खिलापत चळवळ (१९२०) :
जगभरचे मुस्लिम लोक तुर्कस्थानच्या खलिफाला आपला धर्मगुरू मानीत असत. भारतीय मुस्लिम जनतेची निष्ठा तुर्कस्थानच्या खलिफासोबत निगडित होती. तुर्कस्थानच्या खलिफाने पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनीच्या बाजूने युद्धात प्रवेश केला. युद्धाच्या समाप्तीनंतर तुर्कस्थानच्या खलिफाच्या सत्तेला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे आश्वासन ब्रिटिश शासनाने भारतातील मुस्लिम नेत्यांना दिले होते. या आश्वासनास प्रमाण मानून भारतीय मुस्लिमांनी ब्रिटिशांना युद्धात मदत केली होती. युद्धसमाप्तीनंतर ब्रिटिश शासन तुर्कस्थानची सत्ता नष्ट करून खलिफाची गादी नष्ट करणार अशी बातमी सर्वत्र पसरली होती. तेव्हा भारतीय मुस्लिम नेत्यांनी तुर्कस्थानच्या खलिफाची सत्ता टिकविण्याकरता व धर्मक्षेत्राचे रक्षण करण्याकरता ब्रिटिश शासनाविरुद्ध चळवळ करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ ‘खिलापत चळवळ’ म्हणून ओळखली जाते. खिलाफतचा प्रश्न सोडविण्याकरता राष्ट्रीय काँग्रेसमधील महात्मा गांधी, लोकमान्य टिळक,
डॉ. राजेंद्रप्रसाद इत्यादी नेत्यांनी या चळवळीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

असहकार चळवळ (१९२०) :
रौलेट कायदे, जालियनवाला बागेतील हत्याकांड, खिलाफत चळवळ, देशात सर्वत्र सरकारने चालवलेले दडपशाहीचे सत्र या कारणांमुळे भारतीय जनतेत संतापाची लाट निर्माण झाली होती. देशातील वातावरण पूर्णपणे सरकारच्या विरोधात गेले होते. देशभरातील जनतेच्या या भावना लक्षात घेऊन महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. १० मार्च १९२० रोजी त्यांनी असहकाराचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ४ सप्टेंबर १९२० रोजी कलकत्ता येथे लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे विशेष अधिवेशन भरविण्यात आले होते. या अधिवेशनात असहकाराच्या कार्यक्रमाला मान्यता देण्यासंबंधीचा ठराव प्रचंड बहुमताने संमत करण्यात आला. या कार्यक्रमात पुढील गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला होता-
सरकारने दिलेल्या सन्मानदर्शक पदव्या व मानसन्मान यांचा त्याग करणे. सरकारी शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांवर बहिष्कार टाकणे. मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करणे.
सरकारी कचेऱ्या व न्यायालये यावर बहिष्कार
टाकणे. परकीय मालावर बहिष्कार टाकणे.
सरकारी समारंभ व कार्यक्रम यांत सहभागी न होणे. सुधारणा कायद्यातंर्गत घेण्यात येणाऱ्या प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

चौरीचौरा दुर्घटना ( उत्तरप्रदेश : ५ फेब्रु. १९२२) :
५ फेब्रु. १९२२ रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यत चौरीचौरा गावात जमावाने पोलीस चौकी जाळली. त्यात २२ पोलीस ठार झाले. या बातमीने गांधीजी व्यथित झाले आणि चळवळ हिंसक बनत चालली म्हणून असहकार चळवळ स्थगित केल्याचे १२ फेब्रु. १९२२ रोजी जाहीर केले. १० मार्च १९२२ ला गांधींना अटक होऊन त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली.

झेंडा सत्याग्रह (नागपूर, १९२३) :
असहकाराच्या चळवळीत काही ठिकाणी झेंडा सत्याग्रह केला गेला. राष्ट्रीय सभेचा तिरंगा ध्वज जाहीरपणे फडकावणे असे या सत्याग्रहाचे स्वरूप होते. नागपूर या ठिकाणी
झेंडा सत्याग्रहात महिला मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. सर्व सत्याग्रहींना अटक करण्यात आली. यापासून
स्फूर्ती घेऊन अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकावणे व ध्वजासह प्रभात फेऱ्या काढणे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले.