दुसऱ्या महायुद्धानंतरच्या स्पेनमधील वाङ्मयीन नवनिर्माण चळवळीचे प्रवर्तक म्हणून कॅमिलो योसे सेला यांचा रास्त गौरव केला जातो. कथा, कादंबरी, निबंध, कविता, समीक्षा आणि प्रवासवर्णन अशा विविध वाङ्मयप्रकारांत यांनी केलेल्या कसदार लेखनाने स्पॅनिश साहित्यच नव्हे, तर तेथील संस्कृतीही समृद्ध झाली आहे, असे समजले जाते. कठोर वास्तवता व भेदक उपहास, असाधारण कल्पकता व लैंगिक विषयावरचे मनमोकळे निवेदन, माणसाचा रिक्तपणा व भ्रमनिरास यांची सखोल जाण आणि आक्रमक व चित्रदर्शी लेखनशैली ही त्यांच्या लेखनाची काही ठळक वैशिष्टय़े. पूर्वसुरींची परंपरा नाकारणाऱ्या आणि समकालीनांपेक्षा वेगळ्या धाटणीचे लेखन करणाऱ्या सेला यांनी आपल्या लेखनातून सतत नवे प्रयोग केले. मग ते रचनाबंधाचे असोत की निवेदनशैलीचे. १९८९ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक सेला यांना देतेवेळी नोबेल पारितोषिक समितीचे सचिव स्टुअर अॅलन यांनी म्हटले होते: महायुद्धोत्तर कालखंडातील स्पॅनिश साहित्याचे नेतृत्त्व सेला यांनी केले आहे. त्यांचे लेखन प्रायोगिक असून त्यात जिज्ञासावृत्ती आढळते. स्पेनच्या जुन्या परंपरांचा संदर्भ घेऊन त्यांनी मानवी मनातील पाशवी वृत्तीचे चित्रण केले आहे.. माणसाच्या दुर्बलतेला आव्हान देणाऱ्या जीवनदृष्टीला त्यांनी साहित्यरूप दिले, तसेच माणसाला हताश करून टाकणाऱ्या यातनांविषयीच्या करुणेचा संयत सूरही वाचकापर्यंत पोहोचविला.
सेला यांचा जन्म स्पेनच्या ईशान्य भागातील आयरिया-फ्लव्हिया येथे ११ मे १९१६ रोजी झाला. त्यांचे वडील स्पॅनिश, तर आई आयरिश होती. वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या सेला यांना स्पेनच्या यादवी युद्धामुळे महाविद्यालयीन शिक्षणही अर्धवट सोडावे लागले. त्यांनी नंतर कायद्याचा अभ्यास केला, पण वकिली व्यवसायात त्यांना यश लाभले नाही. काही काळ त्यांनी माद्रिद विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी केली. त्याआधी चित्रपटातील अभिनेता व चित्रकार म्हणूनही त्यांनी काही थोडे दिवस काम केले होते. थोडक्यात, त्यांचे पूर्वायुष्य अतिशय खडतर होते. आणि सरतेशेवटी ते लेखनाकडे वळले.
