संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेचे प्रमुख म्हणून जॉर्डनचे प्रिन्स झैद बिन अली राद यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अरब जगतातील एका व्यक्तीची निवड झाली, हे झैद यांच्या निवडीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ आहे. त्यांच्या नेमणुकीमुळे अरब देशांबाबतच्या अन्य देशांच्या कडक भूमिकेला धक्का बसेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, झैद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात इराक आणि सीरियामध्ये ‘आयएसआयएस’ अतिरेकी संघटनेकडून होत असलेल्या हिंसाचारावर बोट ठेवले आणि त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका निवळल्या.
संयुक्त राष्ट्रांची मानवाधिकार परिषद तशी फारशी प्रभावी संस्था नाही. जगभरातील नागरिकांच्या मानवाधिकारांचे संरक्षण करणे हे या परिषदेचे प्रमुख काम असते.  अशा परिषदेचे प्रमुख म्हणून झैद यांनी कार्यभार स्वीकारला आहे. इराक आणि सीरियातील राजघराण्यांचे प्रमुख असलेले राद बिन झैद यांचे ते पुत्र आहेत. म्हणजेच, केवळ अरब जगताशीच नव्हे तर अरब राजघराण्यांतही त्यांचा मोठा प्रभाव आहे. २६ जानेवारी १९६४ रोजी जॉर्डनमधील अम्मान येथे जन्मलेल्या प्रिन्स झैद यांनी इंग्लंडमधील सरेतील ‘रीड्स स्कूल’मधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून त्यांनी कलाशाखेची पदवी मिळवली आणि केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी.ही प्राप्त केली. १९९६मध्ये संयुक्त राष्ट्रांतील जॉर्डनचे कायमस्वरूपी उपप्रतिनिधी म्हणून त्यांची संयुक्त राष्ट्रांत वर्णी लागली व २०००मध्ये ते कायमस्वरूपी प्रतिनिधी बनले. या पदावर सात वर्षे काम केल्यानंतर पुढील तीन वर्षे ते अमेरिकेतील जॉर्डनचे राजदूत होते. पुढे पुन्हा संयुक्त राष्ट्रांत परतल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील विविध समित्यांचे प्रमुखपद त्यांनी भूषवले.
या वर्षी जून महिन्यात झैद यांची मानवाधिकार परिषदेच्या प्रमुखपदी निवड जाहीर झाली, तेव्हा त्यांच्या भूमिकेबद्दल इस्रायलसह काही देशांतील विश्लेषकांनी साशंकता व्यक्तकेली होती. अरब राजघराण्यातील एखादी व्यक्ती तेथूनच निर्माण केल्या जाणाऱ्या संघर्षांत्मक परिस्थितीतून मार्ग कसा काढेल, असा सवाल ही मंडळी करत आहेत. या खुर्चीवर बसणारा पहिला अरब नागरिक असलेल्या झैद यांच्यापुढे मात्र, सर्वात मोठे आव्हान आपल्या देशातील नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करणे हेच आहे. निवड झाल्यानंतरच्या पहिल्या भाषणात ‘आयएसआयएस निर्मित राष्ट्र स्वार्थी, रक्तपाती आणि कठोर असेल,’ असा इशारा देत त्यांनी हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. एवढा स्पष्ट इशारा देणारे पहिले अरब नेते, म्हणून जगभरच्या प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रशंसाही सुरू केली आहेच!