लडाखमधलं बौद्ध मंदिर, हम्पीचं मंदिर, मुंबई हायकोर्ट, टाऊन हॉल, जेजे, केईएम रुग्णालये, डेव्हिड ससून किंवा एशियाटिक लायब्ररी.. गेली २० वर्षे आभा लांबा देशभरातील या ऐतिहासिक वारसा मानल्या गेलेल्या वास्तूंच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी झटत आहेत. जनजागृती हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग. सोबतीला झपाटलेल्या आर्किटेक्टची पिढी घडवण्याचं कामही त्या करत आहेत आणि या सर्वामध्ये पती हर्ष त्यांना अगदी मनापासून आवडीने साथ देताहेत. मुलीला सोबत घेऊन हा त्यांचा प्रवास सुरू आहे. त्यांच्या या प्रवासाविषयी..

मुंबईचं सौंदर्य दोन गोष्टींमध्ये आहे, एक म्हणजे भव्य समुद्र आणि दुसरं म्हणजे इथल्या जुन्या, ऐतिहासिक इमारती. हे सौंदर्य जपण्याचा आग्रह धरत त्यासाठी झटणारे अनेक हात मुंबईमध्ये आहेत, त्यापैकीच एक आहेत आभा लांबा, कॉन्झव्‍‌र्हेशन आर्किटेक्ट. कोलकात्यात जन्म, वडिलांच्या फिरतीच्या बदलीमुळे दिल्लीसह इतर शहरांमध्ये असलेलं वास्तव्य, या सगळ्या पाश्र्वभूमीवर आभा लांबा आणि वित्तीय क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्यरत असणारे त्यांचे पती हर्ष लांबा यांनी लग्नानंतर मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
Edwin Montagu
विश्लेषण: एका मिठाईवाल्याच्या विजयाने ब्रिटिश सरकार हादरले; १९२० सालची निवडणूक का ठरली महत्त्वाची?
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

आभा आणि हर्ष यांचे कुटुंब एकमेकांच्या चांगल्या परिचयाचं, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा घरून विरोध व्हायचा काही प्रश्नच नव्हता. लग्नाच्या वेळेला आभाने कॉन्झव्‍‌र्हेशन आर्किटेक्चर या क्षेत्रामध्येच काम करायचा निश्चय पक्का केलेला होता. १९९५ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले आणि ठरल्याप्रमाणे मुंबईत आले.

याबद्दल हर्ष लांबा सांगतात की, ‘‘मी आधी अमेरिकेत होतो. भारतात परत यायचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई हेच शहर डोळ्यासमोर होतं. आभाचीही मुंबईला पसंती होती. आपापल्या क्षेत्रात काम करत आम्ही आमचा संसार सुरू केला. १९९८ मध्ये आभाने डी.एन. रोडच्या (दादाभाई नौरोजी मार्ग) दुकानांच्या पाटय़ांचं काम हातात घेतलं. त्यामध्ये १०० पेक्षा जास्त दुकानं होती. त्या भागात दुकानांच्या पाटय़ा इतक्या मोठय़ा होत्या की, त्यामागच्या मूळ वास्तूचं सौंदर्य लक्षातच येत नव्हतं. तेव्हा जुन्या वास्तूंचं संरक्षण आणि संवर्धन हा प्रकारही लोकांना फारसा माहिती नव्हता. त्यामुळे त्याबद्दल जागृती करणं हा तिच्या कामाचा महत्त्वाचा भाग होता. त्या दुकानदारांशी सतत बोलून, त्यांच्याशी बैठका घेऊन, त्यांना वास्तूचं सौंदर्य लक्षात आणून देत, तिनं त्यांना त्या पाटय़ांचे आकार लहान करायला राजी केलं. त्यासाठी तिला महापालिकेच्या अधिकाऱ्यांशीही सतत चर्चा करायला लागायच्या. जवळपास ४ र्वष ते काम चाललं. त्यामध्ये प्रचंड आवड, खडतर परिश्रम असं सगळं काही होतं. या कामासाठी काही ट्रस्टनी आर्थिक मदत केली, त्यामुळे थोडं सोपं झालं.’’ हा प्रकल्प आभाला खूप काही शिकवून गेला, किंबहुना पुढच्या कामाचा पाया यावर रचला गेला असंही म्हणता येईल.