दोन जागतिक युद्धांच्या संधिकालात झालेले स्पेनचे यादवी युद्ध हे एका अर्थाने अपूर्ण महाभारतच होते. १९३६ मध्ये निवडणुकांद्वारे सत्ताधारी झालेल्या ‘नॅशनल फ्रंट’च्या विरोधात बंड करून लष्करी अधिकारी जनरल फ्रँको याने सत्ता बळकावली. त्यातून स्पेनमध्ये यादवी युद्ध उद्भवले. जगातील सर्व लोकशाहीवादी संघटना ‘नॅशनल फ्रंट’ला मदत करीत होत्या, तर जनरल फ्रँकोला हिटलरच्या नाझी राजवटीकडून रसद मिळत होती. अर्नेस्ट हेमिंग्वे, जॉर्ज ऑर्वेल, स्टीफन स्पेंडर, आर्थर कोस्लर, ख्रिस्तोफर कॉडवेल, ऑक्टाव्हिओ पाझ हे प्रतिभावंत ‘नॅशनल फ्रंट’च्या समर्थनार्थ स्पेनमध्ये लढले. सेला मात्र फ्रँकोच्या राष्ट्रवादी पलटणीत सहभागी झाले होते. २८ मार्च १९३९ रोजी हे यादवी युद्ध संपले व जनरल फ्रँकोचा विजय झाला, तेव्हा सुमारे दहा लाख माणसे मारली गेली होती आणि युद्धाचा खर्चच मुळी पंचेचाळीस हजार कोटी डॉलरच्या घरात गेला होता. अशातच दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि त्याचा दाहक अनुभव स्पेनला मिळाला. एकूणच या सर्व अस्थिर परिस्थितीत सर्वसामान्य स्पॅनिश माणसाची पार वाताहत झाली. स्पेनच्या यादवी युद्धात सहभागी झाल्याने सेला यांना जो अनुभव मिळाला, त्यामुळे ते कडवट वृत्तीचे झाले. जनरल फ्रँकोच्या राजवटीत त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. त्याचे प्रत्यंतर, ‘ल फॅमिलिया दे पास्कुआल दुआर्ते’ आणि ‘ल कोलमेना’ या त्यांच्या कादंबऱ्यांतून येते.
सेला यांची ‘ल फॅमिलिया दे पास्कुआल दुआर्ते’ ही कादंबरी १९४१ मध्ये प्रसिद्ध झाली. १९४८ मध्ये तिचा ‘दि फॅमिली ऑफ पास्कुआल दुआर्ते’ हा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला. स्पेनच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पास्कुआल दुआर्ते या खेडुताच्या जीवनाचे चित्रण त्यात येते. चांगले आयुष्य जगण्याची संधी न मिळाल्यामुळे नाइलाजाने गुन्हेगारी व वाटमारीकडे वळलेल्या या कादंबरीनायकाने खून केले, चोऱ्या केल्या एवढेच नव्हे तर आपल्या जन्मदात्या आईलाही मरणमार्गी धाडले. त्याच्या मनातील विचारांचे आणि विकारांचे तपशील सेला यांनी सूक्ष्मपणे नोंदविले आहेत. ते वाचकांच्या अंगावर शहारे आणतात. या नायकाचे वडील मद्यपी होते आणि त्यांनी त्याच्याकडे कधीच लक्ष दिले नाही. घरात आणि घराबाहेर त्याची नेहमीच उपेक्षा होत आली आहे. शाळेत न गेल्याने त्याच्यावर संस्कार झालेले नाहीत; गरिबीमुळे त्याच्या इच्छांची पूर्ती होत नाही. संपूर्ण समाजाविषयी त्याच्या मनात कडवटपणा व संशय आहे. या संशयाला हा नायक पाशवी व बीभत्सवृत्तीची जोड देतो. सरतेशेवटी त्याला गुन्हेगारी कृत्यांसाठी फाशीची शिक्षा होते, पण तो सामाजिक व्यवस्थेचा बळी असल्याचे जाणवत राहते. या कादंबरीत सेला यांनी स्पेनमधील दारिद्रय़ाचे वास्तव वर्णन केलेले आहे. त्यामुळे दुआर्तेच्या पाशवी कृत्याला काही प्रमाणात सामाजिक संदर्भाची चौकट लाभते- आणि मग ती केवळ त्याची एकटय़ाचीच व्यक्तिगत शोकांतिका राहत नाही. जोरकस भाषेत मानवी मनातील पशुत्वाचे चित्रण (आणि थोडय़ाफार प्रमाणात समर्थनही!) करणारा एक वेगळाच रचनाबंध सेला यांनी साहित्यात आणला. त्याला ‘रीं े’’ि म्हणून ओळखले जाते. जनरल फ्रँकोच्या राजवटीला ही कादंबरी मानवली नाही. तिच्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळेच की काय, ती बरीच वाचली गेली आणि जगातील विविध भाषांत तिचे अनुवाद सिद्ध झाले.
