यंदाच्या ८ नोव्हेंबरपासून पु. ल. देशपांडे यांचं जन्मशताब्दीवर्ष सुरू होत आहे. यानिमित्ताने देशविदेशात नाना पातळ्यांवर, नाना प्रकारचे उपक्रम होणार आहेत. हौशी कलाकारांपासून व्यासंगी अभ्यासकांपर्यंत कोणालाही पुलंविषयी, त्यांच्या कलाकारकीर्दीविषयी कोणताही तपशील, विश्वासार्ह माहिती लागली तर ‘अमृतसिद्धी: पु. ल. समग्रदर्शन’ या ग्रंथाकडे वळावं लागेल. हा ग्रंथ पुलंच्या अमृत महोत्सवानिमित्त ८ नोव्हेंबर १९९५ ला पुण्यामध्ये ‘राजहंस’ प्रकाशनाने प्रसिद्ध केला. ७०० हून जास्त पृष्ठांच्या या द्विखंडात्मक ग्रंथावर सहलेखक म्हणून माझं नाव असावं, ही गोष्ट मला माझ्या श्रेयसच्या खात्यावर पहिल्यांदा नोंदवायला आवडेल.

आयुष्याची सुरुवातीची २०-२२ वर्षे विलेपाल्र्यात गेल्याने आणि तो पुलंचा भरभराटीचा काळ असल्याने माझ्या संस्कारक्षम वयावर त्यांचा कमालीचा प्रभाव होता. जसा तो इतरही अनेकांवर होता, असतो. पुलंबाबत माझे भाबडय़ाभक्तीपासून चिकित्सक आत्मीयतेपर्यंत सर्व टप्पे ओलांडून झाले असताना हा प्रकल्प माझ्याकडे आला. प्रकल्पप्रमुख (आता दिवंगत) डॉ. स. ह. देशपांडे सर्वार्थाने बुजुर्ग होते. त्यांना एक होतकरू पण निष्ठावंत साहाय्यक हवा होता. त्यांना माझं नाव सुचावं, पुलंनी माझ्या नावाला मान्यता द्यावी, हा माझ्या आयुष्यातला भाग्ययोगच म्हटला पाहिजे. कारण पुलंचा अभ्यास करायला, कोणत्याही प्रकाराने त्यांच्याशी जोडलं जायला कित्येक साहित्यप्रेमी, गुणी माणसं एका पायावर तयार झाली असती. अदृष्टाने मला निवडलं आणि मी तब्बल अडीच र्वष माझ्या सर्व शक्तीनिशी कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. सतत पुलं वाचणं, पुलंसंबंधी वाचणं, संबंधितांना भेटणं, पुलंचे चित्रपट-नाटकं- एकपात्री प्रयोग यांतलं जे जे मिळेल ते बघणं, त्या त्या माध्यमतज्ज्ञांच्या मुलाखती घेणं, त्यानिमित्त प्रवास करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिळालेली माहिती पुलंशी प्रत्यक्ष ताडून घेणं हे एक भलं मोठं चक्र झालं. आता विचार केला तरी दमायला होतं. पण त्या वयात ते होऊन गेलं. म्हणजे सुनीताबाईंच्या संग्रहात असलेली, पुलंना वेळोवेळी आलेली सुमारे १०,००० पत्रं वाचणं असो किंवा १९५० च्या आसपासच्या मराठी चित्रपटसृष्टीचा, त्यातल्या पुलंच्या कामगिरीचा वेध घेण्यासाठी कोल्हापूरला जाऊन तेव्हाच्या कलाकार – तंत्रज्ञांना भेटणं, बोलणं असो. प्रत्यक्ष पुलंबरोबर १५-१६ दीर्घ गाठीभेटी / मुलाखती झाल्या. त्यात या माहितीच्या आधारे त्यांच्या स्मरणातला तो काळ जागवण्याचा प्रयत्न असे. एका अर्थाने महाराष्ट्राचा सुमारे १९४० ते १९८० पर्यंतचा सांस्कृतिक इतिहासच तुकडय़ातुकडय़ाने ऐकायला मिळे.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Nagpur, boy died, electric shock,
नागपूर : विजेच्या धक्क्याने नऊ वर्षांचा मुलगा ठार

त्या काळात पुलंची प्रकृती बरी नसे. त्यांच्या आणि स. हं. च्या तुलनेत मी बरीचशी ‘कच्चं मडकं’ ठरे. तरीही प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्ती-घटना-प्रसंग मला काही ना काही शिकवून जात. वरकरणी देखण्या वाटणाऱ्या आपल्या कलाविश्वामधलं कुरूप, दचकवणारं वास्तवही अनेकदा समोर येई. नामवंतांचे मातीचे पाय आणि सामान्य कलाप्रेमींच्या डोंगराएवढय़ा निष्ठा हे दोन्ही आलटून पालटून दिसे. लोकप्रियता हे प्रकरण किती लोभस-जाचक-निसरडं- शेफारवणारं – एकाच वेळी काहींमध्ये प्रेम आणि काहींमध्ये मत्सर जागवणारं असू शकतं याचा तो साक्षात्कार मला अंतर्बाह्य़ भिडून, बदलवून गेला.

