भारताचे  क्रिकेटस्टार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ‘रन मशिन’ विराट कोहली या दोघांच्या तुलनेची चर्चा आपल्याला काही नवीन नाही. सचिनचा विक्रम मोडीत काढण्याची कुवत असणाऱयांच्या यादीत विराट कोहलीचे नाव घेतले जाते. नेमकं विराटची तुलना सचिनशी का केली जाऊ शकते यासाठी सचिन २७ वर्षांचा असतानाच्या त्याच्या आकडेवारीची विराटच्या आकडेवारीशी केलेली तुलना बरचं काही सांगून जाणारी आहे.

वयाच्या २७ व्या वर्षी सचिनने २४९ एकदिवसीय सामन्यात ४२. १० च्या सरासरीने ९२६२ धावा ठोकत २५ शतके पूर्ण केली होती. कोहलीची वयाच्या २७ व्या वर्षाची आकडेवारी पाहता त्याने केवळ १७१ सामने खेळले असून २५ शतकांसह ५१.५१ च्या सरासरीने ७२१२ धावा केल्या आहेत.

शतकांच्या बाबतीत तुलना केली गेली असता सचिनने २३४ व्या डावात २५ शतके पूर्ण केली, तर कोहलीने आपल्या १६२ व्या डावात २५ शतके पूर्ण केली आहेत. कोहलीने २० वे शतक १३३ व्या डावात गाठले होते. सचिनला आपले २० वे शतक साजरे करण्यासाठी १९७ डावांची वाट पाहावी लागली होती.