरोबर प्लस. हे सर्वाना माहीत असते. पण असे का? हा गणितवाल्यांनी मिळून ठरविलेला संकेत आहे? की सिद्ध करता येण्याजोगे प्रमेय आहे? की कोणाच्याही थेट-प्रत्ययाला येणारे स्वयंसिद्ध तत्त्व आहे? की व्यवहारात उपयोगी पडणारा ठोकताळाच फक्त आहे? हे अगदी सायन्स किंवा इंजिनीअिरग झालेल्यांनासुद्धा सांगता येत नाही.
कॅमेऱ्याकडे बघणाऱ्या व्यक्तीच्या फोटोकडे आपण कोणत्याही कोनातून पाहिले, तरी ती व्यक्ती आपल्याकडेच पाहताना दिसते. मग ती व्यक्ती कॅमेऱ्याकडे कितीही तिरपा कटाक्ष टाकत असो! असे का व्हावे? किंवा नेहमीच्या सपाट आरशात डावे-उजवे उलटते, पण मग वर-खाली का उलटत नाही? (उत्तरे ऑप्टिक्समध्ये सापडणार नाहीत एवढाच क्ल्यू देऊन ठेवतो).
काय? आणि कसे? पेक्षा का? आणि कशासाठी?
तथ्ये माहीत असणे हे ‘काय?’चे उत्तर असते. व्यावसायिकदृष्टय़ा कसे? याचाही ‘नो हाऊ’ बऱ्यापकी मिळतो. सरासरी कशी काढावी, यापेक्षा कोणत्या प्रसंगी सरासरी काढणे उचित असते आणि कोणत्या प्रसंगी ‘सरासरी’ ही दिशाभूल करणारी ठरते, हे अधिक महत्त्वाचे असते. सरकारी रुग्णालयात, एखाद्या गोष्टीच्या नाममात्र किमतीत थोडी वाढ केली, तर त्यावर बातमी बनविताना काय घोळ होतो ते पाहा. समजा १० रुपयाची वस्तू १ रुपयाला होती आणि आता ती ३ रुपयाला केली. याची बातमी ‘‘सरकारी रुग्णालयातील किमतीत २०० टक्के वाढ’’ अशीही छापता येते किंवा ‘‘सरकारी रुग्णालयातील सवलतीत २२ टक्के घट’’ अशीही छापता येते. यापकी गणित कुठलेच चुकलेले नाही. वादग्रस्त आहे तो गणिताचा भाषिक वापर. कसे? हाऊ? याचे उत्तर आपण गणिताच्या तासाला टक्केवारी प्रकरणात शिकलेलो असतो. पण गणिताचा वापर, कशा प्रकारचे चित्र रंगविण्यासाठी करायचा आहे? या विषयाला तासच नसतो.
इसापनीती असो वा पंचतंत्र. बहुतेक कथा या चातुर्यकथा आहेत. त्यांना नीतिकथा का म्हणायचे? पेचच जर नतिक नसेल तर नीतिशास्त्र कळणार कसे? नतिक-पेचांची कोडी सोडवताना एकच एक बरोबर उत्तर नसणार, एक्स्पर्ट ओपिनियन, ऑडियन्स पोल, फोन अ फ्रेंड, डबल डिप अशा लाइफ लाइन्स नसणार. असे अभ्यास करून घ्यायला नकोत का? समजा, एक अति-न्यायनिष्ठुर राजा आहे. शिकारीच्या नादात राणीकडून एकजण मारला गेला आहे. त्याची बायको न्याय मागायला आलीय. आता राजाने अ) राणीला मृत्युदंड, ब) फिर्यादीने राजाचाच वध करणे, क) राजाने फिर्यादीला राणी करणे व राणीला त्यागणे, ड) शिकारीवर बंदी घालणे, ई) फिर्यादीला भरपाई व राणीला सौम्य शिक्षा; यापकी काय करावे? या कोडय़ाला एकच एक बरोबर उत्तर आहे व ते ओळखायचे आहे, असे नसून कोणते उत्तर आपल्याला का भावते यापासून, न्याय म्हणजे काय या व्यापक प्रश्नात जायचे आहे. कौ.ब.क.मध्ये मात्र, द्रौपदीचा भाऊ कोण याचे बरोबर उत्तर धृष्टद्युम्न आणि खात्रीने चुकीचा म्हणून एक ऑप्शन दुशासनसुद्धा! कृष्णावर डबल डिप घ्यायला मोकळे.
नीतिशास्त्रावर कितीही जी.बी. फ्री-डाउनलोड मिळेल. जितके जास्त वाचाल तितकी गर्दी वाढेल, पण उमगणार काही नाही. कारण मुद्दा असा आहे की,
‘नामा म्हणे ग्रंथ। श्रेष्ठ ज्ञान देवी। एक तरी ओवी। अनुभवावी.’                                      
*  लेखक हे कामगार संघटनांचे उत्पादकता सल्लागार, तसेच तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल rajeevsane@gmail.com
* उद्याच्या अंकात  इंग्रजी पुस्तकांविषयीचे ‘बुकमार्क’ हे विशेष पान.