व्हॉयेजर-१ या अंतराळयानानं अलीकडेच आपल्या सूर्याचं प्रभावक्षेत्र ओलांडून आंतर-तारकीय अवकाशात प्रवेश केल्याचं अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेने जाहीर केले आहे. हा लेख लिहित असताना हे यान सूर्यापासून सुमारे १९ अब्ज कि.मी. अंतरावर होतं आणि प्रत्येक सेकंदाला १७ कि.मी. एवढय़ा वेगानं सूर्यापासून दूर जात होतं. पृथ्वीचा  हा दूत आता खऱ्या अर्थानं अनंताच्या प्रवासाला निघालेला आहे. मानवानं सोडलेलं एखादं अंतराळयान पहिल्यांदाच आंतर- तारकीय (म्हणजे दोन ताऱ्यांच्या मधला) प्रदेशात पोचलं आहे. हा मानवी इतिहासातला एक क्रांतिकारी क्षण आहे.
या यानाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वैज्ञानिकांना अपेक्षित असलेल्या कामगिरीच्या कितीतरी पटीनं अधिक कामगिरी त्यानं पार पाडली आहे. ५ सप्टेंबर १९७७ या दिवशी व्हॉयेजर-१ या यानानं पृथ्वीवरून उड्डाण केलं. त्याआधी, म्हणजे २० ऑगस्ट १९७७ या दिवशी व्हॉयेजर-२ या यानाला अवकाशात पाठविण्यात आलं. गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ही यानं सोडण्यात आली होती आणि त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती. या यानाचं आयुष्य पाच वर्षं असेल, असं गृहित धरून मोहिमेची आखणी झाली होती, पण अतिशय आनंदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ३७ वर्षांनंतरही ही यानं उत्तम कामगिरी बजावत आहेत.
सुरुवातीच्या काळात व्हायेजर्सनी गुरू,  शनी हे ग्रह तसेच त्यांच्या उपग्रहांचा सविस्तर अभ्यास केला. युरेनस आणि नेपच्यून या  ग्रहांना भेट देणारी ही पहिली यानं ठरली. गुरूच्या वातावरणात सतत प्रचंड उलथापालथ  चालू असते. या वातावरणाची विशेषत: गुरूवर असलेल्या भल्या मोठय़ा लाल ठिपक्याची तपशीलवार छायाचित्रं या यानांनी पृथ्वीकडे पाठवली. गुरूला अनेक उपग्रह आहेत. आयो हा त्यापैकी एक. या उपग्रहाचं वैशिष्टय़ म्हणजे त्याच्यावर अनेक जागृत ज्वालामुखी आहेत. त्यांचीही छायाचित्रं व्हायोजर्सनी पाठवली. शनीला असलेली कडी हा वैज्ञानिकांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्याही कुतूहलाचा विषय. त्या कडय़ांचीही सुस्पष्ट- जवळून घेतलेली छायाचित्रं आपल्याला या यानांमुळं उपलब्ध झाली आहेत.
व्हॉयेजर-२ सध्या सूर्यापासून १५ अब्ज कि.मी. अंतरावर आहे. या दोन्ही यानांकडून ‘नासा’कडे रोज संदेश येत आहेत. व्हॉयेजरनं पाठवलेल्या संदेशांची शक्ती (पॉवर) अतिशय कमी, म्हणजे अवघी २३ व्ॉट असते.  (आपण घरी जी स्लीम टय़ूबलाईट वापरतो तिची शक्ती सुमारे २८ व्ॉट असते). हा संदेश प्रचंड अंतर कापून पृथ्वीपर्यंत पोहोचतो तेव्हा तो अतिशय क्षीण बनलेला असतो.  त्याची तीव्रता व्ॉटच्या दहाचा उणे अठरा घात एवढी कमी बनलेली असते. तरीही हे संदेश ग्रहण केले जातात आणि त्यांचा अर्थ लावला जातो हा एक चमत्कारच म्हटला पाहिजे. व्हॉयेजरकडून येणारे संदेश प्रकाशाच्या वेगानं म्हणजे सेकंदाला तीन लाख कि.मी. एवढय़ा वेगानं प्रवास करतात. तरीही त्यांना पृथ्वीवर पोहोचायला तब्बल १७ तासांचा कालावधी लागतो. नासानं विविध अंतराळयानांशी संपर्क करण्यासाठी ऊीस्र् Deep Space Network नावाची यंत्रणा उभारलेली आहे. तिच्या मदतीनं व्हॉयेजरशी संदेशांची देवाणघेवाण  होत असते.
व्हॉयेजरचं खास वैशिष्टय़ म्हणजे त्याच्यावर ठेवण्यात आलेली सोनेरी तबकडी . या तबकडीवर पृथ्वीबद्दलची बरीच माहिती रेकॉर्ड करून ठेवलेली आहे. पृथ्वीवर नेहमी ऐकू येणारे आवाज उदा. पक्ष्यांचा किलबिलाट, धबधब्याचा किंवा रेल्वेचा आवाज इ. या शिवाय जगातल्या प्रमुख भाषांमधून दिलेले शुभेच्छा संदेशही या तबकडीवर आहेत. या भाषांमध्ये हिंदी भाषेचाही समावेश आहे. आपली सौरमाला, त्यातले पृथ्वीचे स्थान याचा नकाशाही या तबकडीवर आहे. हा सगळा मजकूर, छायाचित्रं इ. तयार करण्याचे काम ज्या वैज्ञानिकांनी केले त्यात कार्ल सेगन या प्रसिद्ध खगोल वैज्ञानिकाचा समावेश होता. त्याच्या छोटय़ा मुलाचे बोबडे बोलही या गोल्डन रेकॉर्डवर आहेत. तो म्हणतो- Hello from the children of planet earth! हा सगळा मजकूर / आवाज व्हॉयेजरच्या वेबसाईटवर आपल्याला पाहता / ऐकता येतो.
वैज्ञानिकांना अशी (भाबडी?) आशा आहे की भविष्यात कधीतरी व्हॉयेजर यान एखाद्या परग्रहावर उतरेल आणि तेथे असलेले मानव ही तबकडी पाहतील / वाचतील आणि पृथ्वीशी संपर्क साधतील. असं खरंच घडेल की नाही याचं उत्तर अर्थातच काळाच्या उदरात दडलेलं आहे. एक मात्र निश्चित की व्हॉयेजर यान आता अनंताच्या प्रवासाला निघाली आहेत. जिज्ञासूंनी या मोहिमेच्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. व्हॉयेजरनं अगदी अलीकडे पाठवलेलं आंतर-तारकीय अवकाशातले काही आवाज आपल्याला तेथे ऐकता येतील. http://www.voyager.jpl.nasa.gov.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनासाNasa
मराठीतील सर्व Sci इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa confirms voyager 1 probe has left the solar system
First published on: 12-11-2013 at 06:37 IST