29 March 2020

News Flash

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कला

र्जनशील कलाकृती मानवी हाताने साकारलेल्या नसल्या तरी, त्यांसाठीचा ‘कोड’ आजवर तरी मानवानेच तयार केला आहे.

|| नितीन अरुण कुलकर्णी

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून निराळे नवसृजन करता येणे आता शक्य आहे. या सर्जनशील कलाकृती मानवी हाताने साकारलेल्या नसल्या तरी, त्यांसाठीचा ‘कोड’ आजवर तरी मानवानेच तयार केला आहे. मात्र अनुभव, भावना आणि कला यांच्या संबंधांविषयीचे प्रश्न कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण होतात..

सध्या चर्चिल्या जाणाऱ्या काही विषयांपैकी ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ची (ए.आय.) चर्चा परवलीची आहे. यंत्रमानवच माणसाची कामे करणार असल्याने माणसांच्या कामाचे स्वरूप बदलणार, अशी भाकिते तज्ज्ञ मंडळी करत असतात. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेकडे तात्त्विक व संकल्पना विचारातून बघितले तर काय समजेल? मानवी व यांत्रिक असे काही वेगळे असते का, की आज त्यांची सरमिसळ झाली आहे?

अगदी साध्या शब्दात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणजे कुठल्याही यंत्राला माणसांसारखे वागायला व विचार करायला लावणे. म्हणजे यंत्राला माणूस बनवण्याच्या दिशेने नेणे. या कल्पनावत वाटणाऱ्या प्रेरणेचा विचार केला तर आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील ते असे :

(१)  वस्तू व यंत्राला व्यक्तीसारखे अस्तित्व बहाल करणे, त्याला अनुभवजन्य व्यक्तिमत्त्व देणे. जसे की आपला स्वत:चा पाणी पिण्याचा लोटा किंवा पेला असतो, पाणी त्यातून नाही मिळाले तर कसे तरी वाटते. स्वानुभवातून अशासारखी अनेक उदाहरणे आपल्या लक्षात येतील.

(२) वस्तू, यंत्र व मानव यांचे एकत्रित चालणारे जीवन जणू काही ‘जीवन-यंत्र’! जसे की आपले वेगवान लोकल अथवा बाइकशी असलेले उपयोगाचे नाते. हे पाहिले तर अशी किती तरी यंत्रे व डिजिटल साधने आपण दिवसभरात वापरत असू. मोबाइल फोन हा आपला चालता बोलता संगणक, कॅमेरा, टेलिव्हिजन व दूरध्वनी संच असे सर्व झाला आहे, तो हरवला तर आपली काय स्थिती होते ते आठवून बघा.

(३) माणसाचे यंत्रासारखे जगणे! भावना व विचार न करता दैनंदिन कृती करत राहणे. ‘यंत्रवत (जगणे)’ असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला असे काही, जे मानवी विचार व भावनाविरहित आहे, अशा क्रियेचा उल्लेख करायचा असतो. आणि खरे तर अशा क्रिया या एकंदरीत प्राणी, वनस्पती व खनिज विश्वाशी संबंधित असतात, ज्याखेरीज जीवन चालणे अशक्यप्राय असते. बऱ्याचदा नोकरी करणाऱ्या सृजनशील व्यक्तींना असे वारंवार लक्षात येते की, आपण यंत्रवत बनलो. नोकरी अबाधित ठेवून पैसे मिळतात व सृजनही चालू राहते; परंतु नोकरीतील कुशलता म्हणजे भावनेखेरीजची यांत्रिकता! मनावर दगड ठेवल्याखेरीज या जगात टिकणे अशक्यप्राय वाटते. निसर्गातल्या प्रतिक्षिप्त क्रियेतल्या यांत्रिकतेतही मेंदूतील गुंतागुंतीची प्रगत प्रणाली कार्यरत असते.

दुसरा भाग आला तो म्हणजे भावनेच्या अडचणीचा. काम करताना आपल्याला ते काम आवडते की नाही ही भावना आपल्याला जास्त महत्त्वाची असते, त्यामुळे कामातल्या यांत्रिकतेपेक्षा त्यातल्या स्मृती व काळाची जाणीव आपल्याला जास्त महत्त्वाची असते. आपल्या जगण्यात आपण भावना व यात्रिकतेचा मेळ साधत असतो.

