विश्वचषकात आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी घरच्या मैदानात दमदार कामगिरी करण्यासाठी अष्टपैलू युवराज सिंग सज्ज आहे. त्यासाठी त्याने सरावामध्ये अतिरिक्त मेहनतही घेतली. कारण घरच्या मैदानात त्याला गेल्यावेळी भोपळाही फोडता आला नव्हता, त्यामुळे युवराज या सामन्यासाठी अधिक सतर्क असल्याचे पाहायला मिळाले.

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि आर. अश्विन यांच्यानंतर युवराज फलंदाजीच्या सरावासाठी नेट्समध्ये दाखल झाला. यावेळी युवराजबरोबर कर्णधार महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणं यांनीही फलंदाजीचा सराव केला. यावेळी युवराजने धीम्यागतीच्या गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव करणे पसंत केले. धोनी, रैना आणि अजिंक्य यांनी फलंदाजीचा सराव संपल्यावरही युवराज फलंदाजीचा सराव करत होता.

युवराजने यावेळी काही गोष्टींवर खासकरून भर दिला. सुरुवातीला फलंदाजीचा सराव करताना त्याने जमिनीलगत फटके लगावले. पण काही वेळाने त्याने चेंडू उंच भिरकावण्याच्या सरावावर भर दिला. यामध्ये त्याने गोलंदाजाच्यावरून अधिक फटके मारले, तर काही फटके यष्टय़ांच्या मागेही तो खेळला. सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी युवराजवर यावेळी विशेष मेहनत घेतल्याचे दिसून आले.

गोलंदाजांमध्ये यावेळी हरभजन सिंग, आशीष नेहरा आणि मोहम्मद शमी यांनी कसून सराव केला.