माझ्या माहितीप्रमाणे मराठीसह अन्य कोणाही भारतीय भाषेतल्या एवढय़ा ‘मोठय़ा’ कलाकारावर त्याच्या हयातीत, त्याच्या साक्षीने असा चिकित्सक ग्रंथ झालेला नाही. एवढा काळ एवढं काम करूनही मी चुकूनही स्वत:ला पुलंच्या घनिष्ठ स्नेहातलं, हक्काने ‘भाई’ म्हणण्यातलं मानलं नाही. नंतर आपण त्यांच्या खिजगणतीतही नसू शकतो हेही सहज स्वीकारलं. तेव्हा थोरांशी जवळीक, व्यावसायिक यश किंवा या कामाचं मला मिळालेलं श्रेय याची फार फिकीर मी केली नाही. वर्षांनुर्वष लेखन व्यवसायात घालवल्यामुळे, पुस्तकाची गुणवत्ता आणि व्यावहारिक यश याचा एकास एक संबंध नसतो, जे ते पुस्तक आपापलं नशीब घेऊन येतं. हे तर मला कळू शकतंच ना? पण आपल्या हातून काही तरी श्रेयस्कर काम घडल्याची भावना नेहमी खोल मनात राहिली.

तशी १९७६-७७ पासून अधूनमधून लिहीत होते. छापून आलं, एखाद्याला आवडलं, छोटं-मोठं बक्षीस मिळालं की खूश होत होते. पण पहिली सात-आठ र्वष त्या लेखनाला एक ठाशीव चेहरा नव्हता. १९८३ मध्ये ‘स्त्री’ मासिकात ‘झुळूक’ नावाचं मिस्कील सदर सुरू केल्यावर चेहरा आला. साध्या- छोटय़ा घरगुती गोष्टींवर तिरपा कटाक्ष टाकणं मलाही आवडायला लागलं आणि वाचकांनाही. पाच-सहा महिन्यांत सदराची घडी बसली, पठडी तयार झाली तेव्हा वाटायला लागलं हे जमतंय, सोपं जातंय म्हणून पुन:पुन्हा हेच करायचंय का आपल्याला? आतापासून ‘कम्फर्ट झोन’मध्ये पडून कसाला लावणं टाळत राहायचंय का?

बायकांच्या बाबतीतलं ‘कम्फर्ट झोन’चं आकर्षण मी कळायला लागल्यापासून बघत होते. वेगवेगळ्या कौटुंबिक कारणांमुळे मी आयुष्यात फार काळ बायकांच्या जगात जगले आहे. बायकांची सुखं-दु:खं- परस्परसंबंध- अपेक्षा- गरजा- त्यांच्या अभिव्यक्तीसाठी यांनी वापरलेली भाषा माझ्या परिचयाची आहे. बहुतेक बायकांचं शक्य तेवढं भाबडय़ा-भावुक कम्फर्ट झोनमध्ये राहणं आणि तर्काच्या-शास्त्राच्या कसोटीला उतरायचं टाळणं मला अनेकदा खटकत आलेलं आहे. बायकांच्या आयुष्यातला महत्त्वाच्या प्रश्नांवर  संबंधित शास्त्राच्या-विज्ञानाच्या मदतीने शुद्ध तार्किक प्रकाश टाकत राहायला हवा ही माझी खूप जुनी धारणा होती.

