संघर्षांतून संवर्धनाकडे..

गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करून, या तरुणांनी नवी वाट दाखवली आहे..

|| राखी चव्हाण

सरकारशी संघर्ष करून २००९ सालात या संघटनेने ‘अदानी’ समूहाची खाण रोखली आणि वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करून, या तरुणांनी नवी वाट दाखवली आहे..

तरुणपणी अनेक जण विविध दिशांनी प्रयत्न करीत असतात, पण बहुतेकांचे प्रयत्न भौतिक सुखांपाशी स्थिरावतात. काही जण मात्र, समांतरपणे काही तरी वेगळे गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना त्यांच्याही कल्पनेच्या पलीकडचे झगमगते यश मिळत असते. ‘इको प्रो’ची आर्मी काहीशी अशीच! बंडू धोत्रे या तरुणाच्या नेतृत्वाखाली बारा वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या या संघटनेत जवळजवळ दोन हजार युवकांचा भरणा आहे. सामाजिक क्षेत्रात ही फौज कार्यरत आहे. त्यातील किल्ले स्वच्छता मोहिमेने तर देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष वेधून घेतले आहे.

या संघटनेतील कुणी शिकणारे, कुणी नोकरी करणारे तर कुणाचा व्यवसाय. पण हाक दिली तर अवघ्या तासाभरात ही सेना मोहीम फत्ते करायला निघते. चंद्रपूर जिल्ह्यातील ‘किल्ले स्वच्छता अभियान’ गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. या शहरातील गोंड राजवटीच्या खाणाखुणा नष्ट होत चालल्या होत्या. या सेनेला आपल्याच शहराची, आपल्याच पूर्वजांची होणारी ही दैनावस्था पाहवली नाही आणि मग ‘किल्ले स्वच्छते’चे हे शिवधनुष्य त्यांनी उचलण्याचे ठरवले. या शहरात चार ऐतिहासिक प्रवेशद्वारे आहेत. त्यांपैकी पठाणपुरा प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या अशुक बुरुजापासून १ मार्च २०१७ रोजी या कामाची सुरुवात झाली. सुमारे ११ किलोमीटरचा हा किल्ला म्हणजे साप, विंचवांचे घर होते. माणसे या ठिकाणी शौचाला बसत होती. त्यामुळे संघटनेतील काही युवक या स्वच्छता मोहिमेत सहभागी होताना डगमगणार, हे ओळखून बंडू धोत्रे यांनी मोहीम सुरू करण्याआधी त्यांना सेवाग्रामची सफर घडवली. गांधीजींच्या स्वच्छता मोहिमेची युवकांना ओळख करून दिली. हे सर्व पाहिल्यानंतर या युवकांचे मतपरिवर्तन झाले. चंद्रपूरला परतल्यानंतर त्यांनी ११ किलोमीटरच्या या किल्ले स्वच्छता मोहिमेत स्वत:ला झोकून दिले. हा किल्ला नाही तर ते अवशेष होते. मातीचे ढिगारे त्या ठिकाणी जमले होते. किल्ल्याची ओळख पूर्णच मिटलेली होती. मात्र, स्वच्छता मोहिमेतून या सर्व गोष्टी तेथून हटवण्यात आल्या. किल्ल्याचा मूळ दगड दिसण्याइतपत ते सुस्थितीत आणले गेले. कधी मधमाश्यांचे पोळे तर कधी सापांचा वावर आणि यातून सुटत नाही तर खाज सुटणाऱ्या वनस्पती असायच्या. मग अंगाला लिंबू आणि शेणाचा लेप लावून हे तरुण कामाला भिडले आणि लोकांच्या नजरा त्यांच्या मोहिमेकडे वळल्या. तरुणाईचा हा दिखावा नाही तर ती त्यांची आंतरिक तळमळ आहे हे लोकांना कळून चुकले. तेव्हा कुणी पाणी, कुणी चहा तर कुणी नाश्ता आणून द्यायचे. १५० दिवसांनंतर या किल्ल्याची वाट मोकळी झाली आणि प्रसारमाध्यमांनीही त्याची दखल घेतली. लोकांना चंद्रपूर शहराचा इतिहास जवळून अनुभवता आला. ही मोहीम घराघरात पोहोचली आणि लोकही त्यात जुळत गेले. स्वच्छता मोहिमेसाठी साहित्याची पूर्ती लोकांकडून होत गेली. स्वच्छता अभियानाला २०० दिवस पूर्ण झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये ‘किल्ले स्वच्छता मोहिमेचा’ उल्लेख केला. त्यामुळे देशभरात प्रसिद्धी झाली. पुरातत्त्व विभागही खडबडून जागे झाले. थेट या विभागाचे महासंचालक आणि केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठकीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले. आज या ११ किलोमीटरच्या किल्ल्याला आतून आणि बाहेरून ११-११ किलोमीटरची संरक्षक भिंत बांधली जात आहे. पुरातत्त्व विभागाने मग ‘इको प्रो’शी करार करून त्यांना २१ ‘मॉन्युमेंट’ दत्तक दिले. ‘अ‍ॅडॉप्ट अ हेरिटेज’ या योजनेअंतर्गत हा करार झाला (याच योजनेखाली लाल किल्ल्याचा काही भाग खासगी कंपन्यांना देण्यात आला आहे).

