08 March 2021

News Flash

‘सखी शेजारिणी, तू हसत रहा..’

के. महावीर यांच्यासारखे असामान्य प्रतिभेचे ‘गुरू’ लाभलेले हे गायक आहेत.

वा. रा. कांत

आद्य भावगीतकारांनी आपल्या कलागुणांवर उभारलेला भावगीताचा ध्वज पुढील काळात दिमाखात फडकत ठेवण्याचे काम काही कलाकारांनी केले. त्यातील गायक कलाकारांमध्ये एक नाव- त्यांनी गायन कारकीर्द सुरू करताक्षणी आपलेसे झाले. पुढे तब्बल सहा दशके तो गाता गळा आपल्याला आनंद देत राहिला. आज वयोपरत्वे त्यांना मैफलीत गाणे शक्य नसले तरी त्यांना भेटलात तर एखादे गाणे थेट भेटते, हे नक्की. जीवन हा सोहळा आहे आणि त्यात चिरंतन आनंदगाणे आहे, हा विश्वास प्रत्येक रसिकाला त्यांच्या भेटीतून मिळाला आहे. संगीतरसिकांनी त्यांच्या गाण्यांवर जिवापाड प्रेम केले. मराठी भावगीतांतला हा रेशमी, मुलायम आवाज जगभरातील रसिकांनी स्वीकारला. मुळात गजलगायक असलेले हे नाव मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय ठरले. गीतातले शब्द आवडले नाहीत तर ते गाणे गायचे नाही, असा मनात भाव असणारे ते गायक आहेत. के. महावीर यांच्यासारखे असामान्य प्रतिभेचे ‘गुरू’ लाभलेले हे गायक आहेत. ‘या जन्मावर.. शतदा प्रेम करावे’ अशा विचारांचा स्वरजागर करणारे हे गायक म्हणजे अरुण दाते.

गायकाचे केवळ नाव घेताक्षणी त्यांनी गायलेली शेकडो भावगीते नजरेसमोर येतात! लगेचच ही भावगीते तुम्ही गुणगुणायलाही सुरुवात केली असेल. इतकेच नाही तर तुम्हाला ही गीते शब्द आणि म्युझिकसह पाठ असतील. मराठी गीत-संगीत कार्यक्रमात अरुण दाते यांनी गायलेल्या कोणत्याही गीताची फर्माईश आली की ती पूर्ण होतेच. गायक, वादक , संगीत संयोजक या सर्वानी मनापासून प्रेम केलेली ही गाणी आहेत. त्यांतील एक लोकप्रिय गीत म्हणजे.. ‘सखी शेजारिणी, तू हसत रहा..’

अरुण दातेंचा जन्म इंदूरचा. आणि जन्मही कोणत्या घरात? तर- रसिकाग्रणी रामूभैया दाते यांचे अरुण दाते हे सुपुत्र! दाद देणे दाते घराण्याकडून शिकावे. अरुण दातेंचे पिताश्री रामूभैया दाते यांच्याबद्दल आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे : ‘फुलांचा सुवास त्यांना वेगवेगळ्या सुरांसारखा भासायचा. मेघांचे विविध रंग म्हणजे रागरागिण्या.. उडत्या फुलपाखरांच्या पंखांची उघडझाप संगीताच्या कोणत्या तालात आहे, हे रामूभैया सांगायचे. झाडांची हलती फांदीदेखील तालबद्धपणे समेवर येते की नाही याकडे रामूभैयांचे लक्ष असे. बेडकांच्या डरांव् डरांव्मध्ये त्यांना खर्जाचा सूर दिसे. आगगाडीच्या कर्णकटू खडखडाटात त्यांना तबल्याचा ठेका ऐकू यायचा.’

तोच सुरेल स्वरभाव गायक अरुण दातेंकडे आला. म्हणून अरुण दातेंच्या गीतांनी आपल्या मनावर अधिराज्य केले. कविवर्य वा. रा. कांत, गायक अरुण दाते व संगीतकार वसंत प्रभू या त्रयीचे लोकप्रिय झालेले ‘सखी शेजारिणी’ हे गीत. या वर्षी या गीताला ५० वर्षे झाली.

‘सखी शेजारिणी, तू हसत रहा

हास्यांत पळें गुंफीत रहा।

दीर्घ बदामी श्यामल डोळे

एक सांद्रधनस्वप्न पसरले

‘धूपछांव’मधि यौवन खेळे

तू जीवनस्वप्ने रचित रहा।

सहज मधुर तू हसता वळूनी

स्मित-किरणीं धरिं क्षितिज तोलुनी

विषाद मनिंचा जाय उजळुनी

तू वीज खिन्न घनिं लवत रहा।

मूक जिथे स्वरगीत होतसे

हास्यमधुर तव तिथें स्फुरतसे

जीवन नाचत गात येतसे

स्मित चाळ त्यास बांधून पाहा

सखी शेजारिणी, तू हसत रहा।’