(४) यंत्राला भावना बहाल करण्याची योजना- आताची स्थिती बरीच प्रगत झाली आहे. माणसाप्रमाणे काम करणारी यंत्रे बनली आहेत. माणसाने दिलेली आज्ञा समजून त्याप्रमाणे कृती करवून घेणे आता शक्य झाले आहे. या पुढचा टप्पा म्हणजे मानवी भावभावनांचे आकलन करून घेऊन मग कृती करणे व सामान्य ज्ञानाबरहुकूम काम करणे, ज्यासाठी माणसाला सेकंदाचाही अवधी लागत नाही. म्हणजे लिंबू पाहताक्षणी आपल्याला कळते की हे लिंबू आहे व ते अती आंबट फळ असते हेही कळते. पुढे जाऊन जिभेला पाणी सुटते हे वेगळेच.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगत स्थितीमुळे आपल्या वारंवार एक गोष्ट लक्षात येते की, निसर्गाची रचना किती गुंतागुंतीची व समग्र आहे. ही प्रणाली समजून व तिचा उपयोग करून घेण्यासाठी या प्रणालीचे वेगवेगळे भाग करावे लागतात, ही ठरतात वेगवेगळी कार्यक्षेत्रे व शाखा-उपशाखा. एकाच शरीराला नीट करायला किती तरी स्पेशलिस्ट डॉक्टरांची गरज लागते, आठवून बघा!

यातूनच एक गोष्ट लक्षात येते की, माणसाच्या बोधनक्षमतेला मर्यादा आहेत, त्यातूनच हे विभाजन आवश्यक ठरते. निसर्गात वेगवेगळ्या भागांचे साहचर्य आपल्याला नैसर्गिकरीत्याच आढळते. कृत्रिम बुद्धिमत्ता बहाल करण्याच्या कामात मात्र असे साहचर्यदेखील कृत्रिमपणे तयार करावे लागते.

डिजिटल तंत्रज्ञान हे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अनेक क्षेत्रांना जोडून समन्वय करणारा जणू आत्माच ठरत आहे.

माणूस जगायला लागतो म्हणजे आपल्या आसपासचे वातावरण- यात वेगवेगळ्या वस्तू आल्या, निवारा, संस्कृती, चालीरीती, संवादाचे संकेत आले तसेच या सर्वाची अपरिहार्यताही आलीच. हळूहळू आपला जीवनाचा अर्थ सहजीवनाकडून परावलंबनाकडे झुकतो. यातूनच मानवी जीवनाचा विस्तार करणारे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते. न संपणाऱ्या गरजा पुरवणे हेच काम होऊन बसते.

मानवी क्रियेत एकप्रकारचा साचेबद्धपणा आला की त्या कामामध्ये परिणामकारकता येते व ते काम जलदगतीनेही होते. कलाकुसरीचे काम याचेच एक उत्तम उदाहरण आहे. अर्थात, नवसृजनात याउलट वेगळेपणा हवा असतो. पण चाकोरीत पडणे हेदेखील मानवीच असते. ‘टू र्ए इज ूमन’; चूक होणे हे मानवी आहे व माफ करणे दैवी! ही उक्ती माणसाला उणिवेची मुभा बहाल करते. यंत्राकडून काम करून घेताना मात्र आपल्याला परिपूर्णता हवी असते. मुळात यंत्राला माणसापेक्षा परिपूर्ण बनवण्यात माणसाची महानता अवलंबून असते. परंतु आज तयार होणारी कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज यंत्राला चांगली चूक करायलाही शिकवेल असे दिसते.

अल्गोरिदम म्हणजे संगणकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी अंमलबजावणी करण्यायोग्य सूचनांचा परिपूर्ण अनुक्रम. अल्गोरिदमद्वारे गणना, विदेवर प्रक्रिया (डेटा प्रोसेसिंग), स्वयंचलित तर्क आणि इतर कार्ये साधण्यात येतात. यासाठी सुस्पष्ट असे कोड तयार केलेले असतात, यातून माहितीचे स्वयंचलित विश्लेषण होते व ‘आउटपुट’ तयार होतो. आणि अशी रचना ही मानवाच्या क्षमतेला ओलांडून पुढे जाणारी किंवा या क्षमतेचे अनुकरण करणारी असते.

