ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. मोहालीच्या स्टेडियमवर रंगलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला २१ धावांनी पराभवला सामोरे जावे लागले. ‘ब’ गटात पाकिस्तानचे चारही सामने संपले असून, केवळ बांगलादेशविरुद्ध पाकच्या संघाला विजय प्राप्त करता आला. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला ‘ब’ गटात केवळ दोन गुणांसह तिसरे स्थान मिळाले आहे. पहिल्या स्थानवर असलेला न्यूझीलंडचा संघ सहा गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र झाला आहे, तर भारताच्या खात्यात दोन विजयांसह चार गुण दाखल आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
(FULL COVARAGE || FIXTURES || PHOTOS )
ऑस्ट्रेलियाच्या १९४ धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना पाकिस्तानला ८ बाद १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून डावखूरा फलंदाज खालिद लतिफने सर्वाधिक ४६ धावांचे, तर शोएब मलिकने २० चेंडूत ४० धावा केल्या. मात्र, दुसऱया बाजूने ठरावीक अंतराने विकेट्स पडत गेल्याने ऑस्ट्रेलियाचे आव्हान पाकला गाठता आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉकरने चार षटकांत ५ बळी घेतले. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाबाद ६१ धावांची खेळी करून संघाला चांगली धावसंख्या उभारुन दिली होती.