या दृष्टीने माझ्या खेळकर लेखनासोबतच ‘वयात येताना’, ‘दत्तक घेण्यापूर्वी’, ‘काय तुझ्या मनात’, ‘वार्धक्यविचार’ वगैरे पुस्तकं परिश्रमपूर्वक लिहिली. दरवेळेला गरजेप्रमाणे एक-दीड वर्ष अभ्यास करून, तज्ज्ञांशी बोलून, वैद्यकशास्त्र- मानसशास्त्र- समाजशास्त्र यांची आंतर-विद्याशाखीय (इंटरडिसिप्लिनरी) सांगड घालून मी ही पुस्तकं लिहीत गेले. ललित लेखकाने अशा लेखनावर वेळ- शक्ती खर्चू नये असं काहींचं मत याबाबत ऐकलं. पण जोवर मनातलं, मनापासून लिहिलं जातंय, अपेक्षित त्या वाचकांपर्यंत पोचतंय तोवर कोणाची काही हरकत नसावी असं मी मानते शिवाय अशा अभ्यासातून आयुष्याची समज वाढते. जी ललितलेखकाला उपयोगी पडते. माझी उपरोल्लेखित पुस्तकं चांगली वाचली जात असतानाच मला खूपदा जाणवे की याच धर्तीवर सरासरी बायकांची कायद्याची साक्षरता वाढेल, असं एखादं पुस्तक आपण सुबोध मराठीत लिहायला हवं. पण हे काम हातून होत नव्हतं. शेवटी कायदे हे जनमानसाच्या घुसळणीतून तयार होत असतात म्हणून कायद्यांचा प्रवास हा समाजाच्या प्रगतीशी कसा समांतर असतो हे दाखवणारं ते मनातलं पुस्तक अलीकडेच हातावेगळं झालं.

‘सती ते सरोगसी : भारतातील महिला कायद्याची वाटचाल’ नामक हे पुस्तक लिहिताना एका तरुण वकील मैत्रिणीची खूप मदत घेतली. वाचलं. चर्चा केल्या. लवकरच ‘राजहंस’ प्रकाशनतर्फे हे पुस्तक वाचकांसमोर येईल, काहींच्या विचाराला चालना देईल, काहींना थेट उपयोगी पडेल तेव्हा, पुन्हा एकदा, एक श्रेयस्कर काम केल्याचा आनंद मला मिळेल.

रस्ता लांबचा असला की चुकामुकी, गल्लत  होण्याचा धोका जास्त वाढतोच. तशाच माझ्याही बऱ्याच गल्लती झालेल्या आहेत. अपेक्षित कामाला अपेक्षित यश न मिळणं, काही प्रकल्प अध्र्यात सोडावे लागणं, फसवणूक-विश्वासघाताचे अनुभव येणं. या सगळय़ात मोठी चुकामूक झाली ती बालसाहित्याशी. भवतालचं चांगलं निरीक्षण आणि सहजसंवादी शैली यामुळे मला ते बरं जमत होतं.माझी मुलं प्राथमिक-माध्यमिक शाळा शिक्षणाच्या टप्प्यावर असताना त्यांच्या शालेय उपक्रमांसाठी मी छोटी, प्रयोगक्षम नाटुकली लिहिली. तो सगळा हौशी मामलाच होता. वाङ्मयीन गुणवत्ता वगैरेंचा दावा नव्हता. पण १९८३-८४ ते सुमारे १९८७ -८८ मध्ये मी लिहिलेली ही नाटुकली माझ्या मुलांच्या शाळेत करून झाली की इतर शाळाही ती उचलत. अशा सात-आठ बाल नाटकांचं पुस्तक करायला एक होतकरू प्रकाशक माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आले. त्या काळात आपलं हे पुस्तक येणंच मला कौतुकाचं वाटलं. मी घाईगडबडीत त्यांना शब्द दिला. सगळी हस्तलिखितं दाखवली. त्यांनी त्याहून घाईत ती उचलली. मी झेरॉक्स करून देणार होते. पण तेवढाही अवधी दिला नाही. ‘‘तुम्ही कशाला काळजी करता? मी स्वत: झेरॉक्स करून आणून देतो’’ वगैरे समजावलं. पुढे ते सद्गृहस्थ त्या फाईलसह बेपत्ता झाले. त्या दिवसात आजच्यासारखी संपर्कसाधनं नव्हती. माझ्या हाताशी कोणी मदतीला नव्हतं. मी यथाशक्ती शोध घेतला. काही हाती लागलं नाही. ती सर्व नाटुकली काळाच्या पोटात गडप झाली. त्यातून मला फार काही मिळणार होतं अशातला भाग नाही. पण मन विटलं ते विटलंच. त्या वेळी मनात असलेल्या काही बालकथांचा पुढे एक संग्रह निघाला, एक किशोरकादंबरी मी लिहिली. त्या दोन्ही प्रयत्नांना महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कारही मिळाले. पण त्यांच्या आनंदापेक्षा अगोदरच्या अनुभवाची विषण्णता कदाचित प्रबळ ठरली असावी. माझ्या हातून बालसाहित्यामध्ये काही ठळक कामगिरी झाली नाही हेच खरं.