कवी वा. रा. कांतांचे हे अर्थवाही व नादमय शब्द मनाला भिडतात. त्यात भावनेची आर्तता आहे. सांद्र घनामध्ये लवलवणाऱ्या वीजेप्रमाणे ते आगळ्या प्रेमाचे हास्य आहे. ‘तू हसत रहा..’ हे म्हणताना तिच्या हास्यामुळे जीवन ‘नाचत, गात’ येत आहेसे वाटते. ‘स्मितकिरणी धरी क्षितिज तोलुनी’मध्ये जीवनाचे क्षितीज उजळले आहे. ‘स्मित चाळ’ ही कल्पनासुद्धा दाद द्यावी अशीच आहे. या सर्व मखमली, मुलायम शब्दांसाठी गायक अरुण दातेंचा रेशमी स्वर संगीतकार वसंत प्रभूंना मिळाला. मुखडा किंवा अंतरा संपवताना ‘शेजारिणी’ या शब्दातील ‘इ’कार वाढवून छान तालात आणला आहे. हे गीत गाण्यासाठी अरुण दाते या गायकाचाच आवाज हवा, असा संगीतकार प्रभूंचा आग्रह होता. मूळ गाणे ऐकताना बासरी व व्हायोलिनचे म्युझिक आढळते. याच गाण्याच्या आणखी ध्वनिमुद्रित रूपांमध्ये मेंडोलिन, बासरी, व्हायोलिनचे वेगळे म्युझिक पीसेस दिसतात. गीत-संगीताच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मेंडोलिन असलेले म्युझिक पीसेस आपल्याला ऐकायला मिळतात.

आम्ही जेव्हा मराठी वाद्यवृंद प्रांतात प्रवेश केला तेव्हा मी जास्तीत जास्त गाणी गायक अरुण दाते यांचीच गायली आहेत. मुंबईतील एका प्रयोगाला ते हजर होते व त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. ३ ऑक्टोबर १९८७ या दिवशी अरुणजी चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘एक कलाकार, एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात कलाकार म्हणून आले होते. चतुरंगच्या पहिल्याच रंगसंमेलनात रुपारेल महाविद्यालयाच्या प्रांगणात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह गायक अरुण दाते यांची प्रवीण दवणे यांनी घेतलेली मुलाखत आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात मी अरुणजींना कैसर उल जाफरी यांच्या एका गजलेची फर्माईश केली. कॅसेटसाठी ती गजल अरुणजींनी गायली होती.

‘कभी कभी तेरी पलकों पे झिलमिलाऊँ मैं

वो इंतजार करे और भूल जाऊँ मैं..’

इंदूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मी ‘स्वरभावयात्रा’ ही भावगीतांची वाटचाल बांधली. माझ्या संकल्पनेतील या कार्यक्रमात अरुण दाते यांनी चार गीते गायली.

दाते घराण्यातील पुढची पिढी म्हणजे अरुण दातेंचे सुपुत्र अतुल दाते. ते आज अनेक संकल्पनांवरील कार्यक्रमांचे उत्तम संयोजक आहेत. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणतात : ‘दाते घराण्यामध्ये जन्म घेणे ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे. मी खूप कलाकार जवळून पाहिले. माझ्या बाबांमध्ये कलाकार व माणूस यांचा संगम आहे. आज त्यांच्यासारखा पाय जमिनीवर असलेला कलाकार शोधून सापडणे कठीण. प्रसिद्धी व वलय लाभलेले माझे बाबा नेहमीच नव्या, ताज्या दमाच्या कलाकारांना मंच देण्यासाठी आग्रही असतात. मराठी भावसंगीत अमर आहे. ते वेगवेगळ्या संकल्पनांमधून टिकवायचे व पुढच्या पिढीपर्यंत न्यायचे, या भावनेने काम करायला मला आवडते. म्हणूनच ‘नवा शुक्रतारा’ मी यापुढे अमेरिका, सिंगापूर, दुबई, मस्कत या ठिकाणी सादर करत आहे. अनेक गीतकार-संगीतकारांची बाबांनी गायलेली गाणी अजरामर आहेत. ‘सखी शेजारिणी’ हे गीत त्यांच्या कारकीर्दीच्या आरंभीच्या पहिल्या काही गाण्यांपैकी आहे. १९६७ हे या गीताच्या ध्वनिमुद्रिकेचे वर्ष. संगीतकार वसंत प्रभू यांच्या अखेरच्या टप्प्यातील हे गीत आहे. खळेकाका, यशवंत देव यांच्याकडेही अनेक गीते त्यांनी गायली. खळेकाकांचे ‘वाकल्या दिशा फुलून’ हे बाबांच्या आवाजातील गीत ध्वनिमुद्रित झाले आणि गायक सुरेश वाडकर यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. ती कलाकाराची दाद होती. ‘अखेरचे येतील माझ्या..’ हे गीत आधी मैफलीत लोकप्रिय झाले व नंतर ध्वनिमुद्रिकेवर आले. सौमित्र, मिलिंद इंगळे या गीतकार-संगीतकार जोडीकडे त्यांनी गायलेले ‘दिस नकळत जाई’ हे गाणे लोकप्रिय झाले. कवी दवणेंचे ‘रंग संध्याकाळचे’ हे गीतही खूप गाजले.’

‘सखी शेजारिणी..’ हे गीत वा. रा. कांत यांनी ११ नोव्हेंबर १९४४ रोजी हैदराबादेतील हिमायतसागर येथे लिहिले. या गोष्टीला आता ७३ वर्षे होतील. आणि ते गीतरूपात रेकॉर्ड झाल्याला आज ५० वर्षे झाली. वा. रा. कांत यांचे पूर्ण नाव वामन रामराव कांत असे आहे. त्यांनी ‘रसाळ वामन’, ‘अभिजित’ अशा टोपणनावांनीही लेखन केले आहे. मराठवाडय़ातील नांदेड येथील त्यांचा जन्म. नांदेडला कांतांची मोठी हवेली होती. ऐटदार बग्गीत बसून ते शाळेत जायचे. वडील रामराव कांत हे निजाम सरकारात नोकरी करीत. कवी कांतांचे इंटपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे झाले. पुढे त्यांनी निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी केली. १९४५ ते १९६० या काळात त्यांनी हैदराबाद व औरंगाबादच्या आकाशवाणी केंद्रांमध्ये मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांच्या आरंभीच्या कविता मराठवाडा मुक्तिसंग्राम, क्रांतिगीते, गुलामगिरी या विषयांवरच्या आहेत. निवृत्त होताना कवी कांत मुंबई आकाशवाणीमध्ये होते. त्या काळात त्यांनी ‘भावसरगम’साठी गीते लिहिली. त्यावेळी महेंद्र कपूर आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेले व यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले ‘स्वप्नात मी तुझ्या रे येऊन रोज जाते, असतील पाय थकले देऊ चुरून का ते?’ हे गाणे लोकप्रिय झाले. ‘उघड उर्मिले कवाड..’ हे याच काळातील त्यांचे लोकप्रिय गीत. केशवसुत, तांबे, गालिब, इलियट, कुसुमाग्रज हे कांतांचे आवडते कवी. कांतांनी कादंबऱ्या लिहिल्या. गालिबच्या प्रेमजीवनावर आधारित ‘पराभवाचा शब्द’ हे दोन अंकी नाटकही लिहिले. या दोन अंकी नाटकात कथेच्या ओघात येतील अशा गालिब यांच्या गजला घेतल्या आहेत. ‘मैं हूँ अपनी शिकस्त की आवाज’ हा गालिबचा शेर त्यांचा खास आवडता. ‘पहाटतारा’, ‘फटत्कार’, ‘रुद्रवीणा’, ‘शततारका’, ‘वेलांटी’, ‘वाजली विजेची टाळी’, ‘दोनुली’, ‘मावळते शब्द’, ‘बगळ्यांची माळ’ हे कांतांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह. उर्दू, हिंदी, इंग्रजी साहित्याचे कांतांनी अनुवाद केले. आकाशवाणीकरिता नाटय़काव्य, ललित लेखनही केले. ‘समग्र वा. रा. कांत’ लवकरच उपलब्ध होणार आहे, हीसुद्धा आनंदाचीच गोष्ट.

कांतांचे सुपुत्र कवी मु. वा. कांत यांनी वडिलांप्रति भरभरून भावना व्यक्त केल्या. कांतांनी आपल्या कवितांमधून ‘गाणे’ दाखवले आहे. ते लिहितात, ‘मी विणितो गाणे, तंतू नको रे तोडू, सम येण्याआधी ताल नको रे सोडू..’ किंवा ‘गीत देते मी तुला रे, सूर तू गीतास द्यावा..’ अशा विविध रचना त्यांनी केल्या. कांतांचे पुत्र कवी मु. वा. कांत आपल्या ‘कविवर्य’ या कवितेत म्हणतात..

‘केवळ कविकुळातच जन्म घेतला म्हणून नव्हे

तर खरोखरच मी शतश: ऋ णी आहे तुमचा

तुम्ही चढविलीत बालपणापासून

माझ्या अंगाखांद्यावर आपल्या कवितेची वस्त्रं..’

‘सखी शेजारिणी’ या गीतामुळे कांतांच्या आठवणींना उजाळा मिळाला. गायक अरुण दाते आज वयोमानामुळे मैफल करीत नाहीत, इतकेच. संगीतकार अनिल मोहिले यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं एक वाक्य मला खूप आवडतं. ते लिहितात : ‘अरुण दातेंच्या आवाजाबद्दल बोलायचं तर एका वाक्यात सांगता येईल- ‘आमची कुठेही शाखा नाही!’

विनायक जोशी vinayakpjoshi@yahoo.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2017 3:36 am

Web Title: marathi lyricist vr kant music composer vasant prabhu marathi singer arun date
Next Stories
1 श्रावणात घननिळा बरसला
2 ‘घे झाकून मुख हे चंद्रमुखी..’
3 ‘माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी..’
Just Now!
X