सेला यांची ‘ला कोलमेना’ ही आणखी एक महत्त्वाकांक्षी कादंबरी. ती १९५१ मध्ये प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी तिचा ‘द हाइव्ह’ (मधमाश्यांचे पोळे) हा इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला. या अनुवादाला आर्थो बोव्हिया यांची प्रस्तावना लाभली आहे. यादवी युद्धानंतरचे माद्रिद शहरातील लोकजीवन निराशेने कसे ग्रासले होते याचे सर्व अंगांनी चित्रण सेला यांनी या कादंबरीत केले आहे. माद्रिद शहरातील एक कॅफे आणि त्याची मालकीण दोना रोझा त्यांच्याभोवती कादंबरीचे कथानक गुंफलेले आहे. कादंबरीत ६ प्रकरणे, २१५ घटना आणि ३०० व्यक्तिरेखा असल्या, तरी कथानकाचा कालावधी अवघ्या तीन दिवसांचा आहे. रूढ अर्थाने या कादंबरीला कोणीही नायक ना नायिका नाही. कादंबरीत या कॅफेतील मर्यादित विश्वाचे सूक्ष्म दर्शन घडवीत असतानाच सेला यांनी सामान्यांचे हेतुशून्य आयुष्य, प्रेम व द्वेषाचे परस्परविरोधी संबंध, धनिकांनी गरिबांची केलेली पिळवणूक आणि एकूणच त्यामुळे व्यक्तिजीवनाला व समाजजीवनाला आलेली बकालपणाची अवकळा यांचे वस्तुनिष्ठ वर्णन केले आहे. सकृतदर्शनी ही कादंबरी विस्कळीत वाटत असली, तरी तिच्यात सुसूत्रता आहे. ‘द हाइव्ह’ विषयी सेला यांनी म्हटले होते, ‘या माझ्या कादंबरीत जीवनातील काही टप्प्यांचे साधेसुधे वर्णन आहे. कमीअधिक काही नाही. गूढ, रहस्यमय, सूचक विधाने नाहीत; नाटय़मय शोकांतिका नाहीत की साधुत्वाची प्रदर्शने नाहीत. जीवनाचा प्रवाह जसा वाहतो तसा चितारला आहे. आपणास आवडो किंवा न आवडो जीवनाचा ओघ चालूच असतो..’ या कादंबरीत माद्रिदमधील तत्कालीन अश्लील भाषेचा वापर मुक्तपणे केला आहे आणि लैंगिक संबंधांचे वर्णन अतिरिक्त विस्ताराने केले आहे. त्यामुळे रोमन कॅथलिक चर्चने या कादंबरीवर आक्षेप घेतला व तिच्यावर बंदी घालण्यात आली. वीस वर्षांनंतर ही बंदी उठविण्यात आली. १९८२ मध्ये या कादंबरीवर चित्रपट काढण्यात आला. त्याला ३३व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोल्डन बेअर अवॉर्ड’ मिळाले होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक साहित्यविश्वात स्थिरावलेल्या अस्तित्ववादी विचारसरणीचे गडद सावट सेला यांच्या लेखनावर पडलेले दिसते. त्यांची ‘दि फॅमिली ऑफ पास्कुआल दुआर्ते’ ही कादंबरी आल्बेर कामूच्या ‘दि स्ट्रेंजर’शी काही थोडय़ा प्रमाणात साधम्र्य साधते. दोन जागतिक युद्धे आणि स्पेनचे यादवी युद्ध यांचा अनुभव घेतलेल्या सेला यांनी युद्धाची भयावहता, आधुनिक जगातील माणसांचे परस्परांशी तुटत चाललेले संबंध आणि त्यातून येणारा एकाकीपणा व अपरिहार्यपणे उद्भवणारे औदासीन्य यांचे चित्रण त्यांनी आपल्या लेखनातून केले. त्यांच्या लेखनाने आधुनिक स्पॅनिश साहित्यात अस्तित्ववादी विचारसरणीला समांतर असा ‘ळ१ीेील्लीि२ू’ हा एक नवाच प्रवाह प्रस्थापित झाला. सेला यांच्या लेखनात आदर्शवादी व पराक्रमी नायक आढळत नाहीत, तर आढळतात ती सर्वसामान्य प्रवाहपतित माणसे. व्यक्ती आणि समष्टी जीवनातील औदासीन्य व असहायता यांचे चित्रण करण्यात आपल्या लेखनाची इतिकर्तव्यता आहे, असे समजणारे सेला हे महायुद्धोत्तर सामाजिक जीवनाचे अस्तित्ववादी भाष्यकार आहेत, असे मत समीक्षक व्यक्त करतात.