मग ‘किल्ला पर्यटन’ आणि ‘हेरिटेज वॉक’ला सुरुवात झाली. चंद्रपूरच्या किल्ल्यासोबत इतरही वास्तूकडे लक्ष वेधले गेले. पुढील काळात या किल्ल्याची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यानंतर अंचलेश्वर मंदिर, अपूर्ण देवालय, गोंड राजा समाधी, जुनोन्याचे जलमहल अशा अनेक ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा इको प्रोने विडा उचलला आहे. किल्ल्यालगतचे अतिक्रमण काढण्यासाठी लोकांनी स्वत:च पुढाकार घेतला. या मोहिमेला आता साडेसातशे दिवस होत आहेत, आम्ही अजूनही अध्रेच काम केले आहे, अजून बरेच करायचे बाकी आहे, असे या मोहिमेतील तरुण सांगतात. २०-२५ ठिकाणी ही मोहीम सुरू होणार आहे आणि काही ठिकाणी ते सुरूही झाले आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. त्यांचा पदस्पर्श जिथे झाला, तो ऐतिहासिक वारसा आपणच जपायला हवा, हा संदेश त्यांनी दिला आणि आता राज्यातील इतरही शहरांतून तरुणाईची अशीच चळवळ सुरू होऊ पाहते आहे.

‘इको प्रो’च्या फौजेचे हे यश पहिलेच नव्हे. यापूर्वी सरकारशी संघर्षांतही या संघटनेने यश मिळवले होते. त्यांनी दिलेला अदानीचा लढा असाच देशभर गाजला होता. युवा एकत्र आले तर ते बदल घडवून आणू शकतात, हा संदेश त्यांनी दिला. ‘इको प्रो’ २००६ ला स्थापन झाली आणि त्यानंतर दोनच वर्षांत अदानीचा प्रकल्प जंगलावर गदा आणू पाहतोय हे या सेनेला कळले. ज्या जंगलात आपण भटकंती करतो, ज्या जंगलातील वन्यजीवांना आपण जाणतो, त्यांच्यावर प्रकल्पाचे संकट कोसळू द्यायचे नाही असा निर्धार त्यांनी केला. या प्रकल्पामुळे ताडोबा ते इंद्रावती व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा मोठा कॉरिडॉर तुटणार होता. आधीच जिल्ह्यात अनेक खाणी होत्या. त्यामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्येला हा जिल्हा सामोरे जात होता. त्यातच ही ‘ओपनकास्ट’ तर भारतातील सर्वात मोठी खाण होती. त्यामुळे होणारे नुकसानही मोठेच होते. या मुद्दय़ावर लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुणीही फारसा प्रतिसाद दिला नाही. पण पर्यावरणाचा मुद्दा पटवून दिला तेव्हा सारेच गोळा झाले. ही खाण होऊ द्यायची नाही असा निर्धार या फौजेने केला आणि १५ डिसेंबर २००८ ला नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात हा चमू उपोषणाला बसला. त्या वेळी अनेकांनी सहकार्य केले. तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते त्यांना भेटायला आले आणि आश्वासनांची पुडी सोडून गेले. त्यासाठी समिती बनवून त्यांच्या बैठका घेतल्या, पण तो फक्त देखावा होता हे यांच्या लक्षात आले. मग पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला गेला. जुलै २००९ मध्ये १४ दिवस बंडू धोत्रे याने उपोषण केले. या वेळी अनेक संस्था, संघटना, राजकीय पक्ष त्याच्या पाठीशी उभे राहिले. उपोषणाच्या नवव्या दिवशी चंद्रपूरकरांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला. ही वार्ता तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांच्या कानावर गेली आणि ते स्वत: भेटायला आले. त्यांनी ‘खाण होऊ देणार नाही’ असे आश्वासन दिले आणि ते आश्वासन पाळलेसुद्धा! वाघांच्या आणि वन्यजीवांच्या अधिवास संरक्षणासाठी तरुणांनी उभारलेला लढा यशस्वी ठरला.

समाजासाठी काही तरी करू पाहणाऱ्या या तरुणाईच्या फौजेला अगदी सैन्याइतकीच शिस्त असू शकते हे ‘इको प्रो’मधील सहभागींकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. या संघटनेचा गणवेश आहे आणि मोहिमेवर निघताना त्यांचा प्रत्येक सैनिक हा गणवेश घालूनच बाहेर पडतो. दोन हजारांपैकी सुमारे ३५३ सैनिक गणवेशधारी आहेत आणि मुख्य म्हणजे त्यात युवतींचाही समावेश आहे. गणवेश अंगावर चढवला तर आतून ऊर्मी येते ही त्यांची ठाम भावना.

‘इको प्रो’चा कोणताही सैनिक काही सर्वकाळ काम करत नाही. तो पैसा आणि प्रसिद्धीसाठीही काम करत नाही. ही सर्व मुले, मुली आपापले शिक्षण, व्यवसाय, नोकरी सांभाळूनच काम करतात. नि:स्वार्थ काम करणारी ही फळी मोहिमेवर जाण्यासाठी एका संदेशावर तयार होतात. सोयीची वेळ, संघटनेच्या १३ उपक्रमांपैकी सोयीचा उपक्रम निवडून त्यांचे योगदान सुरू असते. खरे तर समाजासाठी असणाऱ्या या मोहिमा पैशाशिवाय शक्य नाहीत, पण यांना कधी कुणापुढे हात पसरावे लागत नाही. ही सेना जेव्हा मोहिमेवर निघते तेव्हा लागणाऱ्या मदतीसाठी आपोआपच हात समोर येतात.

rakhi.chavan@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta unbelievable success stories