ऐतिहासिक इमारती अर्थात आपल्याला मिळालेला हा वारसा जपणं, जुन्या वास्तूंची पुनर्रचना या सर्व गोष्टी म्हणजे श्रीमंती चोचले आहेत, त्याचा सर्वसामान्य मुंबईकराशी काही संबंध नाही, असा एक सरसकट मतप्रवाह आढळून येतो. ‘‘तसं मुळीच नाही. श्रीमंत मुंबईकरांपेक्षा सर्वसामान्य मुंबईकरांचाच या हेरिटेज वास्तूंशी जास्त संबंध येतो,’’ आभा लांबा ठामपणे स्पष्ट करतात. ‘‘सर्वसामान्य परिस्थितीतल्या ९० टक्के मुंबईकरांचा जन्म होतो तो सरकारी रुग्णालयांमध्ये. जेजे, केईएम अशा  रुग्णालयाच्या इमारतींशी त्यांचा जन्मापासूनचा संबंध असतो. अनेक महापालिकेच्या शाळा हेरिटेज इमारतींमध्ये भरतात. डेव्हिड ससून किंवा एशियाटिक लायब्ररी अशी त्यांच्यासाठी असलेली वाचनालये जुन्या इमारतींमध्येच आहेत. लोकलचा प्रवास हा मुंबईकरांसाठी नित्यनियमाचा. वांद्रे, चर्चगेट, सीएसटी स्टेशनच्या इमारती हेरिटेज आहेत. न्यायालयांच्या इमारती जुन्या आहेत. अनेक जणांची कार्यालये हेरिटेज वास्तूंमध्ये आहेत. त्यामानाने श्रीमंत मुंबईकरांचा जन्म लीलावती, ब्रीच कँडी अशा हॉस्पिटल्समध्ये होतो, त्यांचे शिक्षण आधुनिक इमारती असलेल्या शाळा-कॉलेजमध्ये होते. थोडक्यात सांगायचं तर सर्वसामान्य मुंबईकरांचा या हेरिटेज वास्तूंशी जितका जवळचा संबंध असतो, तितका इतरांचा नसतो. फक्त त्यांना त्याची जाणीव नसते. एकदा त्यांना ही जाणीव करून दिली की, त्यांचं या हेरिटेज वास्तूंवर मनापासून प्रेम असतं आणि त्यांना तो जपायचा असतो.’’

आभा यांनी ९०च्या दशकात हे काम सुरू केलं तेव्हा त्याबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. मुंबईमध्ये फक्त राहुल मेहरोत्रा असोसिएट्स हे काम करत होते. ‘‘आभाने हे काम सुरू केलं तेव्हा ती पहिली आणि एकमेव स्त्री कॉन्झव्‍‌र्हेशन आर्किटेक्ट होती. सुरुवातीला फारसे पैसेही नव्हते यामध्ये. माझा त्याबद्दल काही आक्षेप नव्हता. तिची ज्या कामामध्ये पॅशन आहे, ते तिने करत राहावं असं मला वाटायचं. खूप कमी लोकांना एखाद्या कामाबद्दल पॅशन असते, त्याहून कमी लोकांना त्यामध्ये काम करायला मिळतं आणि पॅशनच्या कामातून अर्थार्जन करण्याचं भाग्य तर त्याहून कमी लोकांना मिळतं. आभाने तिच्या कष्टातून आणि चिकाटीने हे साध्य केलं. त्या काळात तिनं वेगवेगळ्या लोकांशी अनेक बैठका घेतल्या, त्यांना हेरिटेज वास्तूंचं सौंदर्य आणि त्यांच्या संरक्षणाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी अपार कष्ट घेतले. कधी कधी तिला अगदी हताश वाटायचं; पण हिंमत न हारता तिनं काम सुरूच ठेवलं आणि त्याचं फळही मिळालं.’’ पुढे याच प्रकल्पासाठी आभाला ‘युनेस्को’चा पहिला पुरस्कार मिळाला.