स्पेनच्या यादवी युद्धाचा सेला यांच्या लेखनावर सखोल परिणाम झाला. यादवीत ते जनरल फ्रँकोच्या बाजूने लढले होते; पण सत्तेवर आल्यावर फ्रँकोने त्यांना हद्दपार केले. या हद्दपारीच्या काळात त्यांनी लॅटिन अमेरिकेतील देश आणि स्पेनच्या ग्रामीण भागांत भटकंती करून ‘जर्नी टु अल्कारिया’ (१९४८) व ‘फ्रॉम दि मायनो टु बिडासोआ’ (१९५२) ही प्रवासवर्णने लिहिली. यादवी युद्धाच्या आधी व नंतरचे काही आठवडे स्पेनमधील परिस्थिती कशी होती, याचे वर्णन त्यांनी ‘सन कॅमिलो’ (१९५४) या कादंबरीत केले आहे. ही कादंबरी ‘नूव्हो रोमन’ शैलीतील आहे. (ही लेखनशैली फ्रान्समध्ये उदयाला आली, तिच्यात भौतिक घटना व कृत्ये यांचा बारीकसारीक वस्तुनिष्ठ तपशील दिलेला असतो आणि त्यामागचे मानसशास्त्रीय विश्लेषण टाळलेले असते.) ‘दि ब्लाँड’ (१९५९) ही व्हेनेझुएलाच्या पाश्र्वभूमीवरील सेला यांची कादंबरी मात्र अस्तित्ववादी विचारसरणीच्या परिघाबाहेरची आहे.
१९७५ मध्ये जनरल फ्रँकोच्या निधनानंतर सत्ताधारी झालेल्या युवान कालरेस यांच्या राजवटीत मात्र त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात आली. स्पेनच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या लॅलिअॅरिस द्वीपसमूहातील पामा दि मालोर्का येथे ते १९७८च्या सुमारास स्थायिक झाले. तेथे त्यांनी साहित्यसमीक्षा विषयक नियतकालिक चालवले, ज्ञानकोशाचे संपादन केले तसेच स्पेनची राज्यघटनाही लिहिण्यात हातभार लावला. युवान कालरेस यांनी १९७८ मध्ये सेला यांची संसदेत सिनेटर म्हणून नियुक्ती केली तसेच स्पॅनिश अकादमीचे अध्यक्षपदही त्यांना देण्यात आले. या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे कादंबरीलेखन मंदावत गेले. १९८८ मध्ये प्रसिद्ध झालेली ‘ख्रिस्त व्हर्सेस अॅरिझोना’ ही त्यांची अखेरची कादंबरी. तिच्यातील एक वाक्य कोणत्याही विरामचिन्हाशिवाय १०० पृष्ठांचे आहे. सेला यांचे १७ जानेवारी २००२ रोजी निधन झाले. आयुष्याच्या अगदी अखेपर्यंत ते लेखनमग्न राहिले. मात्र १९९० नंतरचे त्यांचे लेखन वैचारिक स्वरूपाचे होते. स्पॅनिश भाषेत विपुल लेखन करणाऱ्या कॅमिलो जोसे सेला यांचे सर्वच लेखन इंग्रजीत अनुवादित झालेले नाही. मात्र जे काही अनुवादित झालेले आहे, ते त्यांची वाङ्मयीन महत्ता ठळकपणे अधोरेखित करते!
ंसेला यांचा स्पेनच्या
पाद्राँ शहरातील पुतळा आणि (अगदी वर) रंगीत रेखाचित्र