अमेरिका अत्याधुनिक जगातील अत्यंत प्रगत, महत्त्वाचे राष्ट्र. गेल्या दीड दोन शतकात अमेरिकेने मानवाच्या प्रत्येक क्षेत्रात घेतलेली आघाडी केवळ आश्यर्यकारक, अविश्वसनीय ठरलेली आहे. टेलिफोनचा शोध लावणारा अलेक्झांडर ग्रॅहम बेल, विद्युत दिव्याची प्रथम निर्मिती करणारा थॉमस एडिसन, टेलिव्हिजन, विमानांची सर्वप्रथम यशस्वी उड्डाण करणारे राईटबंधू त्यानंतर विमानोद्योगात क्रांती करणारे बोईंग, लॉकहीड कंपन्या, चंद्रावर सर्वप्रथम पदार्पण करणारा नील आर्मस्ट्राँग, शेती व्यवसाय, आरोग्य, औषधे, हवामान विभाग, वाहतूक, वैद्यकीय संशोधन, कृत्रिम उपग्रह, रॉकेट्स, घरबांधणीमधील उत्तुंग इमारती, हॉलीवूडसारखे मनोरंजन क्षेत्र, क्रीडाप्रकार, नवनवीन खाद्यप्रकार, कोकाकोला सारखी शीतपेये थोडक्यात कोणतेही क्षेत्र घेतल्यास अमेरिकेने आपल्या उत्पादनाचा, संशोधनाचा, दर्जेदार निर्मितीचा, आधुनिकतेचा ठसा सर्व जगांवर जबरदस्त ताकदीने उमटविलेला आहे हे निर्विवाद सत्य आहे.
आश्चर्य म्हणजे गेल्या दोन शतकात पृथ्वीवरील अनेक देशांमधील विविध वंशाचे, जातीचे, वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे हरप्रकारची धाडसी व्यक्तिमत्त्वे अमेरिकेत आश्रयाला आली. प्रयत्नांना नवनिर्मितीची जबरदस्त साथसंगत होती. एका वाक्यात अमेरिकेच्या भव्यदिव्य यशस्वीतेचे, पराक्रमाचे वर्णन करावयाचे झाल्यास त्याला ‘वर्ल्ड मेल्टिंग पॉट’ असे चपखलपणे म्हणता येते. आपला पूर्वीचा इतिहास मागे ठेवून एकमेकांना सहकार्य करीत नवीन अत्याधुनिक राष्ट्र आणि त्याचा देदीप्यमान इतिहास अमेरिकेने घडविला आहे.
अमेरिका म्हणजे सर्वतऱ्हेच्या आश्चर्याचा आधुनिक देश आहे असा ठसा जगावर पक्का झाला. पण अमेरिकेत वेगवेगळ्या देशधर्माचे लोक का स्थलांतरीत झाले? केव्हा त्यांचे आगमन झाले? वेगवेगळ्या वैयक्तिक सवयी, संस्कृती विसरून त्यांनी एकत्रितपणे नवनिर्मिती का, कशी केली? इत्यादी अनेक प्रश्नांचा मागोवा संशोधक घेत आहेत. संसोधन करताना पुरातन जिवाश्मांचा अभ्यास आणि त्यानुसार अनुमान काढणे जास्तीत जास्त खात्रीशीर असते.
अमेरिका खंडाचे पूर्वज शोधण्यासाठी गेल्या चार-पाच दशकात विविध प्रकारचे संशोधन  साकारले आहे. या संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेक्सिकोच्या पूर्वेकडील, उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांच्यामधील ‘युकाटन शेलेन’ प्रदेशात सापडलेले मृतदेह. अ‍ॅटलांटिका महासागराच्या पश्चिमेस वेस्ट इंडिज बेटांच्या परिसरात युकाटन हा प्रांत संशोधकांचे केंद्रस्थान बनले.
युकाटनच्या प्रदेशात दाट जंगले, विरळवस्ती आणि काही ठिकाणी स्वच्छ, प्रदूषणरहित पाण्याची अत्यंत पारदर्शक स्वरूपाची तळी आहेत. त्या तळ्यांची खोली ३०-५० मिटर्स आणि रुंदी ७०-९० मिटर्स इतकी आहे. या तळ्यांच्या अंतस्थ भागाचे संशोधन करीत असताना बाजूला गुहांसारखा प्रदेश आढळला. त्यामध्ये स्टॅलॅगटाईट, स्टॅलॅगमाईट असे नैसर्गिकरीत्या तयार झालेले लवणस्तंभ आढळले. मेक्सिको विद्यापीठाचे संशोधक अलजेंड्रो टेराझेस, कार्मेन रोजास आणि तज्ज्ञ छायाचित्रकार युजिनो आर्वेझ यांना तळ्यांच्या काही भागात मानवी मृतदेहांचे अवशेष सापडले.