बाकी श्रेयस / प्रेयस असे मोठमोठे शब्द वापरावेत एवढं माझं जगणंही मौलिक नाही आणि लेखनही मौलिक नाही. खोल आत्मिक समाधान आणि तात्पुरतं व्यावहारिक सुखावणं इथवरच माझ्यासारखीची मजल जाऊ शकते. एवढी र्वष एवढा कागद झिजवूनही आजही कोणी आपलं लेखन वाखाणलं तर जीव सुखावतोच. नाकारण्यात अर्थ नाही. स्तुती-कौतुक-प्रशंसा यांचा मोह सुटत नाही. पण ती करणारी व्यक्ती कोण आहे, गुणवत्तेच्या कोणत्या पायरीवर आहे, कोणत्या हेतूने करते आहे हे बघण्यातली सावधता अनुभवातून आलेली आहे. एक नक्की आपण आपल्या अटींवर आपलं लेखन करू शकलो, आपल्या बाजूने चांगल्यात चांगला प्रयत्न केला, आपल्याला मनापासून वाटलं तेच मांडलं, त्यामुळे आपण पुरोगामी-प्रतिगामी- अमुकवादी- तमुकपंथीय ठरू की नाही याचा हिशेब केला नाही, थोडक्यात म्हणजे पुढय़ात घेतलेल्या कोऱ्या कागदाशी आपण प्रामाणिक राहिलो ‘एवढं यश तुला रगड’ असं मी खात्रीने म्हणून शकते.

एरवी ‘संसार सांभाळून एवढं २२२ ’वगैरे करण्याबाबत कोणी आपल्याला वाखाणावं असं मला अजिबात वाटत नाही. माणसासारखं जगायचं असेल तर काही ना काही सांभाळणं भागच आहे. शिवाय लग्न-घरसंसार-मुलं हे आपण आपल्या स्वत:शी केलेले करार आहेत या दृष्टीने मी त्यांच्याकडे बघते. करार करताना आपली घाई गडबड झाली असेल, अटी नीट ठरवता आल्या नसतील, गांभीर्य जाणवलं नसेल तर तो आपला ‘प्रॉब्लेम’ आहे. पण एकदा करार करून बसलो की तो पाळण्याची किंमत मोजावी लागणार, मोडण्याचीही लागणार. यातली निवडही आपणच करणार. मग त्याबद्दल सारख्या सवलती किंवा दाद मिळण्याची अपेक्षा कशाला? मी तरी ती चुकूनही केलेली नाही.

मात्र एक व्यक्तिगत आणि एक लेखकीय संसार समांतरपणे ओढताना बऱ्याच आवडीच्या गोष्टी सोडून द्याव्या लागल्या. भुलवणाऱ्या रंगांच्या दोरांना कात्री लावावी लागली. गाण्याकडे पहिल्यापासून कल होता. त्यात चांगलं कानसेन होण्याएवढंही लक्ष देता आलं नाही. बागकाम करणं, आपण लावलेल्या रोपाच्या कळ्या बघता बघता आपणच उमलून येणं हे स्वर्गसुखाचं वाटतं. त्याकडे पूर्ण पाठ फिरवावी लागली. आयुष्यात एकदा एखादा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ‘स्टार्ट टू फिनिश’ अनुभवायचा आहे. अद्याप जमलेलं नाही. जयपूर लिटफेस्टबद्दल इतकं वाचतो, ऐकतो पण ते दुष्प्राप्य राहिलंय. खरं तर प्रत्यक्ष अडवायलाही कोणी नाहीये. पण गोष्टी मागे पडत गेल्या त्या गेल्याच. इतके सुटलेले किंवा सोडावे लागलेले धागे प्रयत्नपूर्वक पकडायला लागणारा वेळ, शक्ती, उमेद यापुढे मिळेल की नाही, सांगता येत नाही.

मी ओंजळ माझी रितीच घेऊन आलो

जातांना ओंजळ रितीच सोडून गेलो

ओंजळीत आल्यागेल्या श्रेयावरती

एक पुसट कोवळे नाव कोरुनी गेलो

या सुधीर मोघे यांच्या ओळी मला फार आवडतात. त्यातला मुद्दा नवा नाही पण छान मांडलाय असं वाटतं.

या ओळी अवचित कधी कानावर आल्या, आठवल्या की मनात येतं, हात्तिच्या.. म्हणजे इतका सगळा खटाटोप फार फार तर पुसट कोवळं नाव मागे ठेवण्यापुरताच असतो होय? मग कोणत्याही अर्थाने आपण एवढं लावून वगैरे का घ्यावं..?

निमूटपणे मी आणखी एक कोरा कागद पुढय़ात घेते.. सकाळी उठता उठता एक मजेशीर कल्पना मनात आलेली असते.. तिला जागा करून देण्यासाठी..

– मंगला गोडबोले

mangalagodbole@gmail.com