मुकुंद संगोराम

गवय्यांची अनेक घराणी ज्या भूमीत बहरली, ज्या भूमीतून भारतीय स्वरलेखनाची आणि पुढे शास्त्रोक्त संगीताच्या आधुनिक शिक्षणाची कल्पना पुढे आली, जिथल्या रसिकांवर राज्य करण्यासाठी पिढ्या-पिढ्यांनी सुरेल स्पर्धा केली… त्या महाराष्ट्राच्या रांगडेपणाला संगीतपरंपरेने बकूळफुलांचा दळदारी साज दिला यात नवल नाही!

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

भारतीय संगीताच्या अवकाशात महाराष्ट्राने वेगळे स्थान निर्माण केले, असे सगळेच कलावंत जाहीरपणेही मान्य करतात. ते खरे अशासाठी, की येथील रसिकांची दाद कुणाच्याही वाट्याला सहजपणे येत नाही. येथील श्रोते कोणत्याही कलावंताला डोक्यावर घेत नाहीत. उत्तरेकडील मैफिलीत जसे ‘वाहवा!’, ‘क्या बात है!’, ‘बहोत खूब’ यांसारख्या दाद देणाऱ्या शब्दांची अक्षरश: खैरात होते, तसे महाराष्ट्रात घडत नाही. येथे कोणत्याही कलावंताला रसिकांच्या रसिकतेच्या कठोर कसोटीला उतरावे लागते. त्यामुळे सहसा कोणत्याही कलावंताला या प्रांतात येऊन येथील रसिकांकडून आपली कला पारखून घ्यावी, असे वाटत असते.

महाराष्ट्राला अनेक शतके आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच लढावे लागले. ही लढाई किमान नऊशे वर्षांची म्हणजे तेराव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतची. या सगळ्या राजकीय अवस्थेच्या अस्वस्थ काळातच या भागात वैचारिक परंपरांचाही पाया रचला गेला. ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले’, असे म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचे तेराव्या शतकातील विश्व केवळ आळंदीपुरते मर्यादित नव्हते आणि संत तुकाराम महाराजांचे जीवनाकडे पाहणेही काळाच्या कितीतरी पुढचे होते. सगळ्याच संतांनी परस्परविरोधी विचारधारांनांही खतपाणी घातले. अगदी देवालाही ठणकावून प्रश्न विचारण्याचे धैर्य संतांच्या ठायी होते. त्यामुळे परस्परविरोधी मतांनाही आदरपूर्वक स्वीकारण्याची रीत येथील सांस्कृतिक वातावरणात मान्य झाली. संगीतापुरते बोलायचे, तर ‘चिकित्सकपणे संगीताचा आस्वाद घेणारे रसिक’ असे येथील श्रोत्यांचे वर्णन सगळेच कलावंत करत असतात. महाराष्ट्राचे हे वेगळपण इतरांना जाणवते; मात्र येथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या जगण्याचा, विचार करण्याचा तो स्थायिभाव असल्याने ते जगण्याच्या सर्वच क्षेत्रात ठळकपणे दिसते. संगीतही त्याला अपवाद नाही.

नव्या विचारांचे स्वागत करणाऱ्या महाराष्ट्रात ग्वाल्हेर, किराणा, जयपूर, भेंडीबजार, आग्रा अशा अनेक घराण्यांमधील कलावंतांच्या नवोन्मेषी प्रतिभेला येथील रसिकांनी मनापासून दाद दिली. त्यामुळे घराण्यांच्या पोलादी भिंती ओलांडून जाऊन नवे प्रयोग करण्याचा हुरूप कलावंतांमध्ये आला. एकाच घराण्याच्या शैलीचे अध्ययन केल्यानंतर इतर शैलींमधील काही चांगले ‘अलंकार’ही आपल्या शैलीत मिसळण्याची सर्जनशीलता या कलावंतांमध्ये निर्माण होण्यास आजूबाजूचे हे वातावरण कारणीभूत ठरले असेल, असे म्हणता येईल. त्यामुळे उत्तरेकडून आलेल्या छज्जू खाँ, नजीर खाँ यांच्या कलाविष्कारातून निर्माण झालेल्या भेंडीबजार घराण्याला त्यावेळच्या मुंबईकरांनी मन:पूर्वक दाद दिली. नावे ‘किराणा’ (कैराना) किंवा ‘जयपूर’ किंवा ‘दिल्ली’, ‘इंदौर’, ‘मेवाती’; परंतु या सगळ्या शैलींमधील सौंदर्याला महाराष्ट्राने नावाजले. कोणत्याही कलावंताला येथील रसिकांसमोर कला सादर करताना भीती वाटावी, असे वातावरण तेव्हा होते. त्यामुळे या रसिकांवरही मोहिनी घालण्यासाठी सगळेच कलावंत जिवापाड मेहनत करत आणि सौंदर्याच्या नवनव्या खुणांचा शोध घेत. संगीताला पोषक वातावरण निर्माण होत असतानाच, स्वातंत्र्याच्या आधीच्या दशकापासून ते आजपर्यंत संगीताच्या अभ्यासाकडेही महाराष्ट्राने जाणीवपूर्वक लक्ष दिले. संगीत विचार, अभ्यास आणि त्याच्या नोंदी याबाबत महाराष्ट्रातील संगीत अभ्यासकांनी खूप मोलाची भर घातली.