त्या वेळी आभाला कधी कधी काम संपवून घरी यायला उशीर व्हायचा. हर्षला अमेरिकेचे काही संस्कार उपयोगी पडले. ‘‘मला तिथं स्वयंपाकाची सवय झाली होती. इथेही आभाने घरी आल्यावर साग्रसंगीत स्वयंपाक केला पाहिजे, अशी माझी अपेक्षा नसायची. मी थोडा स्वयंपाक करून ठेवायचो. आभा आल्यावर उरलेलं थोडं करायची,’’ हर्ष सांगतात.

डीएन रोडचा प्रकल्प फसला असता तर, चार वर्षांच्या कालावधीत मध्येच धीर सुटला असता तर? ‘‘तर मग मी आज जे काही काम करत आहे, ते कदाचित करताना दिसले नसते. मीही सर्वसामान्य इमारतींचं आर्किटेक्चर काम करत बसले असते, कदाचित..’’ आभा लांबा एक शक्यता स्वत:शीच अजमावून बघतात.

डीएन रोडच्या प्रकल्पाने आभाच्या कामाचा पाया घातला, असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर लडाखमधलं बौद्ध मंदिर, हम्पीचं मंदिर, मुंबई हायकोर्ट, टाऊन हॉल, मुंबई विद्यापीठाचा कॉनव्होकेशन हॉल, मणिभवनच्या छपराची दुरुस्ती अशा अनेक महत्त्वाच्या इमारतींवर तिनं काम केलं. या प्रवासात हर्ष यांची सोबत होतीच. ‘‘अनेक प्रकल्पांच्या निमित्तानं आभाला दूर जावं लागायचं. काही वेळेला मी आणि आमची मुलगी अंबिकाही तिच्यासोबत जातो. आभाचं काम होतं, आमची फॅमिली टूर होते आणि मुलीबरोबर आम्हाला एकत्र वेळही घालवता येतो. आभाच्या साइट्सवर जायला मला आवडतं. तिच्यामुळे मलाही इतिहासात रुची निर्माण झाली, पण आमच्या मुलीने मला मागं टाकलंय.’’ अंबिका आता १५ वर्षांची आहे आणि तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा तिला इतिहास शिकण्याची अधिक चांगली संधीही मिळाली आहे.

‘‘अंबिका ७ महिन्यांची असताना तिच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यानंतर दोनच महिन्यांनी आभाला ‘आयझेनहॉवर’ ही खूप महत्त्वाची स्कॉलरशिप मिळाली. त्यासाठी तिला २ महिने अमेरिकेला जावे लागणार होते. तो फार कठीण काळ होता तिच्यासाठी. आम्ही अंबिकाला २ महिन्यांसाठी तिच्या आजीकडे ठेवलं. या काळात मी महिन्यातून ३-४ वेळा दिल्लीला जाऊन अंबिकाला भेटून यायचो.’’ हर्ष सांगतात. त्याकाळात आर्किटेक्ट आभा आणि अंबिकाची आई आभा यांच्यामध्ये सतत संघर्ष सुरू होता. तो २ महिने संपल्यावरच थांबला. ‘‘अंबिकाला मी आतापर्यंत अनेक साइट्सवर माझ्यासोबत नेलं आहे. कधीकधी तिची शाळा बुडते; पण त्याच वेळेला तिला तितकंच उत्तम दुसरं काही तरी शिकायला मिळालेलं असतं. अजंठाच्या लेण्यांचं काम सुरू असताना अंबिका माझ्यासोबत होती. त्या वेळी तिला थेट बौद्ध पंडितांकडून त्या लेण्यांबद्दल ऐकायला मिळालं. ते शिक्षण तिला शाळेत मिळणार नाही. मणिभवनचं काम सुरू असताना तर ती रोज जणू काही आजोबांच्या घरी जात आहोत अशा उत्साहाने माझ्यासोबत यायची. एकदा ती शाळेतून घरी आली तेच रडत रडत. मी तिला ‘काय झालं’ म्हणून विचारलं, तेव्हा तिनं सांगितलं की, तिच्या वर्गामधल्या मुलीनं गांधीजींना खूप वाईट म्हटलं होतं आणि ते अंबिकाला सहन झालं नव्हतं,’’ आभा लांबा जुनी आठवण सांगतात.