‘डीपफेक’ या कृत्रिम बुद्धिमत्ताधारित डिजिटल तंत्राद्वारे एखाद्या खऱ्या व्यक्तीचा अस्तित्वात नसलेला व्हिडीओ बनवता येतो. हा खोटा व्हिडीओ दुसऱ्याच कुणातरी व्यक्तीच्या व्हिडीओतील हालचालींवर बेतलेला असतो. जिवंत नसलेल्या व्यक्तीच्या चित्रावरून व्हिडीओ बनवला जाऊ शकतो.

लिओनार्दो दा विंची याच्या ‘मोनालिसा’ या अतिप्रसिद्ध व्यक्तिचित्राचा डीपफेक मॉस्कोमधील सॅमसंगच्या एआय संशोधन प्रयोगशाळेत तयार केला गेला आहे. त्यासाठी, सॅमसंगच्या अल्गोरिदमना यूटय़ूबवरून जमलेल्या सेलिब्रिटींच्या सात हजार प्रतिमांच्या सार्वजनिक डेटाबेसवर प्रशिक्षण देण्यात आले होते. एआय सिस्टीमने चेहऱ्यातील वैशिष्टय़े आणि हालचालींच्या प्रतिमा तयार करून त्या पुन्हा ‘जिवंत’ केल्या. काही जणांना अशी चिंता आहे की या ‘डीपफेक’ तंत्राचा गैरवापर होण्याची मोठी शक्यता आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेतून साकारलेल्या कलाकृतीचे  एक गाजलेले उदाहरण – पॅरिस येथील ‘ऑब्व्हिअस’ नावाच्या कलासमूहाने (आर्ट कलेक्टिव्हने) ‘एडमंड बेलामीचे पोट्र्रेट’ एआय तंत्रज्ञानाने बनवले जे ख्रिस्टीजच्या लिलावात ४,३२,५०० डॉलर्सना विकले गेले, ही किंमत त्या चित्राच्या अंदाजित किमतीपेक्षा सुमारे ४५ पट जास्त होती. १९ वर्षीय रॉबी बॅरॅटच्या अल्गोरिदमच्या कोडमुळे हे शक्य झाले, परंतु अद्याप त्याचे पुरेसे श्रेय त्याला न दिल्याची नोंद संकेतस्थळाने केली आहे. अर्थात हे चित्र तेवढे स्पष्ट व रेखीव आलेले नाही.

आणखी एक प्रयोग कला व एआयच्या संयोगातून होतो आहे, त्याचे नाव ‘पोएम पोर्ट्ेट्स’. ही एक प्रायोगिक व सामूहिक कलाकृती आहे आणि ती एआय आणि मानवी सर्जनशीलतेच्या छेदिबदूवर बेतलेली आहे – कविता, डिझाइन आणि मशीन लìनगच्या संयोगातून, कलाकार आणि डिझाइनर ‘एस डेव्हलिन’ यांनी गूगलच्या कला आणि संस्कृती प्रयोगशाळेच्या आणि सर्जनशील तंत्रज्ञ रॉस गुडविन यांच्या सहकार्याने ही संकल्पना उभी केली आहे. त्यांनी आपल्याला आपल्या आवडीचा एक शब्द देण्यासाठी आमंत्रित केले आहे.  आपला शब्द त्वरित १९व्या शतकातील कवितेच्या २५ दशलक्ष शब्दांवर आधारित अल्गोरिदमद्वारे तयार केलेल्या मूळ दोन ओळींच्या कवितेमध्ये त्वरित समाविला जातो. या ओळी एकत्रितपणे कायम विकसित होत जाणारी सामूहिक कविता तयार करतात. आपण सामुदायिक कवितेला दान केलेला प्रत्येक शब्द आपल्या कवितेच्या मूळ ओळीने प्रकाशित केलेल्या आपल्या चेहऱ्याचे एक अनोखे ‘पोएमपोट्र्रेट’ तयार करते.

अशा प्रकारच्या प्रयोगांमधून हे नक्की लक्षात येते की, कृत्रिम बुद्धिमत्तेशी कलेचा आत्तापर्यंत असलेला संबंध हा अनोखा व सहकार्याचा आहे विरोधाचा नव्हे.

लेखक दृश्यकला व क्रयवस्तू विश्लेषक असून ‘नीफ्ट’ येथे अध्यापन करतात. ईमेल : nitindrak@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2019 12:51 am

Web Title: artificial intelligence and art akp 94
Next Stories
1 विध्वंस!
2 हालचाल, वेग आणि धुंदी..
3 विरूपाची विविध रूपे..
Just Now!
X