विष्णू नारायण भातखंडे, प्रो. बी. आर. देवधर यांच्यासारखे अभ्यासक कलावंत या चळवळीत स्वातंत्र्यापूर्वीपासूनच पुढे होते. महाराष्ट्रात संगीताला अनुकूल वातावरण निर्माण होऊ लागल्याने अनेक मोठे कलावंत या भागात येऊन वास्तव्य करू लागले. किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीमखाँ, जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाखाँ यांच्यासारख्या दिग्गजांनी महाराष्ट्रात हे वातावरण निर्माण करण्यास सुरुवात केली. संगीत ऐकण्यासाठी धनिकांनी हात सैल केल्यामुळे जगण्याची भ्रांत काही प्रमाणात तरी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली, ती याच महाराष्ट्रात. संगीत ऐकणारे, दाद देणारे आणि त्यासाठी खिसा सैल करणारे श्रोते आणि व्यवसाय म्हणून संगीताला स्थिरता प्राप्त करून देणारे केंद्र म्हणून या राज्याची ही ओळख स्वातंत्र्योत्तर काळात गडद होत गेली, यात शंकाच नाही. चित्रपट संगीत हे व्यावसायिक असले, तरी त्यामध्ये अभिजाततेला खूपच वाव असतो. मुंबई ही चित्रपटांचीही राजधानी होऊ लागल्यावर अनेक कलावंतांना या शहराचे आकर्षण वाटू लागले. विशेषत: वादकांना. आजचे बिनीचे कलावंत असलेले पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया, उस्ताद अल्लारखाँ, पंडित रविशंकर, उस्ताद विलायतखाँ यांच्यासारख्या कितीतरी कलावंतांना मुंबईने अस्तित्व मिळवून दिले. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. जेव्हा देशाच्या इतर राज्यांमधील कलाविश्व स्वातंत्र्यानंतरच्या काळात चाचपडत होते, तेव्हा महाराष्ट्राने आपले स्थान भक्कम करून ठेवले होते. केसरबाई केरकर, अंजनीबाई मालपेकर, मोगूबाई कुर्र्डीकर, डी. व्ही. पलुस्कर यांच्यासारख्यांच्या निवासाने हे राज्य संगीताच्या बाबतीत तरी बऱ्यापैकी समाधानी राहिले. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, फिरोज दस्तूर, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या स्वातंत्र्योत्तर काळातील कलावंतांनी हे समाधान आणखी समृद्ध केले. या राज्यात जागोजागी स्थापन झालेल्या ‘म्युझिक सर्कल’ या चळवळीचा आणि विविध ठिकाणी होणाऱ्या संगीत महोत्सवांचा यातील सहभाग महत्त्वाचा.

विष्णू दिगंबरांचे पट्टशिष्य प्रो. बी. आर. देवधर (१९०१-१९९०) यांनी १९२५मध्येच मुंबईत ‘इंडियन स्कूल ऑफ म्युझिक’ स्थापन केले. हार्मनी आणि मेलडी या समांतर संगीत व्यवस्थेचा अभ्यास करण्याची आवश्यकता विष्णू दिगंबरांना वाटली आणि त्यांनी पाश्चात्त्य संगीताचे अभ्यासक प्रा. जिओव्हानी स्क्रिंझी यांच्याकडे त्यांचे सुशिक्षित शिष्य देवधर यांना पाठवले. संगीताचा अभ्यास करण्याबाबतची, या घटनेनंतर एकूणच संगीताकडे अभ्यासकाच्या नजरेतून पाहण्याची महाराष्ट्राला सवय लागली. पाश्चात्त्यांची स्वरलेखन पद्धत न स्वीकारता स्वतंत्र पद्धत विकसित करणारे संगीत अभ्यासक विष्णू नारायण भातखंडे हे याच राज्यातले. त्यांनी देशभर हिंडून अनेक गायक कलावंतांकडून अभिजात संगीतातील बंदिशी मिळवल्या आणि त्यातील अठराशे बंदिशींचे स्वरलेखनही केले.

व्यक्तींमधील हेकेखोरपणा हेही खास मराठी वैशिष्ट्य. शत्रुत्वाच्या भावनेने नव्हे, परंतु अभ्यासातील वादविवादामुळे या लेखन पद्धतीबाबत विष्णू दिगंबर आणि भातखंडे यांच्यात वाद उत्पन्न झाले. आणि त्यांनी आपापल्या स्वतंत्र वाटा निर्माण केल्या. पलुस्करांनी स्वत: विकसित केलेली स्वरलेखन पद्धती त्यांच्या गांधर्व महाविद्यालयात स्वीकारण्यात आली. प्रा. देवधर यांनी लिहून ठेवले आहे, की या दोघांनी एकत्र येऊन संगीताच्या प्रसाराचे आणि संशोधनाचे काम करायचे ठरवले आणि ही योजना प्रत्यक्ष आणण्याच्या बाबतीत या दोघा महापुरुषांचा मतभेद झाला. दोघेही समकालीन, संगीताच्या एकाच क्षेत्रात राहून परस्परपूरक काम करीत राहूनही एकमेकांचा हात हातात न धरणारे. हे असे या तर्कालाच प्राधान्य देणाऱ्या महाराष्ट्रात घडू शकते.

प्रा. बी. आर. देवधरांनी घराणेदार शिक्षण घेतले असले, तरीही त्यांनी त्यांच्या संगीत विद्यालयात मात्र ‘लोकशाही’ची स्थापना केली. पं. कुमार गंधर्व, बाबूराव रेळे, पंढरीनाथ कोल्हापुरे हे त्यांचे शिष्य. आपल्या नावामागे ‘प्राध्यापक’ हे नामाभिधान जोडणे हा ब्रिटिशांचा संस्कार. युरोपीय देशांमध्ये नव्याने विकसित होऊ लागलेल्या आवाज साधना शास्त्र (व्हॉइस कल्चर) या विद्याशाखेतील त्यांचे संशोधन. यासाठी त्यांनी न्यूयॉर्क येथे काही वर्षे प्रा. एंजल्स यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. त्याचा प्रयोग आपल्याच विद्यालयातील विद्यार्थ्यांवर केला. याच विषयात पुढे जाऊन आणखी संशोधन करणाऱ्या डॉ. अशोक दामोदर रानडे यांनीही केलेली कामगिरी अतुलनीय म्हणावी अशी. एकाच वेळी मैफिली आणि संशोधन या दोन्ही पातळ्यांवर महाराष्ट्रात काम होत राहिले. देवधर मास्तरांनी त्यांच्या विद्यालयात सगळ्या घराण्यांच्या कलावंतांना आग्रहाने पाचारण करून त्यांच्या मैफिली केल्या. संगीत शिकणाऱ्या मुलांवर असे स्वरसंस्कार करण्याने, त्यांना वेगळ्या वाटेने जाण्यास मुभा मिळू शकते, असा त्यामागील विचार. त्याच काळात किराणा घराण्याचे पंडित भीमसेन जोशी त्यांच्या गळ्यावरील किराणा घराण्याचे संस्कार हरवू न देता एका नव्या शैलीच्या जडणघडणीत मश्गूल होते, तर डॉ. वसंतराव देशपांडे अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ कलावंतांकडे तालीम घेत घेत स्वत:चे वेगळे गाणे तयार करण्याची कलात्मक धडपड करत होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर १३ वर्षांनी महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, मात्र तरीही त्या आधीपासूनच येथील संगीताच्या आविष्काराला धुमारे फुटू लागले होते.