त्यांनी ते अवशेष गोळा करून मेक्सिको विद्यापीठातील पुरातत्त्वसंशोधकांना सादर केले. १९९० पासून त्या अवशेषांवर अत्याधुनिक पद्धतीने संशोधनास सुरुवात झाली. उत्सुकता वाढत गेली. जर्मनी, फ्रान्स, अमेरिका येथील वेगवेगळ्या विद्यापीठातील पुरातत्त्व आणि मानववंश संशोधक एकत्रितपणे कार्य करू लागले. मिळालेल्या कवटय़ा, अस्थी यांची जोडणी करून छायाचित्रण करून त्या व्यक्तींची एकंदरीत कल्पना येऊ लागली. शरीर रचनेतील, चेहऱ्यातील बदल आणि जिवाश्मांचा साधारणत: पंधरा ते वीस हजार वर्षांपूर्वीचा टप्पा निश्चित झाला.
उत्तर गोलार्धातील हवामान, परिसर, मानवी स्थलांतर, वनस्पती, प्राणी यांचा संकलीतपणे अभ्यास करून गेल्या काही वर्षांत अमेरिकेत आलेल्या मानवाचे चार प्रकारे आगमन झाले असावे अशाप्रकारची संशोधनपर विचारसरणी सुरू झालेली आहे. या स्थलांतराला प्रमुख कारण ठरले ते अश्मयुग ह्य़ा कालखंडात उत्तर ध्रुवीय प्रदेशातील विपरित हवामान. बर्फ बऱ्याच प्रमाणात विरघळू लागला. पाण्याची ठिकठिकाणी पातळी वृद्धिंगत होऊ लागली. तापमान अतिशय क्लेशदायक ठरू लागले, शेती उजाड झाली. शिकारी, भटक्या प्रवृत्तीच्या मानवसमूहाला उबदार, निसर्गसंपन्न परिसराकडे जाण्याची ओढ लागली आणि मानवसमूहाचे स्थलांतर होऊ लागले असावे.
मानव चार मार्गानी उत्तर अमेरिकेत स्थलांतरित झाला असावा असे संशोधकांनी एकत्रितपणे अनुमान काढले आहे. पहिला मार्ग सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी सुरू झाला. त्यामध्ये सैबेरिया, ग्रीनलँड, लॅपलँड या बर्फाळ प्रदेशातील मानव उत्तर अ‍ॅटलांटिकमधून कॅनडाच्या दक्षिण प्रदेशात पोहोचला आणि त्याचे दक्षिण दिशेला स्थलांतर सुरू झाले. दुसऱ्या मार्गाची सुरुवात पूर्व सैबेरिया, बेरींगची सामुद्रधुनी यापासून झाली. स्थलांतर करणारा मानव उत्तर पॅसिफिक मार्फत अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला. हा कालखंड साधारणत: बारा हजार वर्षांपूर्वीचा असावा. उत्तर अमेरिकेत गेल्यावर त्या समूहाचे दोन विभाग झाले असावेत.
त्यामुळे तिसरा स्थलांतरित समूह, जलमार्गाने उत्तर पॅसिफिकमधून प्रथमत: उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून स्थलांतरित होत होत सात आठ हजार वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील चिली, अर्जेटिना इत्यादी प्रदेशात पोहोचला आणि स्थायिक झाला. त्यांनी मासेमारी आणि काही प्रमाणात शेती व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले. चौथा समूह बेरिंगच्या सामुद्रधुनीमार्फत उत्तर अमेरिकेत प्रवेश करून जमिनीवरून दक्षिणेकडे स्थलांतरित होत राहिला. कार्डेलिअन आईस शीट, कॅनेडियन आईस शीट, क्लोव्हीस, मिडोक्रॉफ्ट मुरे स्प्रिंग अशा वेगवेगळ्या भूप्रदेशात स्थिरावला. त्या प्रदेशातील विस्तृत, अत्यंत सुपीक जमीन शेतीला पोषक ठरली. त्या प्रदेशात साधारणत: गेल्या दहा हजार वर्षांत गहू, मका, ओट यांची अति प्रचंड शेती साकारली असावी. क्लोव्हीस प्रांतातील समूह, भूमार्गाने ब्राझीलच्या उत्तर भागात पोहोचला आणि गेल्या चार ते पाच हजार वर्षांत त्या मानवसमूहाचे स्थलांतर दक्षिण अमेरिकेतील सर्व राष्ट्रांमध्ये झाले असावे. अशा चार प्रकारांनी गेल्या पंधरा ते सतरा हजार वर्षांत आधुनिक मानवाचे पूर्वज अमेरिकेत प्रवेशले, असे खात्रीशीरपणे संशोधक सांगतात, सिद्ध करतात. मूळ रेडइंडिअन्स आदिवासी कशाप्रकारे मागे सारले गेले, नष्ट झाले याबाबतीत मात्र खात्रीशीर जिवाश्म आधारित दाखले उपलब्ध नाहीत.