News Flash

ब्रोकोली आणि कॉलिफ्लॉवर

डोळ्यांच्या आरोग्यासाठी कॉलिफ्लॉवरपेक्षा, ब्रोकोली केव्हाही उत्तम!

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. मानसी राजाध्यक्ष

हल्ली बहुतेकजण ‘डाएट’विषयी सतर्क झाले आहेत. त्यामुळे भाजी-बाजारातही नवनवीन भाज्यांना खूप महत्त्व यायला लागलं आहे. विशेषत: ‘सलाड’ वर्गात मोडणाऱ्या वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांकडे आपलं लक्ष वेधलं जातंय. पण उगीच कोणीतरी ‘खा’ सांगितलं म्हणून त्या भाज्या खाण्यापेक्षा; त्या भाज्या आणि आपल्या नेहमीच्या भाज्या यांच्यात नेमका काय फरक आहे किंवा कोणतं साम्य आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.

आज आपण ब्रोकोली आणि कॉलिफ्लॉवर, या अतिशय साधर्म्य असलेल्या भाज्यांबद्दल थोडं जाणून घेऊ या. तसं बघायला गेलं तर ब्रोकोली आणि कॉलिफ्लॉवर हे भाज्यांमधल्या ‘कोल’(Cole) या एका कुटुंबातले सदस्य! तेव्हा त्यांच्यामध्ये काही सारखेपणा आणि काही वेगळेपणा असणं, अगदी स्वाभाविक आहे.

या भाज्यांचा जो भाग आपण खातो, तो भाग म्हणजे त्या वनस्पतीचा फुलांच्या कळ्या असतात. कॉलिफ्लॉवरमध्ये या कळ्यांच्या गुच्छामध्ये कळ्या अगदी जवळजवळ एकमेकांना चिकटून असतात, तर ब्रोकोलीमध्ये त्या थोडय़ा एकमेकांपासून दूर दूर असतात. त्यातही ब्रोकोलीच्या कळ्यांमध्ये ‘हरितद्रव्य’ असल्यामुळे ब्रोकोली हिरव्या रंगाचं असतं तर कॉलिफ्लॉवर मात्र पांढऱ्या रंगाचा असतो. दोन्ही भाज्यांमध्ये काबरेहायड्रेट्सही जवळपास सारख्या प्रमाणात, दोघांमध्ये ‘फायबर’ही सारखंच! दोन्ही भाज्या पचनाला मदत करणाऱ्या आणि हो.. वजन कमी करण्यासाठीही उपयोगी; कारण दोन्ही भाज्या कमी कॅलरीजसाठी प्रसिद्ध!

पण ब्रोकोलीमध्ये, कॉलिफ्लॉवरच्या तुलनेने ‘क’ जीवनसत्त्वाचं प्रमाण जवळजवळ दुप्पट तर ‘के’ जीवनसत्त्वाचं प्रमाण जवळपास दहा पटीने जास्त! लोह आणि कॅल्शियम तीन पटीने जास्त तर प्रथिनं आणि ‘ब’ जीवनसत्त्व ही थोडीफार जास्त! कॉलिफ्लॉवरमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘ई’ अगदी नगण्य प्रमाणात तर ब्रोकोलीमध्ये हे दोन्ही घटक जास्त प्रमाणात!  साहजिकच डोळ्यांच्या आरोग्यासाठी कॉलिफ्लॉवरपेक्षा, ब्रोकोली केव्हाही उत्तम!

पण या दोन्ही भाज्यांचा आरोग्यासाठी पुरेपूर फायदा व्हायला हवा असेल तर, भाज्या थोडय़ाशा वाफवून खाव्यात, असं बऱ्याच डॉक्टर मंडळींचं आणि काही वैज्ञानिकांचंही म्हणणं आहे. तसंही या दोन्ही भाज्यांच्या बाबतीत कीटकनाशकांची फवारणीही कमी प्रमाणात असल्यामुळे, तशा त्या सहजगत्या आहारात वापरता येतात. अर्थात तरीही त्या स्वच्छ धुऊन वापरणं आवश्यक!

अशा प्रकारची, सर्वच नवीन भाज्यांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. त्यामधून नेमकी माहिती वाचून, त्यावर विचार करून, योग्य त्या रेसिपीज कराव्यात. कोणी काही सांगितलं म्हणून भाजी खरेदी करू नये, एवढंच!

manasi.milind@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:01 am

Web Title: article about broccoli and cauliflower information
Next Stories
1 आहारातील ‘अ‍ॅण्टीऑक्सिडंट्स’
2 चाहत चहाची!
3 चाहत चहाची
Just Now!
X