आज आभा यांच्यासोबत अनेक तरुण कॉन्झव्‍‌र्हेशन आर्किटेक्ट काम करत आहेत. त्यामध्ये मुलीदेखील आहेत. ‘‘अनेकदा मुली लग्नानंतर काम सोडतात. मला ते राष्ट्रीय नुकसान वाटतं, कारण सरकारी कॉलेजमध्ये एकेका सीटसाठी प्रचंड स्पर्धा असते. आमच्या शिक्षणावर सरकार भरपूर पैसे खर्च करतं. त्यामुळे अशा परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर कोणीही हे काम सोडू नये. अगदीच नाइलाज असेल तर मी समजू शकते, पण घरच्यांचा पाठिंबा असेल तर काहीच अशक्य नसतं आणि हे क्षेत्र असं आहे की, लग्नानंतर मूल झालं म्हणून ५-६ र्वष दूर गेलात तर पूर्णपणे या क्षेत्राबाहेर फेकला जाता. तुम्हाला पुन्हा परत यायचं असेल तर खूप कठीण असतं. त्यामुळे मुलींनी लग्नानंतर काम सोडू नये. आता कॉन्झव्‍‌र्हेशन आर्किटेक्टमध्ये पैसेही आहेत. आधी निधी गोळा करायला खूप अडचणी येत असत; पण ५ वर्षांपूर्वी सरकारी पातळीवरही हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनासाठी नियम आखण्यात आले. त्यामुळे निधी उभा करणं तुलनेनं सोपं झालं आहे.’’

गेली २० वर्षे आभा देशभरातील जुन्या, ऐतिहासिक वास्तूंच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी झटत आहेत. जनजागृती हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग. पुढेही काही वर्षे हे काम सुरूच राहणार आहे. सोबतीला झपाटलेल्या आर्किटेक्टची पिढी घडवण्याचं कामही त्या करत आहेत आणि या सर्वामध्ये पती हर्ष त्यांना अगदी मनापासून आवडीने साथ देताहेत; आपण विशेष काही करत आहोत असा विचार न करता..

आभा लांबा यांनी केलेली कामे

अजंठा लेणी (औरंगाबाद), मैत्रेय बुद्ध मंदिर (लडाख), चंद्रमुखेश्वर मंदिर आणि कृष्ण मंदिर (हम्पी), गोवळकोंडा किल्ला आणि कुतुबशाहची कबर (हैदराबाद), टेराकोटा मंदिर (मालुटी, झारखंड), लोथल सिंधू खोरे (गुजरात), शिशुपालगढ किल्ला (भुवनेश्वर), बाणगंगा मंदिर आणि टाकी (मुंबई), मुघलसराई (दोराहा, पंजाब), किल्ला मुबारक (पतियाळा), जिवाजीराव शिंदे वस्तुसंग्रहालय (जाई विलास पॅलेस, ग्वाल्हेर), गोला मार्केट (दिल्ली), पुणे इंजिनीयिरग कॉलेज (पुणे), कॅसा सॅन अँतोनियो (गोवा), काकोड फोर्ट हेरिटेज हॉटेल (मुन्नार, केरळ), ललिता महल पॅलेस हॉटेल (मैसूर), लाल किल्ला वस्तुसंग्रहालय (दिल्ली), नेहरू स्मृती वाचनालय आणि वस्तुसंग्रहालय, तीन मूर्ती भवन (दिल्ली), शीशमहल पॅलेस वस्तुसंग्रहालय (पतियाळा).

तर मुंबईतील पुढील ठिकाणे – मुंबई महापालिका मुख्यालय, मुंबई न्यायालये, एशियाटिक लायब्ररी आणि टाऊन हॉल, वांद्रे रेल्वे स्टेशन, क्रॉफर्ड मार्केट, रॉयल ऑपेरा हाऊस, कॉन्व्होकेशन हॉल, मुंबई विद्यापीठ, जेजे स्कूल ऑफ आर्ट, एल्फिन्स्टन कॉलेज, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मणीभवन गांधी संग्रहालय, टेक्स्टाइल मिल म्युझियम, छत्रपती शिवाजी टर्मिनस, जोतिबा फुले महापालिका मार्केट, ग्रँट मेडिकल कॉलेज, शांतीनिकेतन टाटा पॅलेस, एचएसबीसी इमारत आणि इतर अनेक ठिकाणे.

निमा पाटील nima_patil@hotmail.com