News Flash

लेसरचे वरदान

मानवाच्या संशोधक बुद्धीचा, इलेक्ट्रॉनिक्सचे जग हा एक मानबिंदू आहे. लेसर किरण ही संज्ञा १९६० पासून अस्तित्वात आली.

| December 24, 2013 06:30 am

मानवाच्या संशोधक बुद्धीचा, इलेक्ट्रॉनिक्सचे जग हा एक  मानबिंदू आहे. लेसर किरण ही संज्ञा १९६० पासून  अस्तित्वात आली. लेसर या अद्याक्षरांवरून ओळखल्या जाणाऱ्या अतिशक्तिवान किरणांचे विस्तृत स्वरुप आहे; ती पुढीलप्रमाणे छअरएफ (LASER (Light Amplification by Stimulated Emission of Radiation)
लेसर किरणांमध्ये समाविष्ट असलेली अतिमहान भेदक शक्ती, त्यापासून कोणत्याही स्वरुपाचे प्रदूषण किंवा इजा घडत नाही आणि अनेकविध प्रकारचे उपयोग, हा यातील महत्त्वाचा भाग ठरतो. भारतातील लेसर किरणांवर संशोधन करण्याच्या विभागाचा १९५० मध्ये श्रीगणेशा झाला. विशेषत: त्या शक्तिवान किरणांचा उपयोग संरक्षण खात्याच्या उत्पादनात कशाप्रकारे करता येईल यासाठी संरक्षण विज्ञान प्रयोगशाळा (डीएसएल- डिफेन्स सायन्स लॅबोरेटरी) स्थापन करण्यात आली. लेसर किरणांच्या उपयुक्ततेचा त्यानंतर सातत्याने चढता आलेख राहिला आहे. लेसर किरणांची निर्मिती आणि भौतिक विज्ञान यांची सांगड घालण्यात आल्यानंतर त्याचा वापर टप्प्याटप्प्याने शास्त्रीय संशोधन, लष्करी विज्ञान आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती, वैद्यकीय उद्योगधंदे, घरगुती वापराची साहित्ये, मनोरंजन अशाप्रकारे वृद्धिंगत होत राहिला. १९८० पासून लेजर किरणांचा वापर बायोमेडिकल विभागात करण्यास सुरुवात झाली. त्या किरणांची भेदकशक्ती, अचूकता आणि इतर कोणतेही दुष्परिणाम न घडण्याची शक्यता, याचा वापर मानवावरील शस्त्रक्रियांवर  करण्यात आला. विशेषत: मोतिबिंदू (कॅटरॅक्ट) आणि काचबिंदू (ग्लुकोमा) या डोळ्यांच्या आजारावर लेसरच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेनंतर कराव्या लागणाऱ्या उपचारातील उपयुक्तता केवळ प्रशंसनीय आहे. लेसर किरणांचा वापर करून दूर अंतरावरील पडद्यावर अतिभव्य चित्ररुप निर्माण करण्याचा प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झालेला आहे. पडद्यासमोर सहजपणे आठ-दहा हजार प्रेक्षक बसून व्यवस्थितपणे लेसर शोचा आनंद लुटू शकतात. कायरोजवळील जगविख्यात पिरॅमिड्सच्या प्रांगणात लेसर शो पाहण्याचे भाग्य प्रस्तुत लेखकाला लाभले. लेसर किरणांमुळे निर्माण होणारे रंग, दृश्ये आणि किमान चार ते पाच कि.मी. अंतरावरून रात्रीच्या गडद अंधारात पिरॅमिड्स, स्प्रिंक्स यावरील प्रकाशझोत केवळ अवर्णनीय, अविस्मरणीय ठरतो. याचा उपस्थित पाच हजार प्रेक्षकांना मनमुराद आनंद लुटता येतो. रॉकेट्सचे उड्डाण, रॉकेट्सना ठराविक गतीचा रेटा देऊन दूर ठराविक अंतरावरील लक्ष्याचा वेध  घेणे, उपग्रहांमार्फत दूरध्वनी, दूरदृश्य साकारणे, स्फोटकांचा भेद घेणे, कोणत्याही प्रकारचे अन्नधान्य, अन्नपदार्थाची टिकाऊ क्षमता वाढविणे, अणूसंभारित औषधांचा मानवी शरीरात वापर, मानवी उच्चारांचे अचूक शास्त्रीय पृथक्करण, विविध भाषांतील स्वरव्यंजने यांचा तौलनिक अभ्यास, असे अनेक प्रकारचे उपयोग वृद्धिंगत होत आहेत. विशेषत: कोणत्याही प्रकारच्या हवामानात, भौतिक बदल घडले तरी संदेशयंत्रणा कार्यरत राहील. यामध्ये लेसरचा वापर अत्यंत उपयुक्त ठरला आहे. दूर समुद्रात संकटात सापडलेले जहाज, जमिनीपासून उत्तुंग अंतरावरून उड्डाण करीत असताना विमानामध्ये निर्माण झालेली समस्या, वादळ, बर्फवृद्धी, महापूर आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्यांशी संपर्क साधणे, यासारख्या जीवनाच्या प्रत्येक अंगात लेजर किरणांनी आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2013 6:30 am

Web Title: boon of laser
Next Stories
1 चमकता कृष्णहिरा
2 टाकाऊ टायर्सपासून उपयुक्त घटक
3 पाणी : जीवनाचे उगमस्थान
Just Now!
X