यर्मा ही सुप्रसिद्ध स्पॅनिश नाटककार, कवी आणि नाटय़दिग्दर्शक फेडेरिको गार्सिया लोर्का (१८९८-१९३६) यांच्या ‘यर्मा’ या शोकात्मिकेची नायिका आहे. हे नाटक म्हणजे एक शोकात्म काव्य आहे. यर्मा, तिचा नवरा युआन, मारिया ही शेजारीण मत्रीण आणि व्हिक्टर हा यर्मा-युआनचा स्नेही ही त्यातली महत्त्वाची पात्रे. यर्माच्या लग्नाला, अगदी ती सांगते त्या शब्दांत नेमके सांगायचे तर, दोन वष्रे वीस दिवस उलटून गेले आहेत, पण अजून तिची कूस फळलेली नाही. युआन शेतकरी आहे. रोज शेतात जावे, राबावे, कमवावे हा त्याचा खाक्या. बायको मुलासाठी झुरते आहे याची त्याला फारशी फिकीर नाही.

नाटक सुरू होते तेव्हाही तो बल घेऊन शेताकडे निघाला आहे. विणकाम केलेली गोधडी पांघरून यर्मा झोपलेली असते. जणू स्वप्नात बघावे असे दृश्य रंगभूमीवर प्रथम दिसते. यर्माकडे बघत एक तरुण हलकेच प्रवेश करतो. त्याने जरीच्या नव्या कपडय़ातल्या एका लहान मुलाला हाताने धरले आहे. दूर कुठे तरी घंटा वाजते आणि हे दृश्य पालटते. यर्मा जागी होते. नवरा शेतावर निघालाय हे पाहून त्याची विचारपूस करते. त्याने दूध प्यावे, धष्टपुष्ट असावे, नदीवर जावे, पाण्यात डुंबावे, पाऊस कोसळत असताना छतावर जावे.. ती बोलत राहते, मला तुमची काळजीच घेऊ देत नाही तुम्ही.. यर्मा लाडिक तक्रार करते. नवरा थंडपणे म्हणतो, ‘‘त्यात काय, वष्रे जातील तसे वय वाढणारच आहे. आपले कामही नीट सुरू आहे. मुलेबाळे नाहीतच काळजी करायला.’’ यर्मा खेदाने म्हणजे, ‘‘होय, मुले नाहीतच..’’

ती तरुण आहे, रसरशीत आहे. लग्न झाले तेव्हा आईला सोडून जाताना रडली नाही की नवऱ्याच्या बिछान्यात शिरताना इतर मुलींसारखी भ्यायली नाही. तिला मूल हवे आहे. एकच नाही, चांगली दोनचार, रडणारी, ओरडा करणारी. नवरा कामाला निघताना म्हणतो, ‘‘आपण जरा वाट पाहिली पाहिजे.’’ आणि पुढे म्हणतो, ‘‘बाहेर जाऊ नकोस कुठे.’’ यर्मा ऐकून घेते. जरा वेळाने आपला शिवणकामाचा उद्योग सुरू करते. मनातल्या मनात ती (पोटात नसलेल्या) बाळाशी बोलते आहे, अंगाई गाते आहे. त्या गाण्यातून तिची आस व्यक्त होते. मला कधी कळा येतील.. आणि तुझं जुईच्या फुलांचा गंध असलेलं अंग माझा देह फाडून बाहेर येईल.. असा मनातल्या मनातला आकांत तिच्या गाण्यातून व्यक्त करते आहे. शेजारच्या मत्रिणीला दिवस गेल्याचे तिला कळते. शेजारीण मारिया हातात बोचके घेऊन येते, म्हणते, ओळख बघू! तिच्या बोचक्यात कपडे आहेत, कपडय़ांना लावण्याच्या लेसेस आहेत, आणि लोकर. नवऱ्याने, चौकशी न करता, तिला कपडे आणायला पसे दिले होते. यर्मा मोठय़ा कौतुकाने तिच्याजवळ जाते. लग्न होऊन पाच महिन्यांतच मारियाला दिवस गेले आहेत. तिला काही वाट बघावी लागली नाही की गाणी म्हणावी लागली नाहीत. उलट या नव्या बदलाने ती भांबावलीच आहे. यर्माच तिला सांगते, जास्त जोरात चालू नकोस, श्वासदेखील जरा हलक्यानेच घे. हो गं, लेकरू पोटात लाथा मारतं, पण तोवर आपला त्याच्यावर जीव जडलेला असतो! यर्माच्या बरोबरीच्यांना मुले झाली आहेत. कुणाला तीन वर्षांनी, कुणाला लवकरच. मला आता हे वाट बघणं सोसवत नाही. रात्रीची उठून बसते. असंच राहिलं तर काही तरी भलतं घडेल माझ्या हातून.. मत्रीण तिला समजावते. अगं, होतो कुणाकुणाला उशीर. माझ्या मावशीला तर चौदा वर्षांनी पोर झालं. इतका छान मुलगा, अन् इतका द्वाड.. यर्माला हे सारं हवं आहे, ते लेकराने स्तनांशी लुचणं, ओरबाडणं, नखांनी ओरखडे काढणं.. या साऱ्या सुखांसाठी ती तळमळते आहे. ती एकदा मारियाच्या मुलासाठी आंगडी, टोपडी, झबली, लंगोट शिवत बसली असताना व्हिक्टर येतो. त्याला वाटते यर्माचीच काही गडबड आहे. तो तिला म्हणतो, ‘‘मुलगी झाली तर तुझंच नाव ठेव तिला..’’ यर्मा सांगते, माझ्यासाठी नाही, मारियाच्या बाळासाठी शिवते आहे. व्हिक्टर म्हणतो, ‘‘हरकत नाही. पण तुम्हीही जरा धडा घ्या की.. नवऱ्याला सांग तुझ्या मनावर घ्यायला. काम राहू दे म्हणावं बाजूला. पसा काय कमवायचाच, तो मिळेलच. पण वारस नको?’’ व्हिक्टरने आपले दोन बल युआनला विकले आहेत.

यर्माच्या मनातली सल वाढत चालली आहे. म्हाताऱ्याकोताऱ्या भेटल्या की आधी पोराबाळांची चौकशी. लग्न होऊन तीन र्वष झाली तरी अजून पोर नाही. होईल म्हणा. मला नऊ झाली पण सारे पोरगेच. एकही मुलगी नाही.. असली बोलणी निघतात. यर्मा आता एकाच विचाराने पछाडली आहे. मूल. मूल. मूल. नवरा केला तोसुद्धा त्याच्यापासून लेकरू मिळावं यासाठीच. दुसऱ्या सुखासाठी नाही. कोणी बाई लेकरू घरी ठेवून नवऱ्यासाठी जेवण घेऊन जाते म्हटल्यावर यर्माचं काळीज तडफडतं. दाराला कडी घातली होतीस ना? पोराला घरी एकटं ठेवून जीव तरी कसा थाऱ्यावर राहतो हिचा? अन् ती तिसरी एक पाहा, नुसती उंडारगी. घर नको. दार नको. चित्त दुसरीकडेच. यर्माचं तसं नाही. एकदा पूर्वी कधी तरी व्हिक्टरच्या स्पर्शानं ती थरथरली होती. पण नको. तिला आता मूल हवं आहे आणि तेही नवऱ्यापासूनच. नवरा आता तिच्यावर फारसा विश्वास ठेवेनासा झाला आहे. कुठं घराबाहेर जात नाही ना, लोक काहीबाही बोलताहेत ते खरं की काय? त्याला रात्रभर खळ्यावर राहावं लागतं, चोराचिलटांपासून पीक सांभाळावं लागतं. आणि ही? त्यांचंही काही चूक नाही. लोक बोलणारच. नदीवर धुणं धुवायला बायका येतात आणि कुचाळक्या करतातच ना! यर्माला पोर नाही म्हणून तिच्याबद्दल टवाळकी सुरू होते. कोणी तिला दोष देतं, कोणी तिच्या नवऱ्याची निंदा करतं. आता तर नवऱ्यानं यर्मावर नजर ठेवण्यासाठी घरात स्वत:च्या दोन बहिणी आणून ठेवल्या आहेत. ती घरात नसली की नवरा त्यांच्याकडे चौकशा करू लागतो. गुराढोरासारखीच बायको. दावं सुटलं की बाहेर पळणार. तो संशयानं पछाडला आहे. आणि यर्मा संसारातल्या सुनेपणानं, अपत्यहीनतेनं सरभर. घर तिला कोंडवाडय़ासारखं वाटतं आहे. मिटल्या ओठांनी ती आपलं दु:ख सहन करते आहे. पाच र्वष उलटून गेली आहेत, पण नवऱ्याला तिचं दुख कळत नाही. तेही बरोबरच आहे. त्याच्याभोवती त्याचं शेत, गुरंढोरं, झाडंपाखरं आहेत, इतरांबरोबर बोलणं-चालणं आहे. यर्माला एकटेपण खायला उठतं आहे. पण तिला दुसऱ्या कुणाचं पोरही नको आहे. मारियाच्या बाळाचे डोळे कसे अगदी तिच्यासारखेच आहेत. तिलाही तिच्यासारखं दिसणारं, तिच्या हाडामांसाचं लेकरू हवं आहे. आणि तेही ताठ मानेनं. नवरा स्वत:ची बदनामी होऊ नये म्हणून तिच्यावर पहारा ठेवतोच, पण तिलाही स्वत:चा सन्मान ठेवायचा आहे. दुसऱ्या पुरुषाकडे जायचं नाही.

या कोंडीतून वाट कशी काढायची ते यर्माला सुचत नाही. तिचा विवेक डळमळू लागतो. व्हिक्टरबद्दलचं आकर्षण तिच्या मनात घोंगावू लागतं. पण तो गाव सोडून निघाला आहे. तो जाण्याआधी तिला भेटायला येतो तेव्हा त्याला निरोप देणं तिला कठीण जातं. त्यानं आपली मेंढरं विकून टाकली आहेत. आता शेळ्या-मेंढय़ा ठेवायला यर्माच्या घरातदेखील जागा नाही. पण हे सारं वरवरचं वैभव. यर्माला त्यात रस नाही.

अशा मन:स्थितीत यर्मा भरकटते. जादूटोणा करणाऱ्या बाईकडे वळते. लेकरू देण्याचा उपाय करण्याची ती खात्री देते. त्यांच्याबरोबर ती न भिता स्मशानातदेखील जाते. आपल्या स्तनातलं दूध पिणारं बाळ, त्याचं दुधानं माखलेलं तोंड तिच्या डोळ्यांसमोर दिसू लागतं. मला या भुतानं झपाटलंय असं तिला वाटतं. पण दैवावर मात करण्याची धडपड तिला करायची आहे. अपत्यहीनतेच्या, वांझपणाच्या या शापातून सुटायचं आहे..

– प्रभा गणोरकर

prganorkar